धनंजय रिसोडकर – response.lokprabha@expressindia.com
फुटबॉल या वेगवान खेळात महत्त्व असतं ते आक्रमकपणाला. त्यामुळे गोल करणाऱ्या खेळाडूचाच बोलबाला होतो. पण महत्त्वाची भूमिका पार पाडणाऱ्या गोलरक्षकाला मात्र फारसं महत्त्व दिलं जात नाही.

कोणत्याही किल्ल्याची बांधणी करताना त्यात बुरुजांसाठी अभेद्य स्वरूपाच्या विशेष कातळाचा उपयोग केला जायचा. कारण बुरूज ढासळला तर किल्ला शत्रू हाती पडणार, ही काळ्या दगडावरची रेघ होती. त्यामुळेच जर विजयाचा ‘गड’ राखायचा असेल तर प्रतिस्पर्धी आक्रमक खेळाडूंच्या पल्लेदार तोफांना रक्षक फळीच्या भक्कम तटबंदीचे प्रत्युत्तर हवे आणि त्या तटबंदीला ‘गोलरक्षक’नामक अभेद्य बुरूज किल्ल्याला असणे अत्यावश्यक असते. अशाच अभेद्य अन् उत्तुंग कर्तृत्वाचे ‘बुरूज’ मानल्या गेलेल्या जुन्या तसंच येत्या विश्वचषकातील संभाव्य सर्वोत्तम गोलरक्षकांच्या कर्तृत्वाचा हा धांडोळा.

‘आक्रमण हे तुम्हाला सामना जिंकून देऊ शकते. मात्र, स्पर्धा जिंकायची असेल तर तुमचा बचावच भक्कम लागतो.’ हे वाक्य फुटबॉलशौकिनांना तोंडपाठ आहे. तरीदेखील बचावाचा कणा आणि अंतिम तटबंदी असलेल्या फुटबॉल गोलकीपरला (गोलरक्षक)प्रसिद्धीत नेहमीच डावलले जाते, हे वास्तव आहे. खेळांमध्ये जो गोल करतो, त्या आक्रमणपटूंचाच नेहमी बोलबाला होत असतो. मात्र, जो त्या २४ फूट बाय ८ फुटाच्या घरात (गोलपोस्टमध्ये) थांबून हल्ले रोखतो, परतवून लावतो आणि प्रसंगी अप्रतिम पास देऊन गोल करण्याची संधी उपलब्ध करून देतो तो गोलरक्षक मात्र फारसा कधीच चर्चेत नसतो. कोणत्याही विजयाची नोंद ही नेहमी कोणत्या देशाने (आणि आक्रमणपटूने ) किती गोल केले ते सांगूनच संपवली जाते. मात्र, त्याच देशाच्या गोलरक्षकाने किती गोल वाचवले, किती रोखले, किती परतवून लावले त्याची कुठेच नोंद नसते. फुटबॉलच्या विश्वचषकातही कमी-अधिक प्रमाणात तेच चित्र दिसून येते. त्यामुळेच आजपर्यंतचे विश्वचषक गाजवलेल्या, संघाला विजेतेपद पटकावून देणाऱ्या आणि यंदाच्या फुटबॉल विश्वचषकात ज्यांच्या नावाचा दबदबा राहण्याची शक्यता आहे, अशा गोलरक्षकांचा लेखाजोखा मांडण्याचा हा प्रयास आहे.

यंदाच्या विश्वचषकात ज्या पाच-सहा गोलरक्षकांचा दबदबा राहण्याची शक्यता आहे. त्यात प्रामुख्याने जर्मनीच्या मॅन्युअल नॉयरचे (बायर्न म्युनिच) नाव प्रामुख्याने घेतले जाते. पायाला झालेल्या दुखापतीमुळे तीन महिन्यांहून अधिक काळ संघाबाहेर असूनदेखील प्रशिक्षक जोकीम लो त्याच्या समावेशाबाबत आग्रही होते. त्यामुळे अगदी जूनच्या पहिल्या आठवडय़ात त्याची तंदुरुस्ती चाचणी घेऊन त्याला संघात समाविष्ट करून घेण्यात आले आहे, इतका तो जर्मनीसाठी महत्त्वाचा आहे. फुटबॉलप्रेमींमध्ये त्याच्या खास शैलीमुळे ‘स्विपर कीपर’ नावाने प्रख्यात असलेल्या नॉयरला ओलांडून बॉल जाळीत मारणे हे प्रतिस्पर्धी संघाच्या आक्रमणपटूंसाठी नेहमीच मोठे आव्हान असते. अत्यंत जलद हालचाली, समोरच्या आक्रमणपटूंचा अंदाज बांधून त्याप्रकारे झटपट हालचाल करण्याचे कौशल्य आणि कोणत्याही परिस्थितीत गोल रोखण्याची कलाच त्याला जगातला सध्याचा अव्वल गोलरक्षक म्हणून नावारूपाला येण्यास साहाय्यभूत ठरली आहे.

