क्रोएशिया इतिहास घडविणार की फ्रान्स विजयपताका फडकावणार?

अवघ्या २० वर्षांपूर्वी म्हणजे १९९८मध्ये क्रोएशियाने फिफा विश्वचषक स्पर्धेत पदार्पण केले होते, तर त्याच वर्षी फ्रान्सने फुटबॉलच्या या सर्वोच्च जागतिक  स्पर्धेत विजयश्री खेचून घेतली होती! त्यानंतर फ्रान्सला विश्वविजेतेपदावर आपली मुद्रा कोरता आली नव्हती की क्रोएशियाही विजयाच्या जवळपास फिरकू शकला नव्हता. मात्र आता २० वर्षांनंतर विलक्षण योग जुळून आला असून हे दोन्ही संघ रविवारच्या अंतिम फेरीत एकमेकांसमोर उभे ठाकले आहेत. त्यामुळे हे विसावं वरीस दोघांनाही मोक्याचंच ठरणार आहे!

या अंतिम लढतीकडे जगभरातील फुटबॉलचाहत्यांचे लक्ष लागले आहे. या स्पर्धेत विजयश्री पटकावून क्रोएशिया नवा इतिहास रचणार की तब्बल वीस वर्षांच्या खंडानंतर फ्रान्सला पुन्हा विजयपताका फडकावता येणार, याची उत्सुकता चाहत्यांच्या मनात दाटून आली आहे.

आतापर्यंत झालेल्या २० विश्वचषकांमध्ये केवळ आठच देशांना विश्वविजेतेपद पटकावता आले आहे. त्यामुळे अवघ्या २० वर्षांपूर्वी ‘फिफा’ विश्वचषकात प्रथमच दाखल झालेल्या क्रोएशियाच्या संघाने अंतिम सामन्यापर्यंत मारलेली मजल ही समस्त फुटबॉलविश्वाला चकीत करणारी ठरली आहे. त्यामुळे यापूर्वीच्या सामन्यांप्रमाणेच या सामन्यातदेखील क्रोएशियाचा संघ सांघिक खेळाच्या बळावर फ्रान्सला चकीत करण्यात यशस्वी ठरल्यास विश्वचषक जिंकण्याचा इतिहास घडवणारा तो नववा देश ठरेल. तर एकाहून एक सरस खेळाडूंचा भरणा असलेला फ्रान्सचा संघ हा विश्वविजेतेपदाचा प्रबळ दावेदार मानला जात आहे. साखळी सामन्यांपासून अंतिम सामन्यापर्यंतची फ्रान्सची वाटचालदेखील अधिक आश्वासक आणि सातत्यपूर्ण असल्याने फ्रान्सच्या विजयाची अटकळ अधिक मोठय़ा प्रमाणात बांधली जात आहे

लक्षवेधी खेळाडू ल्युका मॉड्रिच

क्रोएशियाचा कर्णधार आणि मध्यफळीचा कणा. विरोधकांमधून शिताफीने वाट काढत आपल्या सहकाऱ्यांकडे बॉल अचूक ढकलत सर्वाधिक गोलसाठी सहाय्य करण्यात आणि प्रसंगी मुसंडी मारत गोल करण्यात वाकबगार असलेल्या मॉड्रिचवरच क्रोएशियाची सर्वाधिक भिस्त आहे. त्याचा संपूर्ण मैदानव्यापी संचार रोखण्यात फ्रान्स यशस्वी ठरल्यास क्रोएशियाचे आव्हान संपुष्टात येऊ शकते.

किलियान एम्बापे

अर्जेटिनाविरुद्ध त्याने केलेल्या आक्रम खेळीची स्तुती प्रत्येक प्रतिस्पर्धी संघाच्या उरात धडकी भरवणारी ठरली आहे. त्यामुळे एम्बापेची कोंडी करण्यासाठी त्याच्या आसपास त्याचा वेग रोधू शकणाऱ्या फुटबॉलपटूंचे कडे तयार करणे आणि एम्बापेला घेरणे क्रोएशियाला शक्य झाले तर निदान मैदानी गोलचा निम्मा धोका टळण्याची शक्यता आहे.