ग्रुप बी च्या मोरोक्को विरुद्ध इराण या पहिल्या सामन्यात इराणने मोरोक्कोवर १-० ने विजय मिळवला आहे. अतिरिक्त वेळेत मोरोक्कोच्या फुटबॉलपटूने गोल पोस्टच्या दिशेने येणारा चेंडू हेडरद्वारे बाहेर मारण्याच्या प्रयत्नात स्वत:च्या गोल पोस्टमध्ये मारुन ओन गोल केला. १९९८ नंतर इराणने फुटबॉल वर्ल्डकपमध्ये दुसऱ्या विजयाची नोंद केली आहे. १९९८ वर्ल्डकपमध्ये इराणने अमेरिकेला २-१ गोल फरकाने नमवले होते.

तब्बल २० वर्षांच्या वनवासानंतर मोरोक्कोचा संघ पुन्हा फिफा विश्वचषकास पात्र ठरला होता. त्यांनी इराणच्या संघाला शेवटपर्यंत कडवी लढत दिली. पण अखेरच्या काही मिनिटांमध्ये गोल वाचवण्याच्या नादात घात झाला. मोरोक्कोचा संघ फिफा विश्वचषकात १९७० सालापासून खेळत आला आहे.

परंतु १९९८साली फ्रान्समध्ये झालेल्या विश्वचषकानंतर त्यांचा संघ पात्रच ठरू शकला नव्हता. त्यामुळे आता दोन दशकांनंतर सुरू होत असलेल्या आपल्या अभियानाला विजयाने प्रारंभ करण्याच्या निर्धारानेच मोरोक्कोचा संघ मैदानात उतरला होता तर दुसरीकडे इराणचा संघ प्रथमच सलग दुसऱ्यांदा विश्वचषकास पात्र ठरला आहे.

इराणच्या खेळाडूंना ‘नायके’चे बूट नाही
अमेरिकेने इराणवर लादलेल्या र्निबधांमुळे नायके कंपनी त्यांच्या फुटबॉलपटूंना बूट पुरवणार नसल्याचे त्यांनी म्हटले आहे. त्यावर प्रतिक्रिया व्यक्त करताना इराणचे प्रशिक्षक कार्लोस क्विरोझ यांनी आमच्या खेळाडूंमध्ये चांगली एकजूट असल्याने मोरोक्कोविरुद्ध खेळताना असल्या बाबींमुळे आम्हाला फारसा फरक पडत नसल्याचे म्हटले आहे. किंबहुना, त्यामुळे खेळाडूंचा आपापसातील बंध अधिक दृढ झाल्याचे नमूद केले.