रशियात पार पडलेल्या विश्वचषकात बाद फेरीत आपला गाशा गुंडाळावा लागलेल्या अर्जेंटिनाच्या संघाचे प्रशिक्षक जॉर्ज सॅम्पपावली यांनी आपल्या पदावरुन पायउतार होण्याचा निर्णय घेतला आहे. अर्जेंटिना फुटबॉल असोसिएशन आणि प्रशिक्षक सॅम्पपावली यांच्यात एकमताने झालेल्या करारानंतर हा निर्णय घेण्यात आल्याचं संघटनेने प्रसिद्धीपत्रकात म्हटलं आहे. बाद फेरीत अर्जेंटिनाला फ्रान्सने पराभवाचा धक्का दिला होता.

सॅम्पपावली यांच्या जाण्यामुळे दोन वेळा विश्वविजेत्या अर्जेंटिनावर गेल्या ४ वर्षांमध्ये चौथा प्रशिक्षक बदलाची नामु्ष्की आली आहे. वर्षभरापूर्वी सॅम्पपावली यांनी अर्जेंटिनाच्या प्रशिक्षकपदाचा पदभार सांभाळला होता. मात्र विश्वचषकातील खराब कामगिरीमुळे त्यांना लगेचच पदावरुन पायउतार व्हावं लागलं आहे. रशियात पार पडलेल्या फिफा विश्वचषकात सॅम्पपावली यांच्या रणनिती अर्जेंटिना संघासाठी चांगल्याच मारक ठरल्या. लिंबूटिंबू संघाविरुद्धही अर्जेंटिनाला बरोबरीत समाधान मानावं लागलं. स्थानिक वृत्तसंस्थानी दिलेल्या माहितीनुसार इंग्लिश प्रिमीअर लिग स्पर्धेतील टोटॅनहम क्लबचे प्रशिक्षक मॉरिश पॉचिटीनो, अटलॅटीको माद्रिदचे प्रशिक्षक दिएगो सिमॉन्स हे अर्जेंटिनाच्या आगामी प्रशिक्षकपदाच्या शर्यतीत आहेत.