News Flash

FIFA World Cup 2018 : गुड, बॅड अँड अग्ली!! लुई सुआरेझच्या व्यक्तिमत्वाचे तीन पैलू

१०० व्या सामन्यात सुआरेझचा विक्रमी गोल

गोल झळकावल्यानंतर आनंद व्यक्त करताना सुआरेझ

यंदाच्या फिफा विश्वचषकाची बाद फेरी गाठणारा उरुग्वे हा पहिलाचा दक्षिण अमेरिकन देश ठरला आहे. याचे सर्व श्रेय जातं ते म्हणजे त्यांचा आघाडीचा स्टार खेळाडू लुई सुआरेझ. सौदी अरेबियाविरुद्ध सामन्यात उरुग्वेनं सुआरेझच्या गोलच्या जोरावर १-० असा विजय मिळवला. लुई सुआरेझचा आपल्या आंतरराष्ट्रीय कारकीर्दीतला हा १०० वा सामना होता, आणि शंभराव्या सामन्यात त्याने गोल करण्याचा पराक्रम गाजवला. सुआरेझने उरुग्वेसाठी १०० सामन्यांत सर्वाधिक ५२ गोल झळकावले आहेत. तसेच तीन विश्वचषकात गोल करणारा लुई सुआरेझ हा पहिलाच उरुग्वेयन खेळाडू ठरला आहे. याआधी सुआरेझनं २०१० आणि २०१४ सालच्या फिफा विश्वचषकात गोल डागले होते.

  • लुई सुआरेझ – दी गुड दी बॅड अँड दी अग्ली

व्यावसायिक फुटबॉलमध्येही लुई सुआरेझची कामगिरी तितकीच बोलकी आहे. सुआरेझ सध्या स्पेनच्या बार्सिलोना संघाचं प्रतिनिधित्व करतो. बार्सिलोनासाठी सुआरेझने १९८ सामन्यांत १५२ गोल केले आहेत. याआधी सुआरेझ इंग्लंडच्या लिव्हरपूलकडून खेळायचा. लिव्हरपूलसाठी सुआरेझने १३३ सामन्यांत ८२ गोल झळकावले आहेत. नेदरलँड्सच्या आएक्सकडून खेळतानाही त्याने आपल्या कामगिरीचा ठसा उमठवला होता.

२०११ साली उरुग्वेला कोपा अमेरिका स्पर्धा जिंकून देण्यात सुआरेझनं सिंहाचा वाटा उचलला. या स्पर्धेत सुआरेझनं चार गोल करत स्पर्धेतला सर्वोत्तम खेळाडू बनण्याचा मान मिळवला.  दक्षिण आफ्रिकेत झालेल्या २०१० च्या विश्वचषकात सुआरेझनं ६ सामन्यांत ३ गोल झळकावले. कोरियाविरुद्ध दोन गोल करत सुआरेझनं उरुग्वेला उपांत्यपूर्व फेरीत पोहोचवण्यास मदत केली होती. सुआरेझनं २०१४ च्या विश्वचषकातही इंग्लंडविरुद्ध सामन्यात दोन गोल केले होते.

पण उरुग्वेचा हा गुणी खेळाडू नेहमीच वादात राहिला. अगदी लहानपणापासूनचं वादानं सुआरेझचा पाठलाग काही सोडला नाही. मग वयाच्या पंधराव्या वर्षी पंचांना मारलेला हेडबट असो कीवंशभेदासारखा लागलेला गंभीर आरोप. सुआरेझ मैदानात गोल करण्याच्या कौशल्यासाठी जितका प्रसिद्ध राहिला तितकाच तो अनेक वादांसाठीही. सुआरेझनं ८ फेब्रुवारी २००७ साली कोलंबियाविरुद्धच्या सामन्यांत उरुग्वेसाठी पदार्पण केलं. आपल्या पहिल्याच सामन्यात त्याला रेड कार्डला सामोरं जावं लागलं.

फुटबॉल जगतातला विवादांचा राजा म्हणून लुई सुआरेझची ओळख आहे. लुई सुआरेझ सर्वात पहिल्यांदा वादाच्या भोवऱ्यात सापडला तो म्हणजे २०१० साली. नेदरलँड्सच्या आएक्स आणि पीएसव्ही संघांमध्ये सामना सुरु होता. आएक्सचं प्रतिनिधित्व करणाऱ्या लुई सुआरेझनं यावेळी पीएसव्हीच्या ओटमॅन बकलच्या खांद्याचा चावा घेतला होता. त्यावेळी सुआरेझवर ७ सामन्यांची बंदी घालण्यात आली होती. नेदरलँड्सच्या वर्तमानपत्रांनी सुआरेझचं नाव ‘कॅनिबल ऑफ आएक्स’ असं ठेवलं होतं. पण त्यानंतरही सुआरेझ काही सुधारला नाही.

