फुटबॉलच्या वेडातून अतिसामान्य ते अतिविशेष बनण्याचा अनोखा प्रवास

आजोबांना गोळी घालून ठार मारल्याचा धक्का सहन करणारा आणि युद्धामध्ये घरदार उद्ध्वस्त होऊन अक्षरश: देशोधडीला लागल्याने निर्वासितांच्या छावणीत बालपणातील काही काळ व्यतीत करावा लागलेला ल्युका. त्या छावणीपासून सुरू झालेला ल्युकाचा प्रवास आता क्रोएशियाचा कर्णधारपदापर्यंत येऊन पोहोचला आहे. फुटबॉल विश्वातील आघाडीचा मध्यरक्षक म्हणून उदयाला आलेला ल्युका मॉडरिक यंदाच्या विश्वचषकात क्रोएशियाचे नेतृत्व करणार आहे.

क्रोएशियाच्या झॅटोन आब्रोवॅकी या खेडय़ात १९८५ साली जन्मलेल्या मॉडरिकने बालपणीच