ब्राझिलच्या बेबेटोचं ‘रॉक दी बेबी’ असो वा कॅमेरुनच्या रॉजर मिलाचा डान्स असो, फुटबॉलमध्ये गोल झाल्यानंतर सेलिब्रेशन करण्याची प्रत्येक खेळाडूची शैली ही वेगळीच असते. १९९४ सालच्या विश्वचषकात नेदरलँड्सविरुद्ध सामन्यात ब्राझिलच्या बेबेटोनं गोल झळकावल्यानंतर जे सेलिब्रेशन केलं ते आजही अनेक फुटबॉलर करताना दिसतात. एखाद्या लहान बाळाला हातात झोका द्यावा असं सेलिब्रेशन बेबेटोनं केलं होतं. बेबेटोच्या त्या सेलिब्रेशनचं ‘रॉक दी बेबी’ असं नामांकरण झालं. तर १९९० साली कॅमेरुनच्या रॉजर मिलानं इटलीविरुद्ध सामन्यात गोल केल्यानंतर कॉर्नर फ्लॅगच्या दिशेनं जात जो डान्स केला तोही आज अनेकांच्या स्मरणात आहे. गोल झाल्यानंतर आपला आनंद व्यक्त करण्यासाठी किंवा समोरच्या संघाला डिवचण्यासाठी अनेक प्रकारची सेलिब्रेशन फुटबॉलर करताना दिसतात. मग ते कोणत्याही प्रकारचं असो. डान्स असो, फ्रंट फ्लिप असो, बॅक फ्लिप असो वा चाहत्यांबरोबर काढलेला सेल्फी असो. प्रत्येक सेलिब्रेशनच्या मागे काही ना काही कारण किंवा इतिहास दडलेला असतो. काही वेळेला हेच सेलिब्रेशन अनेकांच्या कायमचं आठवणीत राहतं, तर काही जण त्या खेळाडूच्या सेलिब्रेशनला आपला विरोध दर्शवतात.

रशियात सुरु असलेल्या फिफा विश्वचषकातही आपल्याला अनेक विविध प्रकारची सेलिब्रेशन पाहायला मिळाली आहेत आणि अजूनही मिळतील. पण याचदरम्यान स्वित्झर्लंडच्या ग्रॅनिट झाका आणि झेर्दान शकिरीनं सर्बियाविरुद्ध गोल केल्यानंतर चांगलाच वाद निर्माण झाला आहे. कुठल्याही खेळात राजकारण आलं, तर तिथं वाद हा होणारच. झाका आणि शकिरी यांनीही आपल्या सेलिब्रेशनला राजकारणाचा टच दिला. आणि त्या दोघांना हे चांगलच महागात पडलं आहे.

कोण आहेत ग्रॅनिट झाका आणि झेर्दान शकिरी?

खरंतर स्वित्झर्लंडच्या संघात असे अनेक खेळाडू आहेत जे इतर वंशाचे आहे. त्यात ग्रॅनिट झाका आणि झेर्दान शकिरीचाही समावेश आहे. झाका आणि शकिरी हे दोघेही अल्बानियन कोसोवो वंशाचे आहेत. झाकाचे वडिलांनी कोसोवोच्या स्वातंत्र्याला पाठिंबा दिल्यानं काही काळ त्यांना तुरुंगातही काढावा लागला होता. झाकाच्या बाबतीत आणखी एक गोष्ट म्हणजे त्याचा भाऊ टौलंट झाका हा अल्बानिया फुटबॉल संघाचं प्रतिनिधित्व करतो. सर्बियाविरुद्धच्या सामन्यात गोल डागल्यानंतर झाका आणि शकिरी यांनी आपल्या दोन्ही हातांनी गरुडाची प्रतिमा करुन दाखवली. खरंतर अल्बानियाच्या राष्ट्रध्वजावर दोन गरुड आहेत. त्यामुळं त्यांच्या फुटबॉल संघाला दी इगल्स असंही संबोधलं जातं. झाका आणि शकिरीचं हे सेलिब्रेशन सर्बियाला डिवचण्यासाठी आणि कोसोवोला समर्थन दर्शवत होतं. झाका आणि शकिरीच्या या सेलिब्रेशनमुळे कोसोवोतही स्वित्झर्लंडच्या विजयाचा आनंद व्यक्त करण्यात आला.

सर्बिया आणि कोसोवोत काय आहे वाद?

