FIFA World Cup 2018 : फिफा विश्वचषक स्पर्धेत १९ जूनला जपान आणि कोलंबिया असा सामना रंगला होता. या सामन्यात जपानने कोलंबियावर २-१ अशी धक्कादायक मात केली. १६व्या स्थानावर असलेल्या कोलंबियावर क्रमवारीत पहिल्या ५० देशात स्थान नसणाऱ्या जपानकडून पराभूत होण्याची नामुष्की ओढवली. या विजयाबरोबर जपानने आशियाई देशांना अभिमान वाटेल, असा एक विक्रमही केला. विश्वचषकात दक्षिण अमेरिकन उपखंडातील एखाद्या देशाला पराभूत करणारा जपान हा पहिला आशियाई देश ठरला.

फिफा विश्वचषक स्पर्धेतील हा सामना मर्डोव्हिया अरेना स्टेडियमध्ये झाला. या स्टेडियममध्ये चाहते मोठ्या संख्येने उपस्थित होते. त्यापैकी कोलंबियाच्या काही चाहत्यांनी चक्क स्टेडियममध्ये वोडका आणली आणि तेथेच मद्यप्राशन केले. आणि विशेष म्हणजे ही दारू त्यांनी चक्क एका बनावट दुर्बिणीसारख्या दिसणाऱ्या वास्तूच्या माध्यमातून स्टेडियममध्ये आणली होती. सामना सुरु असताना या तळीराम चाहत्यांनी तेथे त्या बनावट दुर्बिणीतून वोडका छोटाश्या झाकणात ओतून मद्यप्राशन केले.

हे मद्यप्राशन करत असतानाची व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाली असून यावर संमिश्र प्रतिक्रिया दिसत आहेत. तसेच, बेकायदेशीर कृत्य केल्याप्रकरणी या व्हिडीओमुळे त्यापैकी एकाला नोकरीवरून काढून टाकण्यात आले आहे.