महिनाभरात झालेल्या ६३ सामन्यांच्या रणधुमाळीनंतर आज होणाऱ्या सामन्यातून क्रोएशियासाठी नवा इतिहास लिहिला जाणार की २० वर्षांपूर्वीच्या इतिहासाची फ्रान्सकडून पुनरावृत्ती घडणार, हाच एकमेव सवाल आता फुटबॉलशौकिनांच्या मनात उरला आहे. फ्रान्सची किलियान एम्बापे, अ‍ॅँटोइन ग्रीझमन, पॉल पोग्बा ही तरुण तुर्क सेना विश्वचषक उंचावणार की लुका मॉड्रिच आणि इव्हान रॅकिटिच यांचा अनुभव बाजी मारणार ते अनुभवण्यासाठी रविवारी होणाऱ्या फुटबॉल विश्वचषकाच्या अंतिम सामन्याची प्रत्येक जण आतुरतेने वाट पाहात आहे.

रशियात सुरू होणाऱ्या विश्वचषकापूर्वी किंवा अगदी उपांत्य फेरीच्या सामन्यांपर्यंतदेखील अंतिम लढत ही फ्रान्स आणि क्रोएशिया या दोन देशांमध्ये होणार, अशी अपेक्षा कुणीच केली नव्हती. फुटबॉलमधील महासत्ता ओळखल्या जाणाऱ्या देशांचीच नावे त्यात प्रामुख्याने घेतली जात होती. जर्मनी, अर्जेंटिना, पोर्तुगाल, ब्राझीलसारख्या नामवंत खेळाडूंचा भरणा असलेले संघ अपयशी ठरले. मात्र सगळ्यांचे अंदाज फोल ठरवत १९९८ सालच्या विश्वविजेत्या फ्रान्सने पुन्हा एकदा अंतिम फेरीत प्रवेश केला. त्यापेक्षा मोठी कमाल तर क्रोएशियाने करून दाखवली. उपांत्य फेरीपर्यंत पोहोचतानाच दोन वेळा पेनल्टी शूटआऊटचे सहाय्य घ्यावे लागलेला क्रोएशिया तिथपर्यंत पोहोचला म्हणजेच खूप झाले असे अनेक जण मानत होते; परंतु उपांत्य सामन्यात इंग्लंडसारख्या प्रतिभावान युवा खेळाडूंचा भरणा असलेल्या संघाला पराभूत करून त्यांनी सगळ्यांनाच चकित केले आहे. त्यामुळे कुणालाही अनपेक्षित असलेला फ्रान्स विरुद्ध क्रोएशिया असा अंतिम सामना यंदा रंगणार आहे. ज्यांच्या नावाचा गवगवा होता अशा लिओनेल मेसी, ख्रिस्तियानो रोनाल्डो, नेयमार यांच्यापैकी एकही संघ अंतिम फेरीत पोहोचू न शकल्याने अनेकांना दु:ख झाले; परंतु यानिमित्ताने एम्बापे, ग्रीझमन, रॅकिटीचसारखे काही नवीन तारे उदयाला येत असून तेच या विश्वचषकाचे वैशिष्टय़ ठरणार आहे. फ्रान्सचा कर्णधार गोलरक्षक ह्य़ुगो लॉरीस आणि क्रोएशियाचा कर्णधार मॉड्रिच हे दोघेही आपापल्या विजयाबद्दल आत्मविश्वास बाळगून आहेत.

विश्वचषकातील सर्वाधिक दुसरा युवा संघ म्हणून फ्रान्सचा संघ ओळखला जातो. एम्बापेसारखा प्रचंड वेगवान आक्रमक आणि त्याला ग्रीझमानची लाभलेली अनोखी साथ त्यामुळे फ्रान्सचा संघ हा संपूर्ण विश्वचषकात एखाद्या विजेत्याप्रमाणे संचार करत अंतिम फेरीपर्यंत येऊन पोहोचला आहे.

‘‘जीवनातील ही एकमेव संधी असून ती साधण्याच्या इराद्यानेच आम्ही मैदानावर उतरणार आहोत,’’ असे क्रोएशियाचा इव्हान रॅकिटीचने म्हटले आहे.

ज्या संधीच्या अपेक्षेने फ्रान्सच्या संघाने रशियात पदार्पण केले होते, ती संधी रविवारी आमच्यासमोर आलेली आहे. त्यामुळे केवळ आणि केवळ अंतिम सामना व विजेतेपद यावरच आता आमचे लक्ष केंद्रित झाले असून त्या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठीच आमचा संघ मैदानात उतरणार आहे. सर्व खेळाडू बहरात असून त्यांच्याकडून अत्यंत दर्जेदार खेळासह विश्वविजेतेपदाची आस संपूर्ण फ्रान्सला आहे.    – दिदिएर देशॉँ, फ्रान्सचे प्रशिक्षक

