23 February 2019

News Flash

FIFA World Cup 2018 : क्रोएशियाची यशोगाथा

बाद फेरीच्या प्रत्येक सामन्यात ते पिछाडीवर पडले.

|| सिद्धार्थ खांडेकर

बाद फेरीच्या प्रत्येक सामन्यात ते पिछाडीवर पडले. बाद फेरीचा त्यांचा प्रत्येक सामना अतिरिक्त वेळेत (दोन सामने पेनल्टी शुटआउटवर) गेला. सलग तीन सामन्यांमध्ये प्रत्येकी किमान दीड तास खेळूनही त्यांच्या फिटनेसच्या कोणत्याही समस्या नाहीत. क्रोएशियन संघ हा या विश्वचषक स्पर्धेची खरीखुरी यशोगाथा आहे. इतक्या चिमुकल्या देशानं विश्वचषकासारख्या भव्य स्पर्धेत छाप पाडल्याचं दुसरं उदाहरण म्हणजे अर्थातच उरुग्वे. रविवारच्या अंतिम सामन्यात क्रोएशिया जिंकले तर जगाला नववा जगज्जेता मिळेल. पण या निव्वळ आकडय़ापेक्षा महत्त्वाची बाब म्हणजे, क्रोएशियासारख्या कितीतरी छोटय़ा देशांना स्फूर्ती मिळेल.

अर्थात देश चिमुकला असला, तरी एक फुटबॉल संघ म्हणून क्रोएशिया निर्विवाद बलाढय़ आहे. इंग्लंडविरुद्धच्या सामन्यात तेच ‘फेवरिट’ होते. पाचव्या मिनिटाला कायरन ट्रिपियरनं इंग्लंडला आघाडीवर नेलं, तरीही क्रोएशिया एका लयीमध्ये खेळत राहिले. उपउपांत्यपूर्व फेरीत डेन्मार्कविरुद्ध, उपांत्यपूर्व फेरीत रशियाविरुद्ध आणि उपांत्य फेरीत इंग्लंडविरुद्ध एका गोलनं पिछाडीवर पडूनही क्रोएशिया डगमगले नाहीत यात त्यांचा मानसिक कणखरपणा दिसून येतो. अशा प्रकारे विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम फेरीत पोहोचलेला क्रोएशिया हा एकमेव संघ आहे. फ्रान्सच्या तुलनेत त्यांना कमी प्रबळ प्रतिस्पर्धी मिळाले, असं सांगितलं जातं. ते अर्धसत्य आहे. बाद फेऱ्यांमधील फ्रान्सचे प्रतिस्पर्धी (अर्जेटिना, उरुग्वे आणि बेल्जियम) क्रोएशियाच्या प्रतिस्पध्र्यापेक्षा (डेन्मार्क, रशिया, इंग्लंड) नक्कीच प्रबळ होते. परंतु गटसाखळीत क्रोएशियाला (आइसलँड, अर्जेटिना, नायजेरिया) फ्रान्सच्या तुलनेत (ऑस्ट्रेलिया, पेरू, डेन्मार्क) खडतर लढतींमध्ये खेळावं लागलं. क्रोएशियानं प्रत्येक सामना जिंकला, तर फ्रान्सला डेन्मार्कनं बरोबरीत रोखलं होतं.

