FIFA World Cup 2018 SWE vs ENG : फिफा विश्वचषक स्पर्धेत आज इंग्लंड आणि स्वीडन यांच्यात उपांत्यपूर्व फेरीचा सामना रंगला. या सामन्यात इंग्लंडने स्वीडनला २-० असे पराभूत केले. सामन्यात इंग्लंडकडून झालेले दोनही गोल हे ‘हेडर’ स्वरूपाचे झाले. इंग्लंडच्या खेळाडूंनी योग्य वेळी चेंडूला ‘डोकं लावून’ संघाला सामना जिंकवून दिला.

सामन्यात पूर्वार्धात ३०व्या मिनिटाला कॉर्नरवरून किक केलेल्या फुटबॉलला हॅरी मॅग्वायरने डोकं लावून दिशा दिली आणि इंग्लंडला १-० अशी आघाडी मिळवून दिली. कारकिर्दीतील पहिलाच आंतरराष्ट्रीय गोल वर्ल्डकपमध्ये करण्याचा मान त्याने मिळवला. असे करणारा हॅरी मॅग्वायर हा १३वा खेळाडू ठरला. पूर्वाधात इंग्लंड १-०ने आघाडीवर राहिली.

उत्तरार्धात स्वीडनकडून आक्रमक सुरुवात झाली. पण त्यानंतरचा खेळ हा इंग्लंडच्या वर्चस्वाखाली गेला. इंग्लंडने आक्रमक पवित्रा कायम ठेवत हल्ले सुरूच ठेवले. त्याचा फायदा इंग्लंडला ५८व्या मिनिटाला मिळाला. सामन्यातील आणखी एका कॉर्नर किकला योग्य वेळी डोकं लावून इंग्लंडने दुसरा गोल केला. डेले अली याने हा गोल करत इंग्लंकडून गोल करणारा ५वा खेळाडू ठरण्याचा मान मिळवला. त्यानंतर ही आघाडी कायम राखण्यात इंग्लंडला यश आले आणि त्यांनी स्पर्धेच्या उपांत्य फेरीत धडक मारली.