सिद्धार्थ खांडेकर

सलग चौथ्या विश्वचषक स्पर्धेत यंदा लॅटिन अमेरिकेतून जगज्जेता दिसणार नाही. गेल्या तीन स्पर्धामध्ये दुसऱ्यांदा उपांत्य फेरीतील चार संघांमध्ये लॅटिन अमेरिकेतला एकही संघ नव्हता. २००६पर्यंत लॅटिन अमेरिका आणि युरोप या दोन सत्ताकेंद्रांच्या वाटय़ाला तोवर १८ पैकी प्रत्येकी नऊ जगज्जेतेपदं होती. येत्या १५ जुलै रोजी कोणताही संघ जगज्जेता ठरला, तरी हे पारडं युरोपच्या बाजूने १२-९ असं झुकलेलं दिसेल. फुटबॉल या खेळाची लोकप्रियता जगभर पसरली याचं एक प्रमुख कारण म्हणजे वसाहतवादी, समृद्ध युरोपीय देशांइतकेच तुलनेनं मागास आणि बराच काळ वसाहत राहिलेले लॅटिन अमेरिकेतील तीन देश बऱ्यापैकी सातत्यानं जगज्जेते बनताना दिसत होते. त्यांची तरल, आकर्षक शैली हा तर स्वतंत्र अभ्यासाचा विषय राहिला. याच देशांमुळे आफ्रिकी आणि आशियाई देशांनाही स्फूर्ती मिळत राहिली. त्यामुळे अलीकडच्या काळात या समीकरणातील बिघडलेला समतोल हा फुटबॉलरसिकांसाठी बऱ्यापैकी उद्वेगजनक ठरू लागलाय. ही परिस्थिती पालटण्यासाठी नेहमीच ब्राझील आणि अर्जेटिनाकडे पाहिलं जातं. या दोन बडय़ा देशांच्या तुलनेत उरुग्वेची कामगिरी झाकोळली जाते. त्याचं एक महत्त्वाचं कारण म्हणजे उरुग्वेची दोन्ही जगज्जेतेपदं फार पूर्वीची म्हणजे १९३० आणि १९५०मधील आहेत. तरीही गेल्या काही स्पर्धामध्ये त्यांनी खूपच चांगली कामगिरी केलेली आहे. आणखी एक अत्यंत महत्त्वाची बाब म्हणजे, दीर्घकालीन विकासाच्या अनेक चांगल्या योजना उरुग्वेमध्ये राबवल्या जात आहेत. त्या तुलनेत ब्राझील अजूनही नेमक्या प्रारूपाच्या शोधात आहे. अर्जेटिनात तर त्या आघाडीवरही प्रचंड गोंधळ आहे. त्यामुळे भविष्यात लॅटिन अमेरिकेतील जगज्जेता उरुग्वे ठरल्यास फार आश्चर्य वाटायला नको!