कोसोवो हा १९१२ पासून सर्बियाचा भाग होता. १९१८ साली सर्बिया युगोस्लाव्हियाचा भाग बनला, मग १९९२ साली सर्बिया युगोस्लाव्हियापासून विभक्त झाला. सर्बियन सरकारच्या जाचाला कंटाळून कोसोवोनंही वेगळा करण्याचा घाट सुरु झाला. त्यातच कोसोवो युद्धाला सुरुवात झाली. सर्बियानं कोसोवोच्या गावांवर हल्ले चढवले. त्यात अनेक नागरिकांना आपले प्राण गमवावे लागले. २४ मार्च १९९९ साली जर्मन हवाई दलानं सर्बियावर बॉम्ब हल्ले करण्यास सुरुवात केली. त्यानंतर नाटोकडून जवळपास ७९ दिवस हे हल्ले सुरुच होते. १९९९ साली जून महिन्यात सर्बियानं कोसोवोतून आपलं सैन्य माघारी घेतलं. अखेर २००८ साली कोसोवोला एक स्वतंत्र्य राज्य म्हणून घोषित करण्यात आलं. पण सर्बिया आजही त्या निर्णयाच्या विरोधात आहे. महत्त्वाची बाब म्हणजे सर्बियाला वारंवार रशियाचा पाठिंबा मिळत आला आहे. सर्बियासह रशियाचाही कोसोवोच्या स्वातंत्र्याला विरोध आहे. त्यामुळं रशियातल्या विश्वचषकात सर्बियाविरुद्ध अल्बानियन कोसोवो वंशाच्या खेळाडूंनी गोल करुन केलेलं सेलिब्रेशन चांगलंच गाजत आहे.

विशेष म्हणजे सर्बियाविरुद्धच्या सामन्यात झेर्दान शकिरीच्या उजव्या पायाच्या बुटावर कोसोवोचा झेंडा होता. तर डाव्या पायाच्या बुटावर स्वित्झर्लंडचा.इतकच नाही तर सर्बियाला हरवल्यानंतर कोसोवोच्या राष्ट्रपतींनीही झाका, शकिरी आणि स्वित्झर्लंडच्या संघाचं अभिनंदनही केलं.

झाका आणि शकिरीनं कोसोवोला पाठिंबा देण्यासाठी केलेल्या सेलिब्रेशनवर सर्बियन फुटबॉल संघटनेनं अपिल केलं. त्यानंतर फिफानेही झाका आणि शकिरीवर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. याप्रकरणी झाका आणि शकिरीवर दोन सामन्यांची बंदीही घातली जाण्याची शक्यता आहे. आणि तसं झालं तर स्वित्झर्लंडला विश्वचषकाच्या साखळी फेरीतल्या अखेरच्या आणि बाद फेरीतल्या पहिल्या सामन्यात झाका आणि शकिरीशिवायच मैदानात उतरावं लागेल.

फुटबॉलपटूंच सेलिब्रेशन आणि वाद हा काही नवा विषय नाही आहे. याआधी अनेक खेळाडूंनी खेळात राजकारण आणून स्वत:ला व्हिलन बनवले आहे. इटलीच्या पावलो डी कॅनियो यांनी लॅझियोकडून खेळताना रोमाविरुद्ध सामन्यात गोल केल्यानंतर फेसिस्ट सॅल्यूट केला होता. फेसिस्ट सॅल्यूट म्हणजे तानाशाहीला समर्थन. त्यामुळं पावलो डी कॅनियोवरही चौफेर टीका करण्यात आली होती. ऑस्ट्रेलियाचा माजी गोलकीपर मार्क बोसनिचही असाच वादात सापडला होता. इंग्लंडच्या अॅस्टन व्हिलाकडून खेळताना मार्क बोसनिचनं टॉटनहॅम हॉटस्परच्या चाहत्यांना डिवचण्यासाठी नाझी सॅल्यूट केला होता. तर उजव्या हातानं हिटलरच्या मिशांचं प्रदर्शन करण्यासाठी आपल्या तोंडावर हात ठेवला होता. याप्रकरणी बोसनिचवर दंडात्मक कारवाई करण्यात आली होती. तर ग्रीसच्या गियारगोस कॅतिडिसची कारकीर्द सुरु होण्याआधीच संपुष्टात आली. कॅतिडिसनं ग्रीसच्या एईके अथेन्सकडून गोल केल्यानंतर नाझी सॅल्यूट केला होता. त्यामुळं ग्रीस फुटबॉल फेडरेशननं कॅतिडिसवर देशाकडून खेळण्यावर आजीवन बंदी घातली. कॅतिडिस सध्या चेक रिपब्लिकच्या ऑलिम्पिया प्राग या संघाकडून खेळत आहे.

गोल केल्यानंतर अनेक खेळाडूंना स्वत:वर भान राहत नाही. पण आपलं हे सेलिब्रेशन कुणाच्या भावना दुखावणार नाही याचं भान खेळाडूंनी नक्कीच ठेवायला हवं.

  • आपल्या प्रतिक्रीया vijay.majha@gmail.com या ईमेल आयडीवर कळवा