FIFA World Cup 2018 SEN vs COL : फिफा विश्वचषक स्पर्धेत आज एच गटातील निर्णायक लढतीत कोलंबियाने सेनेगलला १-० अशा फरकाने पराभूत केले. कोलंबियाने हा सामना जिंकत ६ गुणांसह गटात अव्वल स्थान पटकावले आणि स्पर्धेच्या बाद फेरीत धडक मारली. या सामन्यातील पराभवामुळे सेनेगलचे अखेरीस ३ सामन्यात ४ गुण होते. परंतु याच वेळी झालॆल्या दुसऱ्या सामन्यात जपाननेही सामन्याअंती तीन सामन्यात ४ गुण मिळवले. त्यामुळे फेअर प्ले गुणांच्या आधारावर जपानला बाद फेरीचे तिकीट मिळाले, तर सेनेगलचा संघ स्पर्धेबाहेर फेकला गेला.

हा सामना निर्णायक असल्याने या सामन्यात जोरदार टक्कर पाहायला मिळेल, अशी चाहत्यांची अपेक्षा होती. पण तसे घडले नाही. सामन्यात केवळ कोलंबियाकडून १ गोल पाहायला मिळाला. येरी मिना याने ७४व्या मिनिटाला गोल केला. त्याचा एकमेव गोल निर्णायक ठरला आणि सामना कोलंबियाने जिंकला.