आजवर २० वेळा फिफा विश्वचषकाचं आयोजन करण्यात आलं आहे. रशियात होणारा विश्वचषक ही फिफा विश्वचषकाची २१वी आवृत्ती असेल. आजवर झालेले सर्व विश्वचषक अनेक कारणांसाठी गाजले आहेत. मग एखाद्या खेळाडूच्या अविस्मरणीय खेळासाठी असो वा दोन संघांमधल्या खेळाडूंमध्ये झालेल्या हाणामारीसाठी असो. प्रत्येक विश्वचषक हा अनेक घटनांचा आणि वादांचा साक्षीदार ठरला आहे. आज आपण पाहूयात फिफा विश्वचषकातले काही अविस्मरणीय क्षण आणि घटना.

१. १९५२ : महान फुटबॉलर पेले यांचा उदय

पेले हे नाव जरी घेतलं तरी डोळ्यासमोर उभा राहतो तो १९५८ चा फिफा विश्वचषक. याच विश्वचषकानं पेले यांना महान बनवलं. स्वीडनविरुद्धच्या फाइनल सामन्यात ब्राझिलचा संघ १-० असा पिछाडीवर होता. पण वावासारख्या दिग्गज खेळाडूनं दोन गोल करुन ब्राझिलला २-१ अशी आघाडी मिळवून दिली. पण सामन्याच्या उत्तरार्धात अवघ्या १७ वर्षांच्या पेलेंनी आपल्या जादुई खेळाच्या जोरावर साऱ्या जगाची मनं जिंकली. या सामन्यात पेले यांनी दोन तुफान गोल झळकावून ब्राझिलला पहिल्यांदाच विश्वचषक जिंकून दिला. फिफा विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात गोल झळकावणारे पेले हे त्यावेळचे सर्वात युवा खेळाडू ठरले होते. या विश्वचषकात पेले यांनी ब्राझिलसाठी सर्वाधिक सहा गोल केले होते. याच कामगिरीमुळे पेलेंना सर्वोत्तम युवा खेळाडू म्हणूनही गौरवण्यात आलं होते.

२. १९८६ : हँड ऑफ गॉड

१९८६ साली डिएगो मॅराडोनाच्या अर्जेन्टिनाने वेस्ट जर्मनीला हरवून दुसऱ्यांदा विश्वचषक जिंकण्याचा पराक्रम गाजवला होता. पण याच विश्वचषकाच्या उपांत्यपूर्व सामन्यात गेल्या शतकातील दोन अविस्मरणीय गोल पाहायला मिळाले. विशेष म्हणजे हे दोन्ही गोल केले ते डिएगो मॅराडोनाने. अर्जेन्टिना आणि इंग्लंडविरुद्धच्या या सामन्यात ५१व्या मिनिटाला डिएगो मॅराडोनानं पहिला गोल केला. इंग्लंडच्या स्टीव्ह हॉजने बॉल गोलकीपरला देण्याचा प्रयत्न केला होता. पण त्याचवेळी मॅराडोनाने चक्क हाताचा वापर करुन बॉल जाळ्यात धाडला. इंग्लंडच्या खेळाडूंनी मॅराडोनानं बॉल हातानं जाळ्यात धाडल्याची अपीलही केली. पण ट्युनिशियाचे रेफ्री अली बिन नासर यांनी ही अपील फेटाळून लावली आणि गोल झाल्याचं निर्णय दिला. हा गोल फुटबॉलच्या इतिहासात हँड ऑफ गॉड नावानं प्रसिद्ध झाला. त्यानंतर चार मिनिटांनी मॅराडोनानं आणखी एक गोल केला आणि तो दी गोल ऑफ दी सेन्चुरी ठरला. मॅराडोनानं १० सेकंदात ६० यार्डाचं अंतर पार पाडलं. पण ६० यार्डात मॅराडोनानं इंग्लंडच्या पाच खेळाडूंना चकवून गोल झळकावला. मॅराडोनाचा हा गोल फुटबॉलच्या इतिहासातल्या सर्वोत्तम गोलपैकी एक ठरला.

३. १९५० : अंतिम सामन्याचे २ लाख साक्षीदार

दुसऱ्या महायुद्धानंतर पहिल्यांदाच म्हणजेच १९५० साली ब्राझिलमध्ये विश्वचषकाचं आयोजन करण्यात आले होते. उरुग्वेनं ब्राझिलवर २-१ असा विजय मिळवून दुसऱ्यांचा फिफा विश्वचषक जिंकण्याचा मान मिळवला होता. या विश्वचषकाचा अंतिम सामना ब्राझिलच्या ऐतिहासिक माराकाना स्टेडियमवरखेळवण्यात आला होता. या सामन्याचे साक्षीदार झाले ते तब्बल २ लाख फुटबॉल चाहते. माराकाना स्टेडियमवर १ लाख ७३ हजार ८३० जण तिकीट काढून सामना पाहण्यासाठी आले होते. पण स्टेडियमवर जवळपास २ लाख चाहते उपस्थित होते. त्यामुळे ब्राझिलसारख्या फुटबॉलवेड्या देशात कधी काय होईल याची अपेक्षा नाही.

