२०१८ च्या फिफा विश्वचषकाच्या अंतिम फेरीत फ्रान्सने क्रोएशियावर मात करत पुन्हा एकदा जग्गजेतेपदाचा मान मिळवला. फ्रान्सने आक्रमक खेळ करत क्रोएशियावर ४-२ अशी मात केली. साखळी सामन्यापासून उपांत्य फेरीपर्यंत दिग्गज संघांना कडवी टक्कर देत पराभवाचं पाणी पाजणारी क्रोएशिया अंतिम सामन्यात विजय मिळवेल अशी अनेकांना आशा होती, मात्र फ्रान्सच्या आक्रमक खेळापुढे त्यांचा निभाव लागू शकला नाही. मात्र अंतिम सामन्यादरम्यान मैदानात काही लोकं घुसल्यामुळे अचानक धांदल उडाली. मैदानात तैनात असलेल्या सुरक्षारक्षकांना या घुसखोरांना पकडण्यासाठी चांगलीच कसरत करावी लागली. हा प्रकार पाहून रेफ्रींनीही काही क्षणांसाठी सामना थांबवला. मात्र सामान सुरु असताना मैदानात घुसखोरी करणाऱ्यांची ओळख पटली आहे.

मैदानात शिरलेले ते ३ घुसखोर रशियातील Pussy Riot गटाचे सदस्य होते. Pussy Riot गटातील काही सदस्यांनी २०१२ साली रशियातील एका चर्चमध्ये राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांच्यासमोर निदर्शन केली होती. या घटनेनंतर या गटाच्या सदस्यांना कारावासही भोगावा लागला. या घटनेनंतर या गटाचे सदस्य रशियात पुतीन विरोधी आघाडीचा चेहरा म्हणून ओळखले जाऊ लागले. सामन्याच्या दुसऱ्या सत्रात या गटाच्या ३ सदस्यांनी पोलिसांसारखा पेहराव करत सुरक्षेचं कड भेदून मैदानात शिरकाव केला. मैदानात शिरण्याचा प्रयत्न करणाऱ्या चौथ्या व्यक्तीला मात्र सावध झालेल्या पोलिसांनी आधीच ताब्यात घेतलं. या घटनेनंतर Pussy Riot या गटाच्या फेसबूक पेजवर या घटनेची जबाबदारी स्विकारण्यात आलेली आहे.

मैदानात शिरकाव केलेल्या या ३ घुसखोरांनी अंदाजे ५० मी. पर्यंत धावत सामन्यात व्यत्यय आणला. मात्र पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर पत्रकारांशी बोलताना दिलेल्या माहितीत, रशियात होत असलेल्या मानवाधिकारांच्या उल्लंघनाकडे लक्ष वेधून घेण्यासाठी आपण हा प्रकार केल्याचं एका सदस्याने सांगितलं. आपल्या फेसबूक पेजवर Pussy Riot गटाने राजकीय कैदी बनवलेल्या सदस्यांची सुटका व अन्य मागण्या केल्याचं समजतं आहे.