रोमेलू लुकाकू, इडन हजार्ड, केविन डी ब्रुएना, थिबॉट कोर्टुआ, यानिक कॅरेस्को, विन्सेन्ट कोम्पनी, ड्रायस मर्टेन्स….नावं तरी किती घ्यायची??? हे सर्व दिग्गज खेळाडू एकाच संघाकडून खेळतात. हो हे खरंय आणि त्या संघाचं नाव आहे बेल्जियम..‘दी रेड डेव्हिल्स’.

युवा, गुणवान आणि अनुभवी, असंच वर्णन करावं लागेल बेल्जियम फुटबॉल संघाचं. बेल्जियमच्या यंदाच्या संघात एका बलाढ्य संघाला आवश्यक असणाऱ्या सर्व गोष्टी आहेत. जगातल्या इतर बड्या संघांना टक्कर देण्याची ताकद बेल्जियमच्या संघात आहे. प्रशिक्षक रोबेर्टो मार्टिनेज यांनी गेल्या दोन वर्षात बेल्जियमच्या संघाची मजबूत बांधणी केली आहे. त्यामुळं बेल्जियमच्या संघाला जणू जिंकण्याची सवयच लागली आहे असं म्हणलं तरी वावगं ठरणार नाही.

  • रोमेलू लुकाकू – गोल मशिन

बेल्जियमच्या संघाचं खास वैशिष्ट्य म्हणजे त्यांची आघाडीची फळी. रोमेलू लुकाकू, इडन हजार्ड, केविन डी ब्रुएना हे तीन बडे खेळाडू बेल्जियमच्या ताफ्यात आहेत. मॅनचेस्टर युनायटेडकडून खेळणारा रोमेलू लुकाकू गेल्या काही दिवसांपासून भलत्याच फॉर्मात आहे. लुकाकूने गेल्या मोसमात २७ गोल झळकावले आहेत. इतकच नाही तर बेल्जियमसाठीही त्याने बजावलेली कामगिरी ही वाखणण्याजोगी आहे. विश्वचषकाआधी कोस्टा रिकाविरुद्ध झालेल्या अखेरच्या मैत्रीपूर्ण सामन्यात लुकाकूने दोन गोल केले. त्यामुळे लुकाकूच्या नावावर ६८ आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये ३६ गोल जमा झाले आहेत. रोमेलू लुकाकूनं बेल्जियमकडून सर्वाधिक गोल करणाचा मानही मिळवला आहे. त्यानं ही कामगिरी वयाच्या अवघ्या २५ व्या वर्षी बजावली आहे. लुकाकूने बेल्जियमसाठी गेल्या १७ सामन्यांमध्ये तब्बल १९ गोल डागले आहेत. त्यामुळेच बेल्जियमचा संघ गेल्या १९ सामन्यांमध्ये अपराजित आहे.

  • लुकाकूला इतर खेळाडूंची साथ

लुकाकूला साथ देण्यासाठी इडन हजार्ड आणि केविन डी ब्रुएना ही जोडीही यंदा सज्ज आहे. केविन डी ब्रुएनाच्या जबरदस्त खेळाच्या जोरावर मॅनचेस्टर सिटीला गेल्या मोसमात इंग्लिश प्रीमियर लीगचं विजेतेपद मिळवता आलं. डी ब्रुएनाने ६२ सामन्यांत बेल्जियमचं प्रतिनिधित्व केलं आहे.  २०१४ च्या फिफा विश्वचषकात बेल्जियमला उपांत्यपूर्व फेरी गाठून देण्यातही डी ब्रुएनाची मोलाची भूमिका होती. तसेच कर्णधार इडन हजार्डकडून बेल्जियमच्या संघाला मोठ्या अपेक्षा आहेत. हजार्डने विश्वचषक पात्रता फेरीत बेल्जियमसाठी सहा गोल डागले होते. ड्रायस मर्टेन्स आणि मिची बातशुयीसारखे खेळाडूही बेल्जियमच्या आघाडीच्या फळीची धुरा सांभाळू शकतात. बेल्जियमची आघाडीची फळी किती ताकदवान आहे याची झलक विश्वचषक पात्रत सामन्यांमध्ये पाहायला मिळाली. विश्वचषक पात्रता फेरीत बेल्जियमने १० सामन्यांमध्ये तब्बल ४२ गोल झलकावण्याचा पराक्रम गाजवला.  त्यामुळे आता विश्वचषकातही बेल्जियमच्या आघाडीच्या फळीला रोखण्याचं आव्हान प्रतिस्पर्धी संघांसमोर असेल.

  • तगडा बचाव – बेल्जियमची खरी ताकद

बेल्जियमच्या संघाची खरी ताकद म्हणजे त्यांचा तगडा बचाव. टोबी ऑल्डरविरेल्ड, विन्सेन्ट कोम्पनी, जॅन वर्टोन्गन असे अनुभवी खेळाडू बेल्जियमच्या बचावफळीत आहेत. बेल्जियमचा बचाव भेदणं ही काही साधीसोपी गोष्ट नाही. विश्वचषक पात्रता फेरीत प्रतिस्पर्धी संघ बेल्जियमविरुद्ध १० सामन्यांत केवळ सहाच गोल करु शकले. जॅन वर्टोन्गन हा बेल्जियमचा सर्वात अनुभवी खेळाडू आहे. त्याच्या गाठीशी १०२ आंतरराष्ट्रीय सामन्यांचा अनुभव आहे. तर ऑल्डरविरेल्ड आणि विन्सेन्ट कोम्पनीनं प्रत्येकी ७७ वेळा बेल्जियमचं प्रतिनिधित्व केलं आहे. बेल्जियमच्या बचावफळीत थॉमस मुनिएरसारखा युवा आणि तगडा खेळाडूही आहे.

  • कोर्टुआ नावाची ६.६ फुट भिंत 

जगातल्या सर्वोत्तम गोलकीपरमध्ये थिबॉट कोर्टआची गणना केली जाते. ६.६ फुट उंच असलेल्या कोर्टुआ आपल्या उंचीचा फायदा घेत अनेक जबरदस्त सेव्ह करण्यात माहिर आहे. तसेच बॉल हाताळण्याची क्षमताही त्याला इतर गोलकीपरपेक्षा सरस ठरवते.

  • विश्वचषकातली बेल्जियमची कामगिरी

बेल्जियमचा संघ आतापर्यंत १३ वेळा विश्वचषकात सहभागी झाला आहे. बेल्जियमनं २०१४ साली विश्वचषकाची उपांत्यपूर्व फेरी गाठली होती. तर १९८६ च्या विश्वचषकात त्यांनी चौथं स्थान मिळवलं होतं.

  • बेल्जियम करु शकतो मोठा उलटफेर

बेल्जियमच्या संघात अनेक दिग्गज खेळाडूंचा भरणा आहे त्यामुळं यंदाच्या विश्वचषकात त्यांनी मोठा उलटफेर केला तर आश्चर्य वाटायला नको. बेल्जियमचा यंदाचा संघ हा त्यांच्या देशाच्या इतिहासातला सर्वोत्तम संघ असल्याचं म्हटलं जात आहे. त्यामुळं बेल्जियम विश्वचषकात कुठवर मजल मारतं याकडे साऱ्यांचं लक्ष लागलं आहे.

  • विजय शिंदे

आपल्या प्रतिक्रीया vijay.majha@gmail.com या इमेल आयडीवर पाठवा