४. १९९४ : आंद्रेस एस्कोबारचा ओन गोल

१९९४च्या फिफा विश्वचषकात कोलंबियाचा संघ किमान उपांत्यपूर्व फेरी गाठेल असं भाकित महान फुटबॉलर पेले यांनी केलं होतं. कारण कोलंबियानं बलाढ्य अर्जेन्टिनाला हरवून विश्वचषकाचं तिकीट मिळवलं होतं. पण विश्वचषकात कोलंबियाचं आव्हान ग्रुप स्टेजमध्येच संपुष्टात आलं होतं. कोलंबियाच्या या पराभवला कारणीभूत ठरला तो आंद्रेस एस्कोबारचा ओन गोल. अमेरिकेविरुद्धच्या सामन्यात आंद्रेस एस्कोबारकडून ओन गोल झाला होता आणि कोलंबियाला पराभवाला सामोरं जावं लागलं. खेळ म्हटलं की त्यात हार-जीत तर असतेच. पण बेसावधपणे झालेली ती चूक एस्कोबारच्या जीवावर उठेल असा कुणीही विचार केला नव्हता. २ जुलै १९९४ रोजी आंद्रेस एस्कोबार एका पबमधून बाहेर पडताना तीन माथेफिरुंनी त्याच्याशी हुज्जत घातली. त्यातील दोन जणांनी एस्कोबारवर आपल्या पिस्तुलातून गोळ्या झाडल्या. ६ गोळ्या लागल्यानं आंद्रेस एस्कोबारला आपले प्राण गमवावे लागले होते.

५ . १९९४ : रोबेर्टो बॅजियो – हीरो टू झिरो

रोबेर्टो बॅजियोने आपल्या दमदार खेळाच्या जोरावर इटलीला अंतिम फेरीचं तिकीट मिळवून दिलं होतं. नायजेरियाविरुद्धच्या सामन्यांत बॅजियोने ८८व्या मिनिटाला गोल करुन इटलीला बरोबरी साधून दिली, तर १०२व्या मिनिटाला गोल डागून बॅजियोने इटलीच्या विजयावर शिक्कामोर्तब केलं होते. मग स्पेनविरुद्ध उपांत्यपूर्व सामन्यात बॅजियोने ८८व्या मिनिटाला विजयी गोल केला होता. तर उपांत्य फेरीत बॅजियोने दोन गोल झळकावून बेल्जियमला घरचा रस्ता दाखवला होता. त्यामुळे रोबेर्टो बॅजियो हा इटलीचा नायक ठरला होता. पण अंतिम सामन्यात इटली आणि ब्राझिलच्या संघांना निर्धारित आणि ज्यादा वेळेत गोल करण्यात अपयश आलं. त्यामुळं सामन्याचा निर्णय पेनल्टी शूटआऊटमध्ये होणार होता. पेनल्टी शूटआऊटध्ये ब्राझिलचा संघ ३-२ असा आघाडीवर होता. त्यामुळे रोबेर्टो बॅजियोला गोल करणे गरजेचं होतं. पण बॅजियोला पेनल्टी किकवर गोल करण्यात अपयश आलं आणि ब्राझिलनं विश्वचषकावर नाव कोरल. त्यामुळे अंतिम सामन्याआधी नायक ठरलेला रोबेर्टो बॅजियो अखेरच्या क्षणी इटलीसाठी खलनायक ठरला.

६. २०१४ : अख्ख्या ब्राझिलला अश्रू अनावर

२०१४ साली झालेल्या विश्वचषकात ब्राझिलकडे संभाव्य विजेता म्हणून पाहिलं जात होते. पण उपांत्य फेरीत ब्राझिलला जर्मनीकडून कधी स्वप्नातही पाहिला नसेल असा पराभव स्वीकारावा लागला. त्या सामन्यात जर्मनीनं ब्राझिलला ७-१ असं धोपटून काढले. ब्राझिलचा हा पराभव विश्वचषकाच्या उपांत्य फेरीत झालेला सर्वात लाजिरवाणा पराभव ठरला. या सामन्यात ब्राझिलच्या संघाला नेमारची कमी आवर्जून जाणवली. कोलंबियाविरुद्धच्या उपांत्यपूर्व सामन्यात नेमारला दुखापत झाली होती. त्यामुळं नेमारला जर्मनीविरुद्धच्या सामन्यातून माघार घ्यावी लागली होती.

७. २००६ : झिनेदिन झिदानचा ‘हेड बट’

२००६च्या फिफा विश्वचषकावर इटलीनं आपलं नाव कोरले. अंतिम सामन्यात इटलीने फ्रान्सचा पेनल्टी शूटआऊटमध्ये धुव्वा उडवला. या सामन्यात महान खेळाडू झिनेदिन झिदानकडून जी चूक झाली ती फ्रान्सला चांगलीच महागात पडली. इटलीच्या मार्को मातेराझीला झिनेदिन झिदानने डोक्याने हेड बट दिली. त्यामुळे रेफ्रीनं झिदानला रेड कार्ड दाखवलं. झिदानला रेड कार्ड मिळाल्यानं उर्वरित सामना फ्रान्सला १० खेळाडूंसह खेळावा लागला. मातेराझीनं आई आणि बहिणीविरुद्ध अपशब्द वापरल्याने झिदानला राग अनावर झाला आणि त्यानं हेडबट मारल्याचं बोललं जातं.

– विजय शिंदे