फिफा विश्वचषक स्पर्धेत यजमान रशियाने २०१०मधील विश्वविजेता संघ स्पेनला पेनल्टी शूटआऊटमध्ये ४-३ ने हारवून उपउपांत्यपूर्व फेरीतील सामना जिंकून उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला आहे. दोन्ही संघांदरम्यान लुजिन्हकी स्टेडिअममध्ये खेळल्या गेलेल्या या सामन्यांत काटे की टक्कर पहायला मिळाली. पहिल्या हाफमध्ये दोन्ही संघांनी गोल करुन १-१ ने बरोबरी राखली होती. या सामन्यांत रशियाचा खेळाडू आयगर अकिनफिव्ह ‘मॅन ऑफ द मॅच’ ठरला. मी ‘मॅन ऑफ द मॅच’ नसून आमचा संघ आणि चाहते या पुरस्काराचे मानकरी असल्याचे त्याने म्हटले आहे.

पहिल्या हाफच्या सुरुवातीला रशियाच्या १२ मिनिटाला केलेल्या आत्मघाती गोलमुळे स्पेनला १-० अशी आघाडी मिळाली होती. तर दुसऱा हाफ संपण्याच्या काही वेळपूर्वी ४१व्या मिनिटाला रशियाकडून डज्युबाने शानदार गोल करुन स्कोर १-१ असा बरोबरीत राखला. तर दुसऱ्या हाफमध्ये दोन्ही संघांकडून एकही गोल झाला नाही. दोन्ही संघांनी दुसऱ्या हाफमध्ये गोलची आघाडी घेण्याचा प्रयत्न केला. मात्र, दोघेही अपयशी ठरले. यानंतर या सामन्यासाठी ३० मिनिटांचा अतिरिक्त वेळ देण्यात आला. मात्र, यातही सामन्याचा निकाल लागू शकला नाही. त्यानंतर दोन्ही सामन्यांदरम्यान पेनल्टी शूटआऊट खेळवला गेला. यामध्ये रशियाने २०१०मधील विश्वविजेता संघ स्पेनला ४-३ ने हारवून उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला.

दरम्यान, यजमान रशियाने उद्घाटनाच्या सामन्यात सौदी अरेबियाला ५-०ने मात दिली होती. मात्र, आपल्या गटातील शेवटच्या सामन्यात उरुग्वेसोबत झालेल्या सामन्यांत रशियाला हार पत्करावी लागली होती. या विश्वचषकात आजवर रशियाचा खेळ आक्रमक स्वरुपाचा राहिला आहे. मात्र, स्पेनसोबत झालेल्या या सामन्यात रशिया किती आक्रमक खेळ करते हे पाहणे औत्सुक्याचे होते. त्याप्रमाणे रशियाने खेळ केला असून विजयही मिळवला आहे.

आजवर विश्वचषक स्पर्धेत पेनल्टी शूटआऊटमध्ये यजमान संघ कधीही हारलेला नाही. तीच परंपरा या सामन्यांत रशियानेही कायम राखली असून पेनल्टी शूटआऊटमध्ये स्मार्ट खेळ करीत आपला विजय खेचून आणला.