अत्यंत रोमांचक आणि अटीतटीच्या सामन्यात स्वीडनने स्वित्झर्लंडचा १-० ने पराभव करत उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. स्वीडनने २४ वर्षांनंतर उपांत्यपूर्व फेरीत जागा मिळवली. वर्ष १९९४ मध्ये फिफा विश्वचषकात स्वीडनचा संघ तिसऱ्या स्थानी राहिला होता. विशेष म्हणजे स्वीडनच्या संघातील प्रत्येक खेळाडु हा पहिल्यांदाच विश्वचषकातील उपांत्यपूर्व फेरीचा सामना खेळणार आहे. अत्यंत अटीतटीचा झालेला हा सामना स्वीडनने १-०ने जिंकला. उपांत्यपूर्व फेरीत स्वीडनचा सामना कोलंबिया किंवा इंग्लंडशी होईल.

सेंट पीटर्सबर्ग मध्ये खेळला गेलेला हा सामना दोन्ही संघाची परीक्षा घेणार ठरला. दोन्ही संघाचे संरक्षण जबरदस्त होते. पहिल्या हाफमध्ये दोन्ही संघांना काही संधी मिळाल्या. पण गोल करण्यात त्यांना यश आले नाही. हाफ टाईमपर्यंत सामना ०-० असा बरोबरीत होता. त्यानंतर दुसऱ्या हाफमध्ये दोन्ही संघानी आक्रमक पवित्रा घेतला. यात स्वीडनला ६६ व्या मिनिटाला यश आले. एमिल फोर्सबर्गने ६६ व्या मिनिटाला गोल करत स्वीडनला आघाडी मिळवून दिली. ही आघाडीच त्यांच्यासाठी निर्णायक ठरली.