१९९१मध्ये तत्कालीन युगोस्लाव्हियातून फुटून स्वतंत्र झालेला क्रोएशिया पहिल्यांदा १९९८मध्ये विश्वचषक स्पर्धेत खेळला. त्यांची सुरुवातच स्वप्नवत होती. त्या स्पर्धेत उपांत्यपूर्व फेरीत त्यांनी बलाढय़ जर्मनीला ३-० अशी धूळ चारून उपांत्य फेरी गाठली. उपांत्य फेरीतही त्यांनी यजमान आणि नंतर त्या स्पर्धेत जगज्जेते ठरलेल्या फ्रान्सविरुद्ध १-० अशी आघाडी घेतली होती. पण नंतर फ्रान्सनं पिछाडी भरून काढून २-१ अशी बाजी मारली. त्या स्पर्धेत क्रोएशियाला उत्तम फुटबॉलपटूंची एक सुवर्णपिढी लाभली होती. दावोर सुकर हा त्यांचा आजवरचा सर्वोत्तम फुटबॉलपटू. १९९८मध्ये त्यानं सर्वाधिक गोल करून गोल्डन बूट जिंकला. १९९८च्याही आधी क्रोएशियाचा संघ युरो १९९६मध्ये पहिल्यांदा खेळला. १९९१मध्ये स्वातंत्र्य आणि (त्यावेळी) लोकसंख्या ३० लाखांच्या आसपास. तरीही इनमिन पाचेक वर्षांत क्रोएशियाचा फुटबॉल संघ उभा राहिला. युरो १९९६मध्ये पहिल्याच सामन्यात त्यांनी त्यावेळच्या गतविजेत्या डेन्मार्कला ३-० असं हरवून दाखवलं. हा संघ उपांत्यपूर्व फेरीपर्यंत गेला आणि जर्मनीशी १-२ असा हरला. त्यांनी विश्वचषक १९९८मध्ये धमाल उडवून दिली. सुकर, बोबान, यार्नी, व्लाओविच, बिलिच, डालिच (सध्याच्या संघाचे प्रशिक्षक) असे अनेक चांगले फुटबॉलपटू त्या संघात होते. त्या स्पर्धेत क्रोएशिया तिसऱ्या क्रमांकावर राहिले.

नंतरच्या काळात क्रोएशियाच्या कामगिरीत सातत्य नव्हते आणि एखाद्या स्पर्धेत पात्र ठरूनही त्यांना बाद फेरीतही जाता आलं नाही. जवळपास दीड दशक ही स्थिती कायम राहिली. सध्याच्या संघातील अनेक खेळाडू या दशकाच्या सुरुवातीपासून विशेषत क्लब फुटबॉलमध्ये तमकू लागले होते. मान्झुकिच प्रथम बायर्न म्युनिचकडून आणि आता युव्हेंटसकडून खेळतो. लुका मॉड्रिच रिआल माद्रिदकडून खेळतो. इव्हान राकिटिच बार्सिलोनाकडून खेळतो. मार्सेलो ब्रोझोविच इंटर मिलानकडून खेळतो. देयान लॉव्रेन लिव्हरपूलकडून खेळतो. म्हणजे सध्याच्या क्रोएशियन संघात किमान अर्धा डझन युरोपियन क्लबविजेते खेळतात याकडे बहुतेकांचं बऱ्यापैकी दुर्लक्ष होतं. फुटबॉल आणि र्पयटन ही दोनच प्रमुख आकर्षणं असलेल्या अवघा ४० लाखांचा हा देश १९५०नंतर विश्वचषक स्पर्धेत अंतिम फेरीत पोहोचलेला सर्वात छोटा देश. त्यांचा सारा भर हा मैदानाच्या मधल्या वर्तुळाचा (मिडफील्ड) ताबा घेऊन खेळण्याकडे असतो. क्रोएशियाचं वर्णन कलाकार आणि श्रमिकांचा संघ असं केलं जातं. श्रमिकांसारखी मेहनत घेत असतानाच, या संघाच्या खेळातून नजाकतीचं दर्शनही घडतं. लुका मॉड्रिचचा मैदानावरील वावर एखाद्या ऑर्केस्ट्रा कंडक्टरसारखा असतो. बाकीचेही त्याला व्यवस्थित साथ देतात. त्यामुळे त्यांचा खेळ प्रेक्षणीय ठरतो. क्रोएशियानं रविवारी विजय मिळवल्यास तो देश फुटबॉलमधला नववा जगज्जेता ठरेल. फुटबॉलच्या यशोगाथेशी क्रोएशियाची यशोगाथा अशी घट्ट बांधली गेलेली आहे.

siddharth.khandekar@expressindia.com

First Published on July 13, 2018 1:56 am

Web Title: france vs croatia fifa world cup 2018