‘‘इंग्लिश प्रीमिअर लीगमध्ये विविध क्लबकडून खेळताना निर्माण होणारे वैर राष्ट्रीय संघात एकत्र खेळतानाही कायम असल्यामुळे इंग्लंडला बरीच वर्षे विश्वचषक फुटबॉल स्पर्धेचा दुष्काळ संपवता आलेला नाही. १९६६ साली आम्ही विश्वचषक जिंकण्याची किमया केली होती. इंग्लंडचा सध्याचा संघ सुवर्णयुगातील नसला तरी संघटित आहे,’’ असे मत कर्णधार हॅरी केन याने व्यक्त केले.

तो पुढे म्हणाला, ‘‘गॅरेथ साऊथगेट यांच्या मार्गदर्शनाखाली खेळणाऱ्या या संघातील बरेच खेळाडू २१ वर्षांखालील स्पर्धापासून एकमेकांसोबत आहेत. त्यामुळे ईपीएलमध्ये त्यांच्यातील मतभेद राष्ट्रीय संघात नाहीत. त्यामुळे आमच्यात एकजूट आहे. विश्वचषक जिंकण्याचे स्वप्न प्रत्येक खेळाडू पाहत आहे. टोटनहॅम क्लबला प्रत्येक विजय मिळवून देताना मला जितका आनंद होतो, त्यापेक्षा अधिक आनंद देशाला विश्वचषक जिंकून देताना हाईल.’’

साऊथगेट यांनी कर्णधारपदाची जबाबदारी सोपवल्यानंतर त्याची आई भावूक झाली आणि तिला अश्रू अनावर झाले, असे केनने सांगितले. इंग्लंडला २०१६च्या युरो स्पर्धेत दुबळ्या आईसलँड संघाकडून पराभव पत्करावा लागला होता. त्यामुळे प्रशिक्षक रॉय हॉडसन यांना पद सोडावे लागले होते. तशी निराशाजनक कामगिरी विश्वचषक स्पर्धेत होणार नाही, असा विश्वास व्यक्त करताना केन म्हणाला, ‘‘युरो स्पर्धेसारखी कामगिरी येथे होणार नाही. फुटबॉल खेळात असे विधान ठामपणे करणे चुकीचे ठरेल. त्यामुळे मी स्वत: शंभर टक्के तशी खात्री देत नाही, परंतु आमचा संघ संपूर्ण ताकदीने मैदानात उतरण्यासाठी सज्ज आहे. या मोठय़ा स्पर्धेत आम्हाला देशाचे प्रतिनिधित्व करताना अभिमान वाटत आहे.’’