फुटबॉल वर्ल्डकपमध्ये यजमान रशियाची विजयी घौडदौड सुरुच असून दुसऱ्या सामन्यात रशियाने इजिप्तवर ३- १ ने विजय मिळवला. वर्ल्डकपमध्ये सलग दुसरा सामना जिंकण्याची ही रशियाची पहिलीच वेळ असून या विजयासह रशियाने बाद फेरीच्या दिशेने आणखी एक पाऊल पुढे टाकले आहे.

फुटबॉल वर्ल्डकपमध्ये पहिल्या सामन्यात रशियाने सौदी अरेबियावर दणदणीत विजय मिळवल्याने संघाचा आत्मविश्वास दुणावला होता. तर दुसरीकडे मोहम्मद सलाहच्या आगमनामुळे इजिप्तच्या संघाला दिलासा मिळाला होता. मंगळवारी हे दोन्ही संघ सेंट पीटर्सबर्ग स्टेडियममध्ये आमनेसामने आले. मध्यंतरापर्यंत दोन्ही संघांना एकही गोल करता आला नाही. त्यामुळे हा सामना चुरशीचा होणार असे दिसत होते. मात्र, ४७ व्या मिनिटाला इजिप्तच्या अहमद फतीने स्वयंगोल केला आणि रशियाला १- ० अशी आघाडी मिळाली. या गोलने सामन्याचे चित्रच बदलले.

रशियासाठी ५९ व्या मिनिटाला डेनिस चेरीशेव्ह आणि आर्टेम झयूबाने ६२ व्या मिनिटाला गोल केला आणि संघाला ३- ० अशी आघाडी मिळवून दिली. या आघाडीमुळे रशियाचा विजय जवळपास निश्चितच झाला होता. इजिप्तची मदार मोहम्मद सलाहवर होती. दुखापतीतून सावरुन संघात परतलेल्या सलाहला रशियाच्या बचावपटूंनी अडकवून ठेवले आणि त्याला गोल करण्याची संधी मिळाली नाही. ७३ व्या मिनिटाला रशियाच्या चुकीमुळे मिळालेल्या पेनल्टीवर सलाहने संघासाठी पहिला गोल मारला. सलाहचादेखील हा वर्ल्डकपमधील पहिलाच गोल ठरला आहे. पण सलाह संघाचा पराभव रोखू शकला नाही. रशियाने इजिप्तवर ३- १ ने मात केली. १९९० नंतर रशियाने पहिल्यांदाच वर्ल्डकपमध्ये सलग दुसरा विजय मिळवला.

या विजयासह रशियाने तीन गुण मिळवून ‘अ’ गटातील अव्वल स्थान अबाधित राखले आहे. तसेच या विजयामुळे रशियाचे बादफेरीतील स्थान जवळपास निश्चित झाले आहे. रशियाने दोन सामन्यात तब्बल ८ गोल मारले आहेत. आठ गोलसह रशियाने यजमान देशाने पहिल्या दोन सामन्यांत डागलेल्या सर्वाधिक गोलची बरोबरी केली. याआधी १९३४ साली इटलीने आठ गोल केले होते.

तर दुसरीकडे २८ वर्षांनंतर वर्ल्डकपसाठी पात्र ठरलेल्या इजिप्तला अजूनही पहिल्या विजयाची प्रतीक्षा कायम आहे. सलग दुसऱ्यामुळे इजिप्तचे वर्ल्डकपमधील आव्हान जवळपास संपुष्टात आले आहे.