ब्राझील, जर्मनी, इटली, अर्जेटिना, उरुग्वे, इंग्लंड, फ्रान्स आणि स्पेन या आजवरच्या आठही जगज्जेत्यांवर नजर टाकल्यास एक ‘पॅटर्न’ स्पष्ट होतो. यांतील काही आकारानं अजस्र आहेत, तर काही आर्थिक बाबतीत समृद्ध. अपवाद उरुग्वे. हा देश चिमुकला आहे आणि त्याची अर्थव्यवस्थाही फार मोठी नाही. दोन जगज्जेतेपदं, पहिल्या विश्वचषक स्पर्धेचं यजमानपद, त्याच्या जरा आधी पाठोपाठची ऑलिम्पिक सुवर्णपदकं, सर्वाधिक कोपा अमेरिका अजिंक्यपदं वगैरे फुटबॉलचा मोठा इतिहास या देशाला आहे. पण या देशाचं सर्वात अलीकडचं कोपा अमेरिका अजिंक्यपद २०११मधील आहे. निव्वळ फुटबॉल आसक्ती आणि तथाकथित फुटबॉल संस्कृती ही सध्याच्या काळात जगज्जेतेपद पटकावण्याची पुरेशी शिदोरी ठरू शकत नाही, हा धडा ब्राझील आणि अर्जेटिनाच्याही आधी उरुग्वेनं शिकून घेतलेला दिसतो. या संघाचे मुख्य प्रशिक्षक ऑस्कर ताबारेझ गेली १२ र्वष ही जबाबदारी सांभाळत आहे. त्यांना आजवर मिळालेलं यश संमिश्र आहे. पण ते केवळ राष्ट्रीय संघाचे प्रशिक्षक नाहीत. त्यांच्यावर उरुग्वेतील फुटबॉल विकासाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे आणि ते ती समर्थपणे हाताळताना दिसतात. जर्मनी, स्पेन, फ्रान्स, इंग्लंड, बेल्जियम या देशांमध्ये युवा फुटबॉलपटू घडवण्यावर, त्यांच्या विकासावर प्रचंड गुंतवणूक केली जात आहे. स्पेन आणि जर्मनी यांना या गुंतवणुकीचं, द्रष्टेपणाचं फळही मिळालेलं आहे. बेल्जियम, फ्रान्स, इंग्लंड त्या मार्गावर आहेत. ताबारेझ यांनाही अशा शिस्तबद्ध, सुनियोजित कार्यक्रमातून उरुग्वेच्या राष्ट्रीय संघाला घडवायचं आहे. याबाबतीत ताबारेझ मास्तरांना त्यांची राष्ट्रीय फुटबॉल संघटना, सरकार, कॉर्पोरेट्स यांचं पूर्ण सहकार्य लाभत आहे. त्यांनी हा कार्यक्रम १२ वर्षांपूर्वी सुरू केला. त्या वेळी त्यांनी दुसऱ्यांदा राष्ट्रीय प्रशिक्षकपदाची धुरा सांभाळली होती. १५ वर्षांखालील, १७ वर्षांखालील आणि २१ वर्षांखालील संघांमध्ये समन्वय साधून अधिकाधिक मुलं राष्ट्रीय संघाकडून खेळतील याकडे ताबारेझ जातीनं लक्ष देतात. उरुग्वेचा राष्ट्रीय संघ म्हणजे एक मोठा क्लबच बनला आहे. रशियातील स्पर्धेत या कार्यक्रमातून होजे गिमिनेझ, लुकास टोरेरा, दिएगो लक्साल्ट असे खेळाडू खेळले. शिस्त हा ताबारेझ यांच्या कार्यक्रमाचा मुख्य पैलू. लुइस सुआरेझ या निष्णात पण माथेफिरू खेळाडूला ताबारेझ यांनी वठणीवर आणलं. गेल्या दोन्ही विश्वचषक स्पर्धामध्ये सुआरेझला लाल कार्ड मिळालेलं होतं. या स्पर्धेत एकाही सामन्यात त्याला पिवळं कार्डही दाखवलं गेलं नाही. सीनियर खेळाडू विमानतळावरून थेट सराव मैदानावर जातील, असा त्यांचा दंडक असतो. शिस्त, व्यावसायिकता आणि राष्ट्रभान हे तिन्ही गुण प्रत्येक खेळाडूमध्ये विकसित होतील, यावर ताबारेझ आणि त्यांचा चमू भर देतो. यासाठी निधीचा स्रोत आटणार नाही याकडे ताबारेझ लक्ष देतात. प्रशिक्षण सुविधांचा दर्जा चांगला राहील याविषयी सूचना करतात.

गेली काही र्वष विशिष्ट प्रकारच्या चेताविकारामुळे ताबारेझ यांच्या हालचालींवर मर्यादा आल्या आहेत. ही लढाई लढता-लढता त्यांनी उरुग्वे फुटबॉलच्या उत्थानाचं धनुष्य खांद्यावर घेतलेलं आहे. केवळ एका स्पर्धेवर लक्ष केंद्रित न करता प्रक्रियेवर लक्ष केंद्रित केलं आहे. हे खऱ्या अर्थानं युरोपियन प्रारूप आहे. यातून यश सावकाश पण निश्चित मिळतं हे त्यांना पक्कं ठाऊक आहे. ब्राझील, अर्जेटिना अजूनही व्यक्तिकेंद्रित फुटबॉलमधून बाहेर पडायला तयार नाहीत. त्यामुळे त्यांचं यशही शाश्वत राहिलेलं नाही. त्या तुलनेत उरुग्वेची वाटचाल अधिक शाश्वत आणि योजनाबद्ध आहे. फ्रान्सविरुद्धच्या सामन्यात दोन चुका आणि एक दुखापत टाळता आली असती, तर कदाचित उरुग्वे विश्वचषक जिंकण्याच्या वाटेवर निघालेच होते. ताबारेझ यांच्यासाठी मात्र ही वाटचाल सुरूच आहे.

siddharth.khandekar@expressindia.com