FIFA World Cup 2018 : फिफा विश्वचषक स्पर्धेत मंगळवारी झालेल्या दुसऱ्या सामन्यात जागतिक क्रमवारीत ८व्या स्थानी असलेल्या पोलंडवर पराभवाची नामुष्की ओढवली. २७व्या स्थानी असलेल्या सेनेगलने पोलंडला २-१ असे पराभूत केले आणि प्रस्थापितांना धक्का देण्याचा इतिहास पुढे सुरु ठेवला. या सामन्यावर पहिल्यापासूनच सेनेगलचे वर्चस्व पाहायला मिळाले. पूर्वार्धात ३७व्या मिनिटाला सिओनेकने स्वयंगोल करत सेनेगलला आघाडी मिळवून दिली. त्यांनतर उत्तरार्धात ६०व्या मिनिटाला नियंगने गोल करत सेनेगलची आघाडी वाढवली. सामन्यात ८५व्या मिनिटाला क्रायचोवीकने १ गोल करत पोलंडला पराभवाच्या छायेतून काढायचा प्रयत्न केला. पण त्यांनतर एकही गोल न झाल्याने सामना सेनेगलने जिंकला.

पोलंडला पराभव पत्करावा लागल्यामुळे कर्णधार रॉबर्ट लेवांडोव्हस्की हा खूप निराश झाला. तुलनेने दुबळ्या अशा सेनेगलकडून पराभूत झाल्याने पोलंडची बाद फेरीत पोहोचण्याची वाट अधिक खडतर बनली. हा सामना संपताच लेवांडोव्हस्की हा स्टेडियममध्ये असलेल्या आपल्या पत्नीकडे गेला. त्याला निराश झालेले पाहून त्याची पत्नी अॅना हिने त्याला धीर दिला.

हा पराभव म्हणजे काही स्पर्धेचा शेवट नाही, अशा पद्धतीने त्याच्या पत्नीने लेवांडोव्हस्कचे सांत्वन केले. त्याला धीर दिला आणि त्याच्या कपाळावर चुंबन घेतले. तिने त्याला धीर देतानाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले. हे सांत्वन ‘अत्यंत हृदयस्पर्शी’ असल्याचे अनेकांनी सोशल मीडियावर म्हटले, तर काहींनी हा या विश्वचषकातील एक ‘सुरेख क्षण’ असल्याचे सांगितले.

पोलंडचा पुढील सामना २४ जूनला कोलंबियाशी होणार आहे. दोन्ही संघांना हा सामना जिंकणे आवश्यक आहे.