ट्युनिशियाने जबरदस्त कामगिरी करत फिफा विश्वचषकातील ‘ग’ गटाच्या आपल्या अखेरच्या सामन्यात पनामाचा २-१ ने पराभव केला. सारांस्क येथे गुरूवारी रात्री खेळवण्यात आलेल्या सामन्यात ट्युनिशियाकडून बेन योसेफ आणि वाहबी खाजरीने गोल केला. तर मेरिहाच्या आत्मघातकी गोलमुळे पनामाला एका गोलची भेट मिळाली. ट्युनिशियाने भलेही सामना जिंकला असला तरी बादफेरीसाठी ते पात्र ठरलेले नाहीत. पनामालाही पराभवानेच विश्वचषकाचा निरोप घ्यावा लागला.

विशेष म्हणजे या सामन्यात ट्युनिशियाच्या बेन योसेफने फिफा विश्वचषकाच्या इतिहासातला ऐतिहासिक गोल केला. बेन योसेफचा हा गोल फिफा विश्वचषकातला २५०० वा गोल ठरला.

सारांस्कमध्ये खेळल्या गेलेल्या या सामन्यात पनामाला ३३ व्या मिनिटाला मेरिहाने केलेल्या आत्मघातकी गोलमुळे आघाडी मिळवता आली. ही आघाडी हाफ टाईमपर्यंत कायम राहिली. त्यानंतर बेन योसेफने ५१ व्या मिनिटाला शानदार गोल केला. या गोलमुळे ट्युनिशियाला बरोबरी साधता आली. वाहबी खाजरीने ६६ व्या मिनिटाला गोल करत ट्युनिशियाला आघाडी मिळवून दिली. ही आघाडी शेवटपर्यंत कायम राहिली.

ट्युनिशियाला साखळी लढतीत आपल्या पहिल्या सामन्यात इंग्लंडकडून १-२ ने पराभव स्वीकारावा लागला होता. तर बेल्जियमविरूद्धच्या सामन्यात तर ते २-५ अशा फरकाने पराभूत झाले होते. पनामासाठी विश्वचषकाचा प्रवास विशेष राहिला नाही. त्यांचा बेल्जियमकडून ३-० आणि इंग्लंडकडून ६-१ ने हार पत्कारावी लागली होती.