फुटबॉल विश्वचषकाच्या इतिहासात गेल्या २० वर्षांत सर्वाधिक वेळा अंतिम फेरीत धडक मारणारा देश म्हणून फ्रान्सने नवा विक्रम नोंदवला आहे. मंगळवारी झालेल्या फ्रान्स विरुद्ध बेल्जिअमच्या पहिल्या उपांत्य फेरीच्या सामन्यात बेल्जिअमवर १-० ने मात करीत फ्रान्सने हे यश मिळवले.


१९९८मध्ये पहिल्यांदा फ्रान्सने फुटबॉल विश्वचषकाच्या अंतिम फेरीत धडक मारली होती. त्यानंतर दुसऱ्यांदा २००६ मध्येही फ्रान्सने हा पराक्रम केला. त्यानंतर तब्बल १२ वर्षांनंतर यंदा २०१८मध्ये तिसऱ्यांदा फ्रान्सने ही कमाल साधली आहे. म्हणजेच गेल्या वीस वर्षांच्या काळात फ्रान्स तिसऱ्यांदा अंतिम सामन्यापर्यंत पोहोचला आहे.

१९९८मध्ये झालेल्या फिफाच्या अंतिम सामन्यात फ्रान्सने ब्राझीलचा ३-० असा पराभव करीत पहिल्यांदा विश्वचषकावर आपले नाव कोरले होते. तर २००६ मध्ये त्यांचा इटलीकडून पेनल्टी शूटआऊटमध्ये ५-३ ने पराभव झाला होता. त्यानंतर मंगळवारी झालेल्या उंपात्य फेरीतील विजयानंतर पुन्हा विश्वचषक जिंकण्याच्या त्यांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. मात्र, गेल्या २० वर्षांत कोणत्याही देशाला तीन वेळेस अंतिम फेरीपर्यंत धडक मारता आलेली नाही.

त्याचबरोबर फ्रान्स हा सहावा असा देश बनला आहे ज्यांमध्ये विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात तीन किंवा त्यापेक्षा जास्त वेळा पोहोचलेल्या देशांपैकी एक बनला आहे. यामध्ये जर्मनी (८), ब्रझील (६), इटली (६), अर्जेंटिना (५) आणि नेदरलँड्स (३) या देशांचा समावेश आहे.