ऋषिकेश बामणे

विश्वचषक फुटबॉल स्पर्धेचा ज्वर दिवसेंदिवस वाढत आहे. शेवटच्या मिनिटापर्यंत रंगणारे सामने, खेळाडूंकडून चुकीने झालेले स्वयंगोल आणि बलाढय़ संघांना सुरुवातीलाच बसलेले जबरदस्त हादरे या गोष्टींमुळे विश्वचषकाची जादू आपल्याला सगळीकडे पाहायला मिळत आहे. मात्र या सर्वाबरोबरच स्टेडियममध्ये चाहत्यांना आपल्या तालावर नाचण्या-गाण्यासाठी उत्स्फूर्त करत आहेत ती म्हणजे विविध प्रकारची वाद्य. विश्वचषकात वापरण्यात आलेल्या अशाच काही रंगीबेरंगी आणि आकर्षक वाद्यांवर टाकलेला हा दृष्टिक्षेप.

लोझका

रशियात सुरू असलेल्या विश्वचषक फुटबॉल स्पर्धेचे लोझका हे अधिकृत वाद्य आहे. रशियन चमच्यांच्या साहाय्याने बनवण्यात आलेले हे वाद्य रशियातील अनेक चित्रपट तसेच गाण्यांसाठीही वापरण्यात आलेले आहे. रशियन संस्कृतीचे प्रतीक म्हणून लोझका ओळखले जाते. दोन लाकडी चमचे एकमेकांच्या विरुद्ध दिशेने बांधून निर्माण होणाऱ्या आवाजावर सध्या संपूर्ण रशिया ताल धरत आहे. या वाद्याचे शिल्पकार रुस्तोम नुगमनोव्ह यांना ट्रेशचोटका, श्ॉकर आणि लोझका या तीन वाद्यांपैकी एकावर मेहनत घेण्यास रशियन सरकारने सांगितले होते. त्यापैकी लोझकाची निवड करून बनवण्यात आलेल्या गाण्याला ‘स्पून्स ऑफ व्हिक्टरी’ असे नाव देण्यात आले.

गैडा

गैडा हे युरोपियन देशांतील प्रसिद्ध वाद्य आहे. मेंढी किंवा शेळीच्या कातडीचा वापर करून या वाद्याचा फुगीर भाग (बॅग) तयार केली जाते, तर तोंडाने हवा फुंकून वाजवण्याचा पाइप हा शंकूच्या आकाराइतक्या लाकडी नळीद्वारे बनवण्यात येतो. ग्रीस आणि क्रोएशियातील क्रीडा स्पर्धामध्ये या वाद्याचा वापर करण्यात येतो. १९९८मध्ये फ्रान्स येथे झालेल्या विश्वचषकात गैडा वाद्य प्रथम वाजवण्यात आले. तसेच फ्रान्सने विश्वचषक जिंकल्यावर रस्त्यावर उतरलेल्या चाहत्यांनी जल्लोश साजरा करताना या वाद्याचा उपयोग केला होता.

व्हुव्हुझेला

व्हुव्हुझेला किंवा त्स्वाना (दक्षिण आफ्रिकेतील एक भाषा) भाषेतील ‘लेपापाटा’ नावाने ओळखले जाणारे हे वाद्य दक्षिण आफ्रिकेतील क्रीडा स्पर्धामध्ये मोठय़ा प्रमाणावर पाहायला मिळते. भारतात प्रसिद्ध असलेली पिपाणी आणि व्हुव्हुझेला यांचा आकार काहीसा समांतर आहे. विशेष म्हणजे २०१०च्या विश्वचषक फुटबॉल स्पर्धेचे व्हुव्हुझेला हे अधिकृत वाद्य होते. २ फूट लांबी असणारे हे वाद्य प्लास्टिकचे असून याचा आवाज तुमच्या कानांना त्रासदायकही ठरू शकतो. त्यामुळेच काही संघ व्यवस्थापन आणि चाहत्यांनी याविषयी ‘फिफा’च्या अधिकृत संकेतस्थळावर तक्रारसुद्धा केली होती. मात्र १२० डेसिबलइतकी आवाजाची क्षमता असलेले व्हुव्हुझेला यंदाच्या विश्वचषकात पुन्हा एकदा स्टेडियममध्ये धमाल उडवत आहे.

कॉर्नेता ब्राझुका

कॅक्सिरोलाप्रमाणेच २०१४च्या विश्वचषक फुटबॉल स्पर्धेमध्ये कॉर्नेता ब्राझुका ही व्हुव्हुझेलासारखीच दिसणारी पिपाणी अनेक सामन्यात दिसली होती. मात्र तोंडाऐवजी हाताने हे वाद्य वाजवण्यात यायचे. वाजवताना साहाय्य म्हणून खाली असलेल्या लहान नळीत हवा भरून हळूहळू ती हवा बाहेर सोडण्यात यायची व अशा प्रकारे आवाज निर्माण व्हायचा. ब्राझुका कानांना जास्त त्रासदायक नसली तरी व्हुव्हुझेला आणि कॅक्सिरोलाच्या तुलनेत तिला प्रेक्षकांमध्ये तितकी प्रसिद्धी आणि अधिकृत मान्यता मिळाली नाही.

कॅक्सिरोला

ब्राझीलमध्ये झालेल्या २०१४च्या विश्वचषक फुटबॉल स्पर्धेचे कॅक्सिरोला हे अधिकृत वाद्य होते. ब्राझीलमधील प्रसिद्ध पॉप गायक कार्लिनहॉस ब्राऊन यांनी या सुंदर व आकर्षक वाद्याचा आविष्कार केला आहे. चहा पिण्याच्या कपसारख्या असणाऱ्या या वाद्याचा आवाज काहीसा कर्कश स्वरूपाचा आहे. एका कॅक्सिरोलाचा आवाज हा पावसाच्या सरीप्रमाणे येतो, तर हजारो कॅक्सिरोला एकत्र वाजवल्यास स्टेडियममध्ये असंख्य सापांच्या फुसफुसण्यासारखा ध्वनी निर्माण होतो. २०१३मध्ये ब्राझीलच्या एका आंतरराष्ट्रीय सामन्यात कॅक्सिरोलाचा सर्वप्रथम उपयोग करण्यात आला. मात्र ब्राझीलने तो सामना गमावल्याने चिडलेल्या प्रेक्षकांनी चक्क स्टेडियममध्येच त्याचा भडिमार सुरू केला, तरीही व्हुव्हुझेलाच्या तुलनेत कॅक्सिरोलाचा आवाज कमी असल्यामुळे ‘फिफा’ने त्यालाच २०१४च्या विश्वचषकाचे अधिकृत वाद्य म्हणून संमती दिली.

rushikesh.bamne@expressindia.com