२०१० साली सुआरेझनं इंग्लंडच्या लिव्हरपूल संघाशी करार केला. २०११ च्या मोसमात सुआरेझनं मॅनचेस्टर युनायटेडच्या पॅट्रिस एव्हरावर वर्णभेदी टिपण्णी केली होती. त्यावेळीही सुआरेझवर ८ सामन्यांची बंदी घातली होती. २०१३ साली सुआरेझचे दात पुन्हा शिवशिवले, आणि चेल्सीविरुद्ध सामन्यात सुआरेझनं थेट ब्रानिस्लाव्ह इव्हानोविचच्या उजव्या हाताचा चावा घेतला. यावेळीही इंग्लंडच्या फुटबॉल असोसिएशनने सुआरेझवर १० सामन्यांची बंदी घातली.

व्यावसायिक फुटबॉलमध्ये वादाच्या भोवऱ्यात अडकणाऱ्या सुआरेझनं फिफा विश्वचषकातही मोठं वाद आपल्या अंगावर ओढवून घेतले आहेत. २०१० साली सुआरेझ पहिल्यांदा विश्वचषकात खेळला. त्या विश्वचषकात सुआरेझनं घानाविरुद्ध उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात हटकून बॉल हातानं अडवला. हा बॉल जर जाळ्यात गेला असता तर उरुग्वेचा पराभव निश्चित होता. पण हातानं बॉल अडवल्यानं सुआरेझला रेड कार्ड देण्यात आलं, तसेच घानाला पेनल्टी किक बहाल करण्यात आली. मात्र घानाच्या असामोह ग्यानला पेनल्टी किकवर गोल करण्यात अपयश आलं. इतकच नाही तर या सामन्यात उरुग्वेनं पेनल्टी शूटआऊटमध्ये ४-२ असा विजयही मिळवला होता. मग ब्राझिलमध्ये झालेल्या विश्वचषकातही सुआरेझ पुन्हा एकदा वादात अडकला. एखाद्या बाळाला जशी चावण्याची सवय असते तशी सुआरेझला सवय होती की काय असं वाटत होतं. इटलीविरुद्धच्या सामन्यात सुआरेझनं जॉर्जियो चिलीनीच्या खांद्याचा चावा घेतला. हा चावा इतका जोरदार होता की चिलीनीच्या खांद्यावर सुआरेझच्या दातांचे व्रण स्पष्टपणे दिसत होते. सुआरेझच्या या चावरेपणासाठी फिफानं त्याच्यावर ९ आंतरराष्ट्रीय सामन्यांची बंदी घातली होती.

सलग दोन विश्वचषकात वादाच्या भोवऱ्यात सापडणाऱ्या सुआरेझनं यंदा तरी नीट वागावं अशी अपेक्षा सर्वजण करत आहेत. सुआरेझ सध्या आक्रमणात चांगल्या फॉर्मात आहे. वेग, ड्रिब्लिंग, उर्जा आणि चेंडूवर ताबा मिळवण्याचं त्याचं कौशल्य अफलातून आहे. क्षणार्धात सामन्याचं चित्र बदलण्याची ताकद त्याच्यात आहे. त्यामुळेचं उरुग्वेला सुआरेझकडून आता बाद फेरीतही चांगल्या कामगिरीची अपेक्षा आहे.

  • आपल्या प्रतिक्रीया vijay.majha@gmail.com या इमेल आयडीवर कळवा

 

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 21, 2018 4:22 pm

Web Title: fifa world cup 2018 russia suarez scored goal in his 100th international game critical analysis of his career
टॅग : FIFA 2018
Next Stories
1 FIFA World Cup 2018 : पराभवानंतर पत्नीकडून फुटबॉलपटूचे ‘हृदयस्पर्शी’ सांत्वन; सोशल मिडीयाही भावूक
2 FIFA World Cup 2018: डिएगो कोस्टाने तारले; अथक संघर्षानंतर स्पेनची इराणवर १- ० ने मात
3 FIFA World Cup 2018 : फ्रान्सला दिमाखात बाद फेरी गाठण्याची संधी
Just Now!
X