सलग तिसऱ्यांदा उपउपांत्यपूर्व फेरी गाठण्यासाठी उरुग्वे उत्सुक

निझ्नी नोव्हगोरोड : उरुग्वे संघाला आपल्या प्रेक्षणीय खेळाने अनेक सामन्यात एकहाती विजय मिळवून देणारा लुईस सुआरेझ बुधवारी एका ऐतिहासिक सामन्याकडे वाटचाल करणार आहे. कारकीर्दीतील १००वा आंतरराष्ट्रीय सामना खेळण्यासाठी सज्ज झालेला सुआरेझ उरुग्वेला विश्वचषक फुटबॉल स्पर्धेची उपउपांत्यपूर्व फेरी गाठून देण्यासाठी सर्वस्व पणाला लावेल, यात शंका नाही. त्यामुळेच सौदी अरेबियासारखा तुलनेने कमकुवत संघ त्याला कसा रोखतो, हे पाहणे रंजक ठरेल.

विश्वचषकाच्या पहिल्या सामन्यात उरुग्वेने इजिप्तला १-० असे पराभूत केले. मात्र सुआरेझला त्या सामन्यात इजिप्तच्या बचावपटूंनी चांगलेच जखडून ठेवले होते. त्यामुळे सौदी अरेबियाविरुद्ध त्या अपयशाची भरपाई करण्यासाठी तो उत्सुक असेल. तसेच गेल्या दोन विश्वचषकात सुआरेझ विवादास्पद गोष्टींसाठी जास्त चर्चेत राहिला आहे. २०१०च्या विश्वचषकात त्याने घानाविरुद्धच्या सामन्यात हाताने चेंडू अडवला होता, तर २०१४च्या विश्वचषकात इटलीच्या गिओर्जिओ चिलिनीला चावल्यामुळे त्याला स्पर्धेतून बाहेर काढण्यात आले. मात्र तरीही ३१ वर्षीय सुआरेझचे जगभरात चाहते पसरलेले आहेत.

सामना क्र. १९

गट अ

उरुग्वे वि.  सौदी अरेबिया

स्थळ : रोस्तोव्ह एरिना

वेळ : रात्री ८:३० वा.