सुरक्षा यंत्रणेचा विश्वचषक फुटबॉल स्पर्धेच्या संयोजकांना इशारा

रशियात होणाऱ्या विश्वचषक फुटबॉल स्पर्धेदरम्यान ‘आयसिस’ ही दहशतवादी संघटना हल्ले करू शकते आणि त्यांच्या धमक्यांना गांभीर्याने घ्या, असा सल्ला रशियातील सुरक्षा यंत्रणेने दिला आहे.

‘आयसिस’कडून गेल्या वर्षभरात समाजमाध्यमांवरून विश्वचषक स्पर्धेला लक्ष्य केले जात आहे. लिओनेल मेसी, ख्रिस्तियानो रोनाल्डो आणि नेयमार या प्रमुख खेळाडूंना जिवे मारण्याच्या धमक्याही त्यांच्याकडून देण्यात येत आहेत. त्यामुळे सुरक्षा यंत्रणेने आयोजकांना सतर्क राहण्याचा सल्ला दिला आहे.

‘‘मागील काही वर्षांत इस्लामिक ग्रुपच्या संघटनांकडून रशियामध्ये दहशतवादी हल्ले करण्यात आलेले आहेत. त्यामुळे आगामी विश्वचषक स्पर्धेतही असे हल्ले घडवून आणण्याची क्षमता त्यांच्यात आहे. एकांडे हल्ले त्यांच्याकडून होऊ शकतात,’’ असे सुरक्षा यंत्रणेकडून सांगण्यात येत आहे.

सीरियातील दहशतवादी संघटनांचा खात्मा करण्यासाठी रशियाने सहकार्य केले होते आणि त्याचाच राग मनात धरून मागील काही वर्षांत ‘आयसिस’ने येथे अनेक हल्ले घडवून आणले.

वॉशिंग्टन सेंटर फॉर स्ट्रॅटेजिक अँड इंटरनॅशनल स्टडीजने दिलेल्या माहितीनुसार, रशियात आणि मध्य आशियाईतील जवळपास ८,५०० जिहादी यांनी आयसिस आणि अन्य दहशतवादी संघटनांत सहभाग घेतल्याचे समोर आले आहे. त्यामुळे विश्वचषक स्पर्धेवरील संकट अधिक वाढले आहे. यापूर्वी फ्रान्समध्ये २०१६ मध्ये झालेली युरो, २०१४ची लंडन ऑलिम्पिक आणि २०१६च्या रिओ ऑलिम्पिक स्पर्धेवरही दहशतवादी हल्ल्याचे सावट होते.