यंदाच्या विश्वचषक स्पध्रेत स्पेनविरुद्धच्या पेनल्टी शूटआउटमध्ये रशियाचा गोलरक्षक इगोर अकिनफीवने केलेली कामगिरी विशेष लक्षणीय ठरली. यानिमित्त रशियाच्या सर्वात प्रसिद्ध गोलरक्षकाचं स्मरण समयोचित ठरेल. या असामान्य गोलरक्षकाचं नाव लेव याशिन. सहा फुटांपेक्षा अधिक उंची आणि सहसा काळ्या पोशाखातच मदानावर खेळण्याची सवय. गोलजाळ्यात त्याचा वावर भयप्रद असायचा. त्यातूनच ‘ब्लॅक स्पायडर’ हे नाव पडलं. १९५४ ते १९६७ या काळात याशिन तत्कालीन सोव्हिएत रशियाचा गोलरक्षक होता. हाच काळ रशियन फुटबॉलचं सुवर्णयुग ठरावा हा योगायोग नक्कीच नाही. ऑलिम्पिक सुवर्णपदक (१९५६), युरो अजिंक्यपद (१९६०), विश्वचषक १९६६मध्ये चौथे स्थान ही कामगिरी याच काळातली. याशिननं गोलरक्षकाच्या भूमिकेत क्रांतिकारी बदल केला. बचावपटूंना दम देणं, गोलक्षेत्राबाहेर वावरणं, पासिंगमध्ये सक्रिय राहणं हे याशिन नेहमी करायचा. तो स्वत अत्यंत तंदुरुस्त आणि चपळ होता. वाट्टेल त्या प्रकारे चेंडू थोपवायचा. व्यावसायिक आणि आंतरराष्ट्रीय कारकीर्दीत त्यानं तब्बल १५० पेनल्टी किक् थोपवल्या! २७० सामन्यांमध्ये गोल होऊ दिला नाही. दोन्ही अबाधित विक्रम. १९६३मध्ये ‘गोल्डन बॉल’चा मानकरी होता. आजतागायत हा सन्मान दुसऱ्या गोलरक्षकाला मिळालेला नाही.