FIFA World Cup 2018 Serbia vs Switzerland: फुटबॉल वर्ल्डकपमध्ये स्वित्झर्लंडने सर्बियावर २-१ ने मात केली. मध्यंतरापर्यंत  ० -१ ने पिछाडीवर असलेल्या स्वित्झर्लंडने सामन्यात पुनरागमन करत सर्बियावर २ – १ ने मात केली. पिछाडीवर असलेल्या संघाने पुनरागमन करत प्रतिस्पर्धी संघावर मात केल्याची यंदाच्या वर्ल्डकपमधील ही पहिलीच वेळ आहे.  ग्रेनिट जाका आणि शकीरी या दोघांमुळे स्वित्झर्लंडला हा विजय मिळाला.

मॉस्कोतील कॅलिनीग्राड स्टेडियममध्ये शुक्रवारी रात्री स्वित्झर्लंड विरुद्ध सर्बिया हा सामना पार पडला. दोन्ही देशांकडे फारसे नावाजलेले खेळाडू नसले तरी दोन्ही संघांचा सध्या फॉर्म पाहता लढत अटीतटीची होणार, असे दिसत होते. या दोन्ही संघांचा इतिहास पाहता पारडे सर्बियाच्या बाजूने झुकत होते. अपेक्षेनुसार सामन्याच्या चौथ्या मिनिटालाच सर्बियाच्या मित्रोविचने गोल मारत संघाला १- अशी आघाडी मिळवून दिली. सर्बियाच्या बचावपटूंनी स्वित्झर्लंडला रोखल्याने मध्यंतरापर्यंत सर्बियाकडे १- ० अशी आघाडी होती.

 

मध्यंतरानंतर स्वित्झर्लंडच्या उत्कृष्ट खेळ केला. स्वित्झर्लंडतर्फे ५२ व्या मिनिटाला ग्रेनिट जाकाने पहिला गोल मारुन संघाला १- १ अशी बरोबरी मिळवून दिली. सामना संपण्यासाठी काही मिनिटांचा अवधी असताना दोन्ही संघ १- १ असे बरोबरीत होते. मात्र निर्णायक क्षणी शकीरी स्वित्झर्लंडच्या मदतीला धावून आला. शकीरीने ९० व्या मिनिटाला अप्रतिम गोल मारला. या गोलमुळे स्वित्झर्लंडला २- १ अशी विजयी आघाडी मिळाली.

सर्बियाचे खेळाडू मैदानावरील हालचालीत अधिक तेज असतात. त्याचा फायदा सर्बियाला झाला असता. पण  अतिआक्रमकपणा आणि मोक्याच्या क्षणी केलेल्या चुकांमुळे त्यांना पराभवाचा सामना करावा लागला. यापूर्वी स्वित्झर्लंडसोबत झालेल्या १३ सामन्यांमध्ये सर्बिया केवळ दोन वेळाच पराभूत झाला होता.  शुक्रवारच्या विजयासह ई गटात स्वित्झर्लंड चार गुणांसह दुसऱ्या स्थानी आहे. या गटात ब्राझीलही चार गुणांसह अव्वल स्थानी आहे. स्वित्झर्लंडकडे सर्वाधिक वेळ चेंडू होता. स्वित्झर्लंडने २० तर सर्बियाने १७ वेळा प्रयत्न केला. शांत डोक्याने खेळ खेळल्याने हा विजय मिळाल्याचे शकीरीने सांगितले.