उरुग्वेनं यजमान रशियाचा ३-० असा धुव्वा उडवून फिफा विश्वचषकाच्या ग्रुप एमध्ये अव्वल स्थान मिळवलं. समारा अरेनामध्ये झालेल्या या सामन्यात लुई सुआरेझनं १० व्या मिनिटाला गोल करुन उरुग्वेचं खातं उघडलं. मग रशियाच्या चेरेशेव्हनं २३ व्या मिनिटाला स्वयंगोल केल्यानं उरुग्वेची आघाडी २-० अशी वाढली. सामन्याच्या ३६ व्या मिनिटाला रशियाच्या स्मोलनिकोव्हला रेड कार्ड दाखवण्यात आलं. त्यामुळे जवळपास तासभर रशियाला १० खेळाडूंसहच खेळावं लागलं. पूर्वार्धात उरुग्वेनं २-० अशी आघाडी कायम राखली. सामना संपायला अखेरची तीन मिनिटं शिल्लक असताना एडिनसन कवानीने गोल झळकावून उरुग्वेच्या ३-० अशा विजयावर शिक्कामोर्तब केलं. विशेष म्हणजे साखळी फेरीतल्या उरुग्वेविरुद्ध एकाही प्रतिस्पर्ध्याला गोल डागता आला नाही. म्हणजेच उरुग्वेच्या बचावफळीनं साखळीत दमदार कामगिरी बचावली. अशी कामगिरी करणारा उरुग्वे हा १९९८ नंतरचा पहिलाच संघ ठरला. आता बाद फेरीत उरुग्वेसमोर पोर्तुगाल किंवा स्पेनचं कडंव आव्हान असू शकतं.