News Flash

FIFA World Cup 2018 : It’s Not Coming Home…अतिआत्मविश्वास इंग्लंडला नडला?

इंग्लंडच्या संघाची ही कामगिरी खरोखरंच विश्वचषक जिंकण्याच्या दर्जाची होती का?

पराभवानंतर निराश झालेला इंग्लंडचा संघ

कालपर्यंत इट्स कमिंग होम..म्हणणाऱ्या इंग्लिश खेळाडूंवर आणि त्यांच्या चाहत्यांवर आता इट्स नॉट कमिंग होम असं म्हणण्याची वेळ आली. क्रोएशियानं इंग्लंडवर २-१ अशी मात करुन फिफा विश्वचषकाच्या इतिहासात पहिल्यांदाच फायनल गाठली. त्यामुळं इंग्लंडचं ५२ वर्षांनंतर फिफा विश्वचषक जिंकण्याचं स्वप्न अखेर अधुरचं राहिल. नेहमीप्रमाणे इंग्लिश खेळाडूंनी ऐन मोक्याच्या वेळी माती खाल्ली. इंग्लिश खेळाडूंनी गेल्या महिन्याभरापासून आपल्या चाहत्यांना विश्वचषकाचं दाखवलेलं स्वप्न अवघ्या ४१ मिनिटांत तुटलं. इवान पेरिसिच आणि मारियो मांझुकिचनं इंग्लिश चाहत्यांच्या मनावर असा घाव केला की येणारा काही काळ म्हणा किंवा काही वर्ष म्हणा त्यांची ती जखम ताजीच राहिल यात काही शंका नाही.

हॅरी केनच्या इंग्लिश आर्मीकडे यंदाच्या विश्वचषकाचा प्रबळ दावेदार म्हणून पाहिलं जात होतं. ट्युनिशिया आणि पनामाला हरवल्यानंतर इंग्लंडचा संघच विश्वचषक जिंकेल असा दावा केला जाऊ लागला. मग बेल्जियमकडून जाणूनबुजून हरलो, कारण ब्राझिल, फ्रान्ससारख्या बलाढ्य संघांचा सामना टाळायचा होता असं इंग्लिश चाहते म्हणू लागले. रशियानं स्पेनचा काटा काढल्यामुळं इंग्लंडचा मार्ग अधिक सुकर झाला होता. पण कोलंबियानं इंग्लंडला विजयासाठी चांगलच तंगवलं. स्वीडनविरुद्ध इंग्लंडनं सहज विजय मिळवला. त्यामुळं इंग्लिश चाहत्यांचा आत्मविश्वास आणखी वाढला. जेव्हा कधी नव्हे ते इंग्लिश चाहते विश्वचषक आपलाच असं बोलू लागले. ज्याप्रमाणे तुकोबा आणि ज्ञानोबा माऊलींच्या गजरात वारकरी आपला भान विसरुन जातात तशीच काहीशी गत इंग्लिश चाहत्यांची झाली होती. इंग्लिश चाहते आपला भान विसरुन विश्वचषकात इतके गुंग झाले होते की त्यांना इतर संघ दुबळे वाटू लागले. २८ वर्षांनंतर इंग्लंडनं फिफा विश्वचषकाची उपांत्य फेरी गाठली होती. विश्वचषक आम्हीच जिंकणार असं स्वप्न पाहून जगाच्या कानाकोपऱ्यातून इंग्लंडचे चाहते रशियात दाखल झाले होते. कारण या सर्वांनी इंग्लंडच्या या संघावर आंधळा विश्वास ठेवला होता.

१९६६ साली बॉबी मूर यांच्या नेतृत्वाखाली इंग्लंडनं फिफा विश्वचषक जिंकला होता. त्याच संघाची झलक इंग्लिश चाहते हॅरी केनच्या इंग्लंड संघात बघत होते. पहिल्या दोन सामन्यांत हॅरी केननं तब्बल ५ गोल झळकावले. जेसी लिंगार्ड, जॉन स्टोन्स, हॅरी मॅग्वायर, डेली अली, कायरन ट्रिपियर, जॉर्डन हेंडरसनसारख्या खेळाडूंनीही दमदार कामगिरी बजावली. पण इंग्लंडच्या संघाची ही कामगिरी खरोखरंच विश्वचषक जिंकण्याच्या दर्जाची होती का?

फिफाच्या जागतिक क्रमवारीत इंग्लंड सध्या १२ व्या स्थानावर आहे. पहिल्या सामन्यात त्यांनी २८ व्या क्रमावर असलेल्या ट्युनिशियाला हरवलं. मग ४९ व्या स्थानावर असलेल्या पनामाला धूळ चारली. यानंतर तिसऱ्या स्थानावर असलेल्या बेल्जियमकडून इंग्लड हरली. याचाच अर्थ इंग्लंडला आपल्यापेक्षा मजबूत संघासोबत चांगली कामगिरी बजावता आली नव्हती.

