FIFA World Cup 2018 Video : फिफा विश्वचषक स्पर्धेत आजपासून राऊंड ऑफ १६ चे सामने सुरु होणार आहेत. या फेरीतील एक महत्वाचा सामना म्हणजे अर्जेंटिना विरुद्ध फ्रान्स. हे दोनही संघ विश्वविजेतेपदाचे प्रबळ दावेदार मानले जात आहेत. पण हे दोघे आज आमनेसामने असणार आहेत. या सामन्यात काही महत्वाच्या खेळाडूंवर नजर असणार आहे.

४० वर्षांनंतर अर्जेंटिना – फ्रान्स आमने सामने येणार आहेत. यापूर्वी १९७८ साली झालेल्या फिफा विश्वचषक स्पर्धेंत हे दोघे आमने सामने आले होते. त्यात अर्जेंटिनाने २-१ने विजय मिळवला होता आणि विशेष म्हणजे तो वर्ल्डकपही अर्जेंटिनाने जिंकला होता.

आता आजच्या सामन्यात सर्वांची नजर असेल ती अर्जेंटिनाच्या लिओनेल मेसीवर. साखळी फेरीच्या पहिल्या २ सामन्यात खराब कामगिरी केल्यानंतर तिसऱ्या सामन्यात मेसीला सूर गवसला आहे. त्याच्या झुंजार वृत्तीचे दर्शन घडले आहे. त्याला इतर खेळाडूंची अपेक्षित साथ मिळाली, तर अर्जेन्टिनाला हा सामना जिंकणे शक्य आहे.

तर दुसरीकडे फ्रान्सकडे तीन महत्वाचे खेळाडू आहेत. अँटोनी ग्रीझमन हा अनुभवी खेळाडू आहे. त्याच्या नावावर या स्पर्धेत १ गोल आहे. याशिवाय, पॉल पोग्बाचा अनुभवदेखील फ्रान्सला फायद्याचा ठरेल. तिसऱ्या सामन्यात त्याला खेळायला मिळाले नसले, तरी या सामन्यात तो नक्की पुनरागमन करेल, अशी आशा आहे. तसेच, फिफाच्या मोठ्या स्पर्धांत फ्रान्सकडून गोल करणारा सर्वात कमी वयाचा खेळाडू मबापे हादेखील महत्वाची भूमिका पार पाडेल, यात शंका नाही.

त्यामुळे हा सामना रोमांचक होणार, हे नक्की!