अधिक-उणे

  • गोलरक्षण : क्रोएशियाचा गोलरक्षक डॅनियल सुबासिचने पेनल्टी शूटआऊटमध्ये त्याचे कौशल्य सिद्ध केले आहे. मात्र सामन्यामध्ये मैदानी गोल वाचवण्यात तो काहीसा कमी पडलाय. त्या तुलनेत फ्रान्सचा गोलरक्षक ह्युगो लॉरिसने त्याच्या संघावर एकही गोल चढू न देता संघाला बाद फेरीपर्यंत पोहोचवले होते. त्यानेही पेनल्टी शूटआऊटमध्ये त्याचे श्रेष्ठत्व सिद्ध केले असल्याने लॉरिस हा कांकणभर सरस वाटतो.
  • बचाव : फ्रान्सचा बेंजामीन पावर्ड आणि राफाएल व्हेरान हे एखाद्या कुलुपाप्रमाणे कार्य करीत आहेत. त्यांचा बचाव भेदणे प्रत्येक संघाला सर्वाधिक जिकिरीचे काम ठरले आहे. त्यात पावर्डने अर्जेटिनाविरुद्ध तर व्हेरानने उरुग्वेविरुद्ध गोलदेखील लगावत संघाच्या अंतिम सामन्यापर्यंतच्या वाटचालीत अत्यंत मोलाचे योगदान दिले आहे. सॅम्युअल उमटिटीने भक्कम बचावाबरोबरच उपांत्य फेरीत बेल्जियमवर केलेला एकमेव गोल फ्रान्सला अंतिम सामन्यापर्यंत नेणारा ठरल्याने तोदेखील बहरात आहे. क्रोएशियाकडून देजान लोवरेन, इव्हान स्ट्रीनिक आणि डोमोगोज विडा यांची तटबंदीदेखील भक्कम आहे. विडानेदेखील बचावासह गोल करण्यातही बाजी मारली असली तरी फ्रान्सच्या तुलनेत क्रोएशियाचा बचाव तितका अभेद्य वाटत नाही.
  • मध्यरक्षण : फ्रान्सची मध्यफळी ही एनगोलो कांटे आणि पॉल पोग्बा यांच्यासारख्या नामवंत खेळाडूंमुळे भक्कम बनलेली आहे. कांटे हा विरोधी संघाच्या आक्रमकांकडून चपळाईने चेंडू काढून घेत आक्रमणे मध्यावरच रोखण्यात चोख कामगिरी बजावत आहे. त्या तुलनेत पोग्बाचीच कामगिरी त्याच्या नावाला साजेशी झालेली नाही. त्या तुलनेत लुका मॉड्रिच आणि इव्हान रॅकिटीच ही क्रोएशियाची जोडगोळी संघासाठी अधिक सफाईदार कामगिरी करताना दिसून येत आहे. किंबहुना ही जोडीच क्रोएशियाच्या विजयाचे केंद्रस्थान राहणार आहे.
  • आक्रमण : मैदानाच्या उजवीकडून होणारे एम्बापेचे वेगवान आक्रमण हे फ्रान्सची सर्वाधिक जमेची बाजू राहणार आहे, तर डावीकडून त्याला तितकीच तोलामोलाची मिळणारी ग्रीझमनची साथ ही दोन्ही संघांमधील फरकाची ठळक बाजू राहणार आहे. क्रोएशियाचा मारिओ मान्झुकिचने इंग्लंडविरुद्ध मोक्याच्या क्षणी गोल करण्याची त्याची क्षमता दाखवून दिली आहे, तर डाव्या बाजूचे आक्रमण इव्हान पेरिसिचने समर्थपणे सांभाळत आतापर्यंत दोन गोल लगावले असले तरी फ्रान्सच्या तुलनेत हे आक्रमण तितकेसे धारदार वाटत नाही.
  • कोणत्याही खेळाडूच्या आणि प्रशिक्षकाच्या जीवनात एखाद्या वेळीच येणारी ही संधी आहे. त्यामुळे विश्वचषकात सर्वाधिक थकवणारे दीर्घ सामने खेळूनदेखील आमचा संघ अंतिम सामन्यात खेळण्यासाठी आसुसलेला आहे. विश्वविजेतेपद मिळवण्याची इच्छा ही खेळाडूंना त्यांचा थकवा, त्यांच्या किरकोळ दुखापती विसरून विजेतेपदाच्या जोमाने खेळण्यास प्रेरक ठरत आहे. – झ्लॅटको डॅलिच, क्रोएशियाचे प्रशिक्षक

देशाला ते भाग्य लाभणार का?

फ्रान्सचे प्रशिक्षक दिदिएर देशॉँ यांनी १९९८ साली फ्रान्सला विश्वचषक जिंकून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. विशेष म्हणजे ते त्या विश्वविजेत्या संघाचे कर्णधार होते. त्यामुळे यंदाचा विश्वचषक जिंकून ते विश्वविजेत्या संघाचे सदस्य आणि विश्वविजेत्या संघाचे प्रशिक्षक असा दुहेरी किताब जिंकण्यात यशस्वी ठरणार का? याकडे फ्रान्सवासीयांचे लक्ष लागलेले आहे. यापूर्वी केवळ जर्मनीच्या फ्रान्झ बेकेनबॉर आणि ब्राझीलच्या मारिओ झॅगेलो यांनाच ते शक्य झाले आहे.

  • दोन्ही संघ एकमेकांशी यापूर्वी पाच सामने खेळले असून त्यातील ३ सामने फ्रान्सने जिंकले असून दोन सामने अनिर्णीत राहिले आहेत.
  • आतापर्यंतच्या २१ विश्वचषक स्पर्धापैकी १५ विश्वचषकांत फ्रान्सने प्रतिनिधित्व केले आहे.
  • क्रोएशियाच्या संघाने २० वर्षांपूर्वी प्रथमच विश्वचषकात खेळून उपांत्य फेरीपर्यंत पोहोचत तृतीय क्रमांक पटकावला होता.
  • फ्रान्सचा संघ १० गोल करून अंतिम फेरीपर्यंत पोहोचला आहे.
  • क्रोएशियाच्या संघाने अंतिम सामन्यापर्यंत पोहोचताना एकूण १२ गोल लगावले आहेत.