विश्वचषक दावेदारांमध्ये अजून एक महत्त्वाचा देश मानला जाणाऱ्या फ्रान्सच्या संरक्षणाला ह्य़ुगो लॉरीसचे कवच लाभलेले आहे. संघाचा कर्णधार आणि गोलरक्षक अशी दुहेरी जबाबदारी त्याच्यावर आहे. गतवेळचा विश्वविजेता जर्मनीचा कर्णधार व गोलरक्षक ऑलिव्हर कान्हचा विश्वचषक पटकावण्याचा वारसा पुढे चालवण्याचा त्याचा निर्धार आहे. अफलातून वेगवान हालचाली, जाळीतील प्रत्येक इंचावर असलेली त्याची हुकुमत आणि त्याला असलेली अनुभवाची जोड यामुळे त्याला सर्वोत्तम गोलरक्षकांच्या दावेदारांपैकी एक मानले जात आहे.

त्यापाठोपाठ स्पेनचा गोलरक्षक डेव्हिड डे गेआ (मँचेस्टर युनायटेड) हादेखील त्याच्या संघासाठी मोठा आधार आहे. स्पेनचे राष्ट्राध्यक्ष प्रेडो सँचेझ यांनी २०१६ साली त्याच्या लैंगिक वर्तणुकीमुळे त्याच्या सहभागावर आक्षेप घेतला होता. तरीदेखील तो त्याच्या कर्तृत्वावर संघातील स्थान टिकवून असून ही बाबच त्याच्या गोलरक्षणातील श्रेष्ठत्व अधोरेखित करणारी आहे. स्पेनच्या ‘टाका-टीका’ या जवळ जवळच पास देण्याच्या शैलीत भक्कम बचाव हे महत्त्वाचे अस्त्र असते. स्पेनच्या आयकेर कॅसियास यांचा खऱ्या अर्थाने वारसदार मानल्या जाणाऱ्या डेव्हिड याच्या कामगिरीवरदेखील यंदा स्पेनचे विश्वचषकातील भवितव्य अवलंबून असून तो विश्वचषकातील सर्वोत्तम गोलरक्षक ठरल्यास फुटबॉलशौकिनांना आश्चर्य वाटणार नाही.

संभाव्य विश्वविजेत्यांपैकी एक मानल्या जाणाऱ्या ब्राझीलच्या संघाचे आक्रमण हेच त्यांचे मुख्य अस्त्र असते. त्यामुळेच त्यांचा बचाव हा नेहमीच काहीसा कमकुवत असतो. मात्र, त्या कमकुवत बचावाला भेदत जरी प्रतिस्पर्धी पुढे आला तरी त्याला एडर्सन मोराएस (मँचेस्टर सिटी) यासारख्या दर्जेदार गोलरक्षकाला चकवावे लागणार आहे. त्याचे पाठबळ लाभले असल्यानेच ब्राझीलचा संघ यंदा बराचसा संतुलित भासत आहे. विजेच्या चपळाईने हालचाली करणारा एडर्सन हा ब्राझीलच्या संभाव्य विजेतेपदामधील महत्त्वाचा घटक ठरू शकतो. त्याशिवायदेखील ब्राझीलकडे अ‍ॅलिसन बेकर (रोमा) हा अजून अत्यंत प्रतिभावान गोलरक्षक असून कुणाला कशी संधी मिळते, त्यावर त्यांची कामगिरी अवलंबून राहणार आहे.

