FIFA World Cup Flashback : रशियामध्ये सध्या फिफा फुटबॉल विश्वचषक स्पर्धा रंगली आहे. या स्पर्धेत आतापर्यंत जवळपास प्रत्येक संघाचे दोन दोन सामने झाले असून काही अनपेक्षित निकालही हाती आले आहेत. त्यामुळे स्पर्धा सुरु होण्याआधी जे संघ विजेतेपदाचे प्रबळ दावेदार मानले जात होते, त्यात आता काही नवी नावे जोडली जात आहेत.

फुटबॉल विश्वचषक आणि विशेषतः विजेतेपदाचे दावेदार म्हंटलं की एक नाव मात्र कायम फुटबॉलप्रेमींच्या ओठांवर येतं ते म्हणजे ब्राझील. ब्राझीलच्या संघाने आतापर्यंत ५ वेळा या स्पर्धेच्या विजेतेपदावर आपले नाव कोरले आहे. १९५८, १९६२, १९७०, १९९४ आणि २००२ या पाच फिफा विश्वचषक स्पर्धांचे विजेतेपद ब्राझीलच्या नावावर आहे. २००२ साली ब्राझीलच्या विजयाचा शिल्पकार ठरला तो रोनाल्डो. संपूर्ण स्पर्धेत त्याने ८ गोल झळकावत ब्राझीलला विजेतेपद मिळवून दिले.

या स्पर्धेत रोनाल्डोने आपल्या खेळाने वाहवा मिळवलीच, पण त्याबरोबरच तो एक वेगळ्या कारणाने चर्चेचा विषय ठरला होता. त्या स्पर्धेत रोनाल्डोने एक विचित्र आणि थोडीशी ‘ट्रेंडी’ अशी हेअरस्टाइल केली होती. या स्पर्धेत त्याच्या हा हेअरस्टाइलची प्रचंड चर्चा झाली. अनेक फुटबॉलप्रेमींनी स्वतःदेखील अशी हेअरस्टाइल करून घेत ब्राझीलला आपला पाठिंबा दर्शवला. पण या हेअरस्टाइल मागचे कारण हे काही निराळेच होते. याबाबत रोनाल्डोनेच खुलासा केला.

”स्पर्धेआधी माझ्या पायाला दुखापत झाली होती. सर्वजण कायम त्याबाबत चर्चा करत होते. त्यामुळे मी मुद्दाम असा विचित्र हेअरकट केला. हा हेअरकट करून जेव्हा मी सराव करण्यासाठी गेलो, त्यावेळी सर्वजण माझ्या त्या हेअरकटबद्दल बोलू लागले. सर्वत्र त्या हेअरकटचीच चर्चा होती. प्रसारमाध्यमेही माझ्या पायाच्या दुखपतीबद्दल विसरले आणि माझ्या या विचित्र हेअरकट बद्दल बोलू लागली. मला त्या विचित्र हेअरकटचा अजिबात अभिमान वाटत नव्हता. पण त्या हेअरकटने मला थोडासा दिलासा दिला आणि मला खेळावर लक्ष केंद्रित करता आले”, असे रोनाल्डोने सांगितले.