सिद्धार्थ खांडेकर

विश्वचषक २०१८ मधून स्पेनचा संघ गारद झाल्यानंतर त्यांची सुप्रसिद्ध ‘टिकी-टाका’ शैली अस्तंगत झाल्याची चर्चा सुरू झाली आहे. खरं तर या शैलीचा किंवा तिच्या परिणामकारकतेचा ऱ्हास काही वर्षांपूर्वीपासून सुरू झालेला आहे. २०१२ मध्ये स्पेननं युरो चषक जिंकला. त्यानंतर एकाही स्पर्धेत त्यांना उपांत्यपूर्व फेरीच्याही पलीकडे जाता आलेलं नाही. विश्वचषक २०१४मध्ये त्यांचा खेळ गटसाखळीत खलास झाला होता. युरो २०१६ मध्ये त्यांना इटलीकडून दुसऱ्या फेरीत हार पत्करावी लागली. तेव्हा स्पेनच्या संघाचं सध्याच्या जर्मन संघाच्याही आधीपासून प्रथम थोडंफार आणि नंतर सर्व काही विस्कटू लागलं होतं.

मात्र या रेकॉर्डच्या काही वर्ष आधी याच स्पॅनिश संघानं धुमाकूळ घातला होता. प्रथम युरो २००८, नंतर विश्वचषक २०१० आणि नंतर युरो २०१२ अशी तीन अजिंक्यपदं पटकावणारा स्पेन हा एकमेव संघ आहे. युरोपातील फुटबॉलचे सत्ताकेंद्र असलेल्या जर्मनीला किंवा फ्रान्सलाही हे जमलेलं नाही. त्या काळात स्पॅनिश संघाच्या बरोबरीनं क्लब फुटबॉलमध्ये बार्सिलोनानं हुकमत गाजवली. दोन्ही संघांनी टिकी-टाका फुटबॉल पद्धतीचा थेट वा अप्रत्यक्ष अवलंब केला होता आणि किमान ती चार-सहा वर्ष तरी जवळपास कोणत्याही संघाला त्या पद्धतीविरुद्ध निश्चित उत्तर सापडलेलं नव्हतं. आज या पद्धतीवर मृत्युलेख लिहिणाऱ्यांनी या वास्तवाकडे जरा दुर्लक्ष केल्यासारखं वाटतं.

स्पॅनिश समालोचक आंद्रेस मोंतेस यांनी विश्वचषक २००६ स्पर्धेदरम्यान टिकी-टाका हा शब्दप्रयोग पहिल्यांदा आणि नंतर वारंवार केला. स्पेनचा सामना टय़ुनिशियाबरोबर होता. स्पॅनिश फुटबॉलपटूंच्या अचूक, लहान-लहान पासेसच्या खेळाचं वर्णन करताना मोंतेस यांनी टिकी-टाकातून खेळाचा ऱ्हिदम ध्वनित करण्याचा प्रयोग केला. त्या स्पर्धेत स्पेननं गटात चांगली कामगिरी केली, पण दुसऱ्या फेरीत त्यांना फ्रान्सनं पराभूत केलं. वेग आणि ताकद नसलेल्या स्पॅनिश खेळाडूंना आंतरराष्ट्रीय फुटबॉल स्पर्धामध्ये चमकण्यासाठी काही तरी वेगळ्या व्यूहरचनेचा आणि पद्धतीचा (टॅक्टिक्स अँड फॉर्मेशन) अवलंब करावा लागेल, असं स्पॅनिश फुटबॉल धुरिणांना वाटू लागलं. टिकी-टाकाचा जन्म हा अशा प्रकारे एका अपरिहार्यतेतून झाला. चेंडूचा ताबा मिळवून तो राखणं, मैदानाच्या लांबी-रुंदीचा अधिकाधिक वापर करणं, आडवे पण छोटे पासेस देत प्रतिस्पध्र्याच्या भागामध्ये समोरील बचावफळीतील फटी शोधत राहणं आणि यामुळे समोरचे बेजार होऊन आपापल्या जागा (पोझिशन्स) सोडून पुढे सरकल्यावर गोलक्षेत्रात धडकणं हे टिकी-टाकाचं वैशिष्टय़. ते एकदम आत्मसात होणं शक्य नव्हतं.

स्पेनमध्ये विशेषत: बार्सिलोना क्लबमध्ये ‘पझेशन फुटबॉल’शी संबंधित काही प्रयोग होत होते. बार्सिलोना क्लबला उत्तम डच प्रशिक्षक लाभले. योहान क्रायुफ, लुइस व्हॅन गाल, फ्रँक रायकार्ड अशा डच प्रशिक्षकांचा बार्सिलोनाच्या शैलीवर विलक्षण प्रभाव होता. यांतील योहान क्रायुफ म्हणजे फुटबॉलमधील एक असामान्य व्यक्तिमत्त्व. विश्वचषक १९७४ मध्ये त्यांनी डच संघाला ‘टोटल फुटबॉल’च्या माध्यमातून अंतिम फेरीत पोहोचवलं. टोटल फुटबॉलचे जनक होते त्या वेळच्या डच संघाचे प्रशिक्षक रिनस मिकेल्स. ते काही काळ आयॅक्स या डच क्लबचे प्रशिक्षक होते. क्रायुफ हेही आयॅक्सकडून खेळायचे. या दोघा गुरू-शिष्यांनी टोटल फुटबॉलचा करिश्मा मैदानावर सादर केला. टोटल फुटबॉलमध्ये प्रत्येक खेळाडू कोणत्याही पोझिशनला खेळतो आणि त्याची पोझिशन सतत बदलत राहते. या प्रकारच्या शैलीसाठी जबरदस्त तंदुरुस्ती आणि क्षमता असलेले तगडे फुटबॉलपटू लागतात. क्रायुफ १९८८ ते १९९६ या काळात बार्सिलोनाचे प्रशिक्षक होते. पुढे व्हॅन गाल आणि रायकार्ड यांनी ही परंपरा सांभाळली. टोटल फुटबॉलमध्ये खेळाडू पोझिशन बदलतात. टिकी टाकामध्ये चेंडूला सगळीकडे फिरवलं जातं. २००८ ते २०१२ या काळात पेप गार्डियोला बार्सिलोनाचे प्रशिक्षक होते.

साधारण याच काळात बार्सिलोनाच्या ‘ला मासिया’च्या अ‍ॅकॅडमीत काही गुणवान मुलं प्रशिक्षण घेऊन बाहेर पडली होती. चापल्य आणि ताकद नव्हती, कारण उंची बेताची होती. पण पायांमध्ये विलक्षण कौशल्य होतं. तांत्रिक पकड उत्तम होती. हे तरुण होते शावी हर्नाडेझ, आंद्रेस इनिएस्टा, प्रेडो, सेस फाब्रेगास आणि लिओनेल मेसी! या तरुणांचं कौशल्य आणि डच प्रशिक्षकांचा वारसा यांच्या संगमातून, गार्डियोला यांच्या प्रेरणेतून टिकी-टाका पद्धती जन्माला येऊ लागली.            (पूवार्ध)