धनंजय रिसोडकर

क्रीडाविश्वातील सर्वाधिक वलयांकित विश्वचषक म्हणून फिफा फुटबॉल विश्वचषकाची गणना केली जाते. जगभराचे लक्ष लागलेल्या या विश्वचषकात फुटबॉलच्या कौशल्याचे बारकाईने दर्शन घडविण्यासाठी तसेच त्यातील प्रत्येक नियमांचे पालन योग्य प्रकारे व्हावे या उद्देशाने प्रत्येक विश्वचषकात सातत्याने नवनवीन तंत्रज्ञान अंगीकारले जाते. त्याचप्रमाणे यंदाच्या विश्वचषकात अभिनव तंत्रज्ञानाची झलक पाहायला मिळणार आहे. त्यातील व्हिडीओ असिस्टंट रेफरी सिस्टीम (व्हार) हे तंत्र सर्वाधिक नावीन्यपूर्ण असून या पद्धतीचा वापर प्रथमच फिफा विश्वचषकात होणार आहे. अर्थात हे तंत्रज्ञान अत्याधुनिक यंत्रप्रणालींवरच विकसित करण्यात आले असले तरी त्याबाबतदेखील काही शंका – कुशंका काढल्या जात आहेत. त्यामुळे सामन्यांच्या निकालांमध्ये अधिकाधिक पारदर्शकता आणि निर्दोषत्व आणण्याच्या प्रयत्नांचा भाग म्हणूनच त्याकडे पाहणे आवश्यक ठरते.

‘व्हार’ तंत्रज्ञान – महत्त्वाच्या सामन्यांमध्ये एखादा निर्णय थोडा जरी इकडेतिकडे झाला तरी सामन्याचे पूर्ण चित्र बदलून जाते. किंवा एखादी महत्त्वाची घटना अन्य खेळाडू नजरेपुढे आल्याने किंवा अन्य काही कारणांमुळे नजरेतून निसटते अशा घटनांमध्ये या तंत्रज्ञानाचा खूप प्रभावी वापर करता येणार आहे. हे तंत्रज्ञान तीन टप्प्यांवर वापरले जाते. एखाद्या घटनेचे सुस्पष्ट चित्र पाहण्यासाठी, घटनेतील निर्णयावर पुनर्विचार, निर्णयाचा फेरविचार करण्यासाठी त्याचा अवलंब केला जातो. अगदी थोडक्यात सांगायचे झाल्यास क्रिकेटमध्ये ज्या प्रकारे रेफरल तंत्रज्ञानाचा वापर केला जातो, त्याप्रमाणेच इथेदेखील या तंत्रज्ञानाचा उपयोग केला जाणार आहे. विशेषत्वे सामन्यांमध्ये महत्त्वाची भूमिका निभावणाऱ्या पंचांना हे तंत्रज्ञान अत्यंत उपयुक्त ठरू शकणार आहे.

तिघांच्या समन्वयातून होणार कामकाज

या तंत्रज्ञानाच्या योग्य वापरासाठी तिघांचा समन्वय अत्यावश्यक आहे. स्वत: व्हिडीओ असिस्टंट रेफरी हा पूर्वाश्रमीचा पंच किंवा विद्यमान पंच हा पहिला आणि मुख्य घटक  असतो. तो त्याच्याकडे आलेल्या विविध कोनातील चित्रण बघून आणि त्याचे तत्काल आकलन करून काही निर्णयांमध्ये मैदानावरील पंचांच्या निर्णयात फेरबदल करू शकतो. त्याव्यतिरिक्त एक सहायक पंच आणि रिप्ले ऑपरेटर तांत्रिक अधिकारी असे तिघांचे पथक या तंत्रज्ञानासाठी प्रत्येक सामन्यात कार्यरत राहणार आहे. हे पथक प्रत्येक सामन्याच्या वेळी व्हिडीओ दालनात वेगवेगळ्या कोनातील कॅमेऱ्यांच्या चित्रणावर काटेकोर नजर ठेवेल.

अचूक निर्णयासाठी मदत

  • प्रामुख्याने ‘गोल’ किंवा तो करतानाच्या हालचाली व तत्सम बाबींवरील आक्षेप, पेनल्टी, लाल कार्ड दाखवण्याची पंचांची कृती किंवा चुकून भलत्याच खेळाडूला दोषी मानण्याची कृती याबाबतच्या आक्षेपांवर ‘व्हार’ तंत्रज्ञान निर्णायक ठरू शकणार आहे.
  • एखाद्या निर्णयाबाबत मैदानावरील पंच ‘व्हार’कडे मदतीची मागणी करू शकतो किंवा ‘व्हार’चे प्रमुख पंचदेखील एखाद्या निर्णयाबाबत मैदानावरील पंचांशी संपर्क साधून त्यांचे मत कळवू शकतात.
  • अशा प्रसंगी ‘व्हार’ पंचांना एखादी चूक अगदी सुस्पष्टपणे दिसत असेल तर त्यांनी तसे त्वरित मैदानावरील पंचांना कळविणे अपेक्षित आहे. मात्र, ते थेटपणे त्यांचा कोणताही निर्णय सांगणार नाहीत. त्यांचा प्रत्येक निर्णय हा त्यांनी मैदानावरील पंचांनाच कळवणे बंधनकारक आहे.

दोन वर्षांपासून तंत्रज्ञानाची चाचणी

या निर्णायक तंत्रज्ञानाच्या वापरात त्रुटी राहू नयेत यासाठी तब्बल दोन वर्षांपासून विविध देशांमधील क्लबच्या शंभरहून अधिक सामन्यांमध्ये प्रायोगिकपणे या तंत्रज्ञानाचा वापर करून त्याचा अनुभव घेण्यात आला. त्याचा वापर सर्वप्रथम अमेरिकेत २०१६ साली ऑगस्ट महिन्यात झालेल्या युनायटेड सॉकर लीगमध्ये करण्यात आला होता. त्याशिवाय ऑस्ट्रेलियातील ए लीग, २० वर्षांखालील वयोगटातील विश्वचषक, कोपा आणि अन्य स्पर्धामध्ये ते वापरून तंत्राच्या अचूकतेबद्दलची खात्री करून घेण्यात आली. त्यानंतरच मार्च २०१८ मध्ये हे तंत्रज्ञान वापरण्यावर शिक्कामोर्तब करण्यात आले.

गोल लाइनच्या तंत्राला आधुनिकतेची जोड

२०१४ साली झालेल्या फिफा विश्वचषकात गोल लाइनच्या तंत्रज्ञानाचा प्रथमच वापर करण्यात आला होता. फ्रान्सच्या करीम बेंझेमाने होंडुरासविरुद्ध केलेला गोल काही शतांश सेकंदच गोललाइनवर होता. मात्र, त्यावेळी या तंत्रज्ञानामुळे तो गोल फ्रान्सला बहाल करण्यात आला होता. अशाप्रकारे तीनदा या तंत्रज्ञानाचा वापर त्या विश्वचषकात झाला होता. त्या तंत्रालादेखील आता आधुनिक तंत्रज्ञानासह यंदाच्या विश्वचषकात वापरले जाणार आहे. त्यामुळे प्रत्येक मैदानावरील पंचाला त्याच्या घडय़ाळात एका क्षणात बॉलने गोललाइन ओलांडली की नाही ते कळून निर्णय घेणे सुकर होणार आहे.