१९६६ साली इंग्लंडनं विश्वचषक जिंकला त्यावेळी सर बॉबी चार्ल्टनसारखे दिग्गज खेळाडू संघात होते. चार्ल्टन यांच्यात आपल्या संघाला एकहाती विजय मिळवून देण्याची ताकद होती. १९५८ साली मॅनचेस्टर युनायटेड संघाच्या विमानाला म्युनिकमध्ये अपघात झाला होता. त्या अपघातात मॅनचेस्टर युनायटेडच्या आठ खेळाडूंना आपले प्राण गमवावे लागले होते, पण बॉबी चार्ल्टन या अपघातातून थोडक्यात बचावले होते. त्यानंतरही त्यांनी प्रबळ इच्छाशक्तीच्या जोरावर पुनरागमन केलं आणि इंग्लंडला विश्वचषक जिंकून दिला. असा खेळाडू इंग्लंडमध्ये आजवर जन्माला आलेला नाही. वेन रुनी, डेव्हिड बेकहॅम, गॅरी लिनेकर, केविन किगन, अॅलेन शेररसारखे अनेक खेळाडू येऊन गेले, पण एकालाही इंग्लंडला विजेतेपद मिळवून देता आलं नाही. इंग्लंडचे सध्याचे प्रशिक्षक गॅरेथ साऊथगेट यांनीही ९ वर्ष इंग्लंडचं प्रतिनिधित्व केलं. १९९६ च्या युरो कपमध्ये जर्मनीविरुद्ध उपांत्य फेरीत गॅरेथ साऊथगेट यांना पेनल्टी शूटआऊटमध्ये गोल करता आला नव्हता. त्यामुळं इंग्लंडचं आव्हान संपुष्टात आलं होतं. आता विश्वचषकातही गॅरेथ साऊथगेट यांच्यावर उपांत्य फेरीतच पराभव स्वीकारण्याची वेळ आली. इंग्लंडच्या या पराभवामुळं साऊथगेट यांच्या युरो कपच्या त्या आठवणीही जाग्या झाल्या.

क्रोएशियाविरुद्ध उपांत्य फेरीच्या सामन्यात ट्रिपियरनं पाचव्याच मिनिटाला गोल डागून इंग्लंडला आघाडी मिळवून दिली. त्यावेळी चाहत्यांनी इंग्लंडचा विश्वचषकाच्या फायनलमधला प्रवेश निश्चित करुन टाकला होता. मात्र अतिउत्साह इंग्लंडच्या संघाला चांगलाच महागात पडला.

पण हार मानेल तो क्रोएशियाचा संघ कसला. आता तुम्ही म्हणाल की क्रोएशियाच्या संघाला इतकं महत्त्व का?. क्रोएशियाच्या संघात असे काही खेळाडू आहेत, ज्यांची कामगिरी इंग्लिश खेळाडूंपेक्षा कईक पटीनं सरस आहे. कर्णधार लुका मॉड्रिच, इवान पेरिसिच, इवान राकिटिच, मारियो मांझुकिच आणि लोव्हरेनसारखे खेळाडू हे युरोपातल्या बलाढ्य संघांचं प्रतिनिधित्व करत आले आहेत. मोठ्या सामन्यांत आपली कामगिरी कशी उंचवायची हे या खेळाडूंना चांगलंच माहित आहे. त्यामुळेच विश्वचषकाच्या बाद फेरीत सलग तीन सामन्यांत क्रोएशियाला पिछाडीवर असतानाही विजय मिळवता आला. अशी कामगिरी करणारा क्रोएशिया हा आजवरचा पहिलाच संघ ठरलाय.

मारियो मांझुकिचनं १०९ व्या मिनिटाला गोल झळकावल्यानं इंग्लंडच्या चाहत्यांसमोर अश्रू ढाळण्याशिवाय दुसरा काहीही पर्याय उरला नव्हता.विश्वचषकाच्या सुरुवातीपासूनच इंग्लिश मीडियाने आणि फुटबॉल विश्लेषकांनी इंग्लंडच्या संघाला जणू चण्याच्या झाडावर चढवलं होतं. क्रोएशियाच्या संघालाही इंग्लिश मीडियाने आणि विश्लेषकांनी कमी लेखलं होतं. त्यांची हीच चूक इंग्लंडच्या संघाला महागात पडली. त्यामुळेच गेल्या महिन्याभरापासून इट्स कमिंग होमच्या नावानं इतरांना डिवचण्याचा प्रयत्न करणाऱ्या इंग्लिश चाहत्यांना आणि त्यांच्या खेळाडूंना इट्स नॉट कमिंग होम असं म्हणत रिकाम्या हातांनी मायदेशी परतावं लागलं.

  • आपल्या प्रतिक्रीया vijay.majha@gmail.com या इमेल आयडीवर कळवा.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 12, 2018 10:22 am

Web Title: fifa world cup 2018 russia england suffer huge setback from croatia fails to enter in final
टॅग : England,FIFA 2018
Next Stories
1 FIFA World Cup 2018: विजयानंतर क्रोएशियाच्या कर्णधाराने ब्रिटीश प्रसारमाध्यमांना झापले, म्हणाला…
2 FIFA World Cup 2018 : बेकहॅमनंतर ‘ही’ किमया साधणारा ट्रीपीयर ठरला इंग्लंडचा दुसरा खेळाडू
3 FIFA World Cup 2018 : विश्वचषक स्पर्धा उत्तेजकांपासून मुक्त?
Just Now!
X