बेल्जिअमसारख्या लहानशा देशालादेखील यंदाच्या विश्वचषकात चांगले भवितव्य असल्याचे मानले जाते. त्यामागे त्यांचा गोलरक्षक थिबॉ कोटरेइस (चेल्सी) याच्या दक्ष कामगिरीबाबतचा विश्वासदेखील कारणीभूत आहे. अवघ्या १९ व्या वर्षी संघात येऊन त्याने बेल्जिअमला अनेक विजय मिळवून देण्यात महत्त्वाची भूमिका निभावली आहे. कोणत्याही प्रतिस्पध्र्याच्या हालचालींचा त्वरित अंदाज बांधण्याचे अफलातून कौशल्य त्याच्याकडे असून त्या बळावरच तो प्रतिस्पर्धी संघाचे गोल करण्याचे मनसुबे उद्ध्वस्त करतो. त्यामुळेच गत हंगामात त्याला गोल्डन ग्लोव्ह पुरस्कारानेदेखील गौरविण्यात आले आहे.

साखळी गटातून कसाबसा पुढे जाण्याची शक्यता इंग्लंडला राहणार आहे, ती त्यांचा अप्रतिम गोलरक्षक जॉर्डन पिकफर्ड (एव्हरटन) याच्या कामगिरीच्या भरवशावर. हॅरी केनचे आक्रमण आणि जॉर्डनचा बचावच इंग्लंडला उपांत्यपूर्व फेरीपर्यंत तरी नेऊ शकेल, असा त्यांच्या पाठीराख्यांना विश्वास आहे. साखळी फेरीतून पुढे जाण्याची शक्यता अगदी अशक्य कोटीतील असलेला एक देश म्हणजे कोस्टारिका. त्यांच्या ई गटात ब्राझील आणि स्वित्र्झलडसारखे दमदार संघ असल्याने ते साखळीतच गारद होण्याची चिन्हे असली तरी त्यांचा गोलरक्षक केथलोर नवास (रिअल माद्रिद) याच्या कामगिरीकडे फुटबॉलशौकिनांचे निश्चितच लक्ष लागलेले असेल. कोस्टारिकाचे नेतृत्वदेखील करणारा नवास साखळी सामन्यांमध्येदेखील त्याच्या अफलातून बचावाचे दर्शन घडवत प्रेक्षकांची पसंती मिळवण्यात यशस्वी होऊ शकतो. हे गोलरक्षकच यंदाच्या विश्वचषकात सर्वाधिक लक्षवेधी ठरण्याची चिन्हे आहेत.

लेव्ह यशीन ते गॉर्डन बँक्स

विसाव्या शतकातला सर्वोत्कृष्ट गोलरक्षक म्हणून ज्याचे नाव घेतले जाते, तो लेव्ह यशीन हा रशियाचा गोलरक्षक. रशियाला १९५६ साली ऑलिम्पिकमधील सुवर्ण मिळवून देण्यात त्याचा मोलाचा वाटा होता. त्याने त्याच्या कारकीर्दीत तब्बल १५० हून अधिक पेनल्टी वाचवल्या ही सगळ्यात मोठी कामगिरी म्हणता येईल. ‘बॅलोन डी ओर’ हा अत्यंत प्रतिष्ठेचा सन्मान लाभलेला एकमेव गोलरक्षक अशी त्याची ख्याती असून त्याच्या नावानेच १९९४ पासून ‘विश्वचषकातील सर्वोत्कृष्ट गोलरक्षक’ हा पुरस्कार प्रदान केला जातो. १९६५ पासूनच कारकीर्दीला प्रारंभ केलेला आणि १९८२चा विश्वचषक आपल्या नेतृत्वाखाली इटलीला मिळवून देणारा गोलरक्षक म्हणून डिनो झोफ्फ याची इतिहासात नोंद आहे. १९७०चे दशक गाजवलेला जर्मनीच्या सेप मायरने (बायर्न म्युनिच क्लब) देशासह क्लबला अनेक विजेतेपद मिळवून देण्यात योगदान दिले. त्याच काळातील इंग्लंडचा गॉर्डन बँक्स (लिसेस्टर सिटी) याला तर १९६६ ते १९७१ अशी सलग सहा वर्षे फिफाने ‘वर्षांतील सर्वोत्तम गोलरक्षक’ असा सन्मान देऊन गौरविले आहे. ब्राझीलचा जगविख्यात आक्रमणपटू पेलेची अनेक आक्रमणे परतवून लावणारा महान गोलरक्षक म्हणून त्याची इतिहासात नोंद आहे.

शिल्टॉन ते बुफॉन

साधारण १९७५ नंतर सर्वाधिक बोलबाला राहिलेल्या गोलरक्षकांमध्ये इंग्लंडच्या पीटर शिल्टॉनचा (लिसेस्टर सिटी) समावेश आहे. तब्बल ४० व्या वर्षांपर्यंत खेळून इंग्लंडकडून सर्वाधिक सामने खेळलेला गोलरक्षक म्हणून त्याची नोंद आहे. तसेच स्पेनचा अँडोनी झुबीझरिटा (बार्सिलोना) याची कारकीर्ददेखील प्रचंड गाजली होती. त्याने तब्बल चार विश्वचषकांमध्ये स्पेनचे प्रतिनिधित्व केले. त्याशिवाय डेन्मार्कचा पीटर श्मीकल (मँचेस्टर युनायटेड) याचादेखील ९०च्या दशकात बोलबाला होता. २००२ आणि २००३ साली त्याला सर्वोत्कृष्ट गोलरक्षक पुरस्काराने गौरविण्यात आले होते. त्याच काळात नेदरलॅण्डचा एडविन वॅन डर सार (अजॅक्स) याने त्याच्या वेगवेगळ्या क्लबसाठी एकूण २७ चषक पटकावण्यात योगदान देतानाच देशासाठीदेखील मोलाची भूमिका बजावली आहे. स्पेनचा आयकेर कॅसीलस (रेयाल माद्रिद) याला २००८ ते २०१२ अशी सलग पाच वर्षे सर्वोत्कृष्ट गोलरक्षक म्हणून सन्मानित करण्यात आले होते. फ्रान्सचा फॅबियन बार्थेस (मार्सेले) याची कारकीर्ददेखील प्रचंड गाजली. १९९८ च्या फुटबॉल विश्वचषक विजयात त्याचे योगदानदेखील अत्यंत मोलाचे होते. २०१४ चा विश्वचषक विजेत्या जर्मन संघाचा कर्णधार आणि गोलरक्षक असलेला ऑलिव्हर कान्ह हा गोल्डन बॉल मिळवणारा एकमेव गोलरक्षक आहे. तसेच २००२ च्या विश्वचषकातही सर्वोत्कृष्ट गोलरक्षक म्हणून त्याने पुरस्कार मिळवला होता. तर गत दोन दशकांतील सर्वोत्तम गोलरक्षक मानला जाणारा इटलीचा गिआनलुइगी बुफॉन (युवेंट्स) याने त्याच्या कारकीर्दीत २००६ साली देशाला फिफा विश्वचषकाचे विजेतेपद मिळवून दिले होते. १९९८ सालापासूनच्या पाच विश्वचषकांमध्ये देशाचे प्रतिनिधित्व करणारा आणि सलग पाच वर्षे सर्वोत्कृष्ट गोलरक्षक म्हणून सन्मानित करण्यात आले होते.

बुफॉनचा सहावा विश्वचषक हुकला

इटलीच्या सर्वकालीन महान फुटबॉलपटूंमध्ये गणना केला जाणारा गोलरक्षक म्हणजे जिऑनलुइगी बुफॉन. २००६ साली फ्रान्सविरुद्धच्या अंतिम सामन्यात झिदानसह सर्व आक्रमणपटूंना रोखून धरत संघाला पेनल्टी शूटआऊटमध्ये विजय मिळवून देण्यात बुफॉनचा सिंहाचा वाटा होता. मात्र यंदाच्या विश्वचषकात इटलीचा संघ पात्र ठरू शकला नाही. त्यामुळे अजून एकदा विश्वचषकात चमक दाखवण्याचे बुफॉनचे स्वप्न साकार होऊ शकले नाही. निराश झालेल्या ४० वर्षीय बुफॉनने थेट फुटबॉलमधूनच निवृत्ती पत्करल्याने सहाव्या विश्वचषकाचे त्याचे स्वप्न भंगले आणि त्याचे अप्रतिम बचाव पाहण्याची प्रेक्षकांची संधीदेखील हुकली आहे.