फर्नाडो हिएरो यांच्याकडे जबाबदारी

विश्वचषक फुटबॉल स्पर्धा काही तासांवर आली असताना स्पेनच्या संघ व्यवस्थापनाने प्रशिक्षक ज्युलेन लोपेतेगुई यांची हकालपट्टी केल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. त्यांच्या जागी फर्नाडो हिएरो यांची नियुक्ती करण्यात आली आहे. स्पेनचा पहिला सामना पोर्तुगालबरोबर १५ जून रोजी होणार आहे.

स्पॅनिश फुटबॉल महासंघाचे मुख्य लुईस रुबियालेस यांनी ही घोषणा केली. रिअल माद्रिद क्लबने विश्वचषक स्पर्धेनंतर लोपेतेगुई यांच्याकडे व्यवस्थापकपदाची जबाबदारी देण्यात आल्याचे जाहीर केल्यामुळेच स्पॅनिश महासंघाने त्यांना पदमुक्त करण्याचा निर्णय घेतला आहे. लोपेतेगुई यांनी रिअल संघाबरोबर २०२० पर्यंत करार केला आहे.

‘‘लोपेतेगुई यांना डच्चू देण्याचा तडकाफडकी निर्णय खेळाडूंसाठी धक्कादायक आहे. मात्र संघासाठी आम्ही खूप अनुभवी सपोर्ट स्टाफ देत आहोत. हिएरो यांनी स्पॅनिश लीगमधील द्वितीय श्रेणी विभागात खेळणाऱ्या ओव्हिएदो संघाचे प्रशिक्षक म्हणून काम केले आहे. त्यांच्याकडे प्रशिक्षकपदाचा भरपूर अनुभव आहे. ते संघातील खेळाडूंना खूप चांगल्या रीतीने मार्गदर्शन करतील असा मला विश्वास आहे,’’ असे रुबियालेस यांनी सांगितले. हिएरो यांनी रिअल माद्रिद संघाचे कर्णधार म्हणूनही काम केले आहे. सध्या ते स्पेनचे क्रीडा संचालक म्हणून काम पाहात होते.

लोपेतेगुई यांनी २०१६ मध्ये स्पेन संघाचे प्रशिक्षकपदाची सूत्रे हाती घेतली होती. त्यानंतर स्पेन संघाने वीस सामन्यांमध्ये एकही सामना गमावलेला नाही. लोपेतेगुई यांना वरिष्ठ खेळाडू म्हणून फारसा अनुभव नाही. माद्रिद व बार्सिलोना संघात त्यांचा समावेश होता. मात्र बऱ्याच वेळा त्यांना राखीव खेळाडूचीच भूमिका स्वीकारावी लागली होती.

स्पेनच्या १९ व २१ वर्षांखालील संघाकडून खेळताना त्यांनी यशस्वी कामगिरी केली होती. पोतरे संघाबरोबर त्यांनी प्रशिक्षक म्हणून १८ महिने काम केले होते. मात्र चॅम्पियन्स लीग सुरू असतानाच त्यांची हकालपट्टी करण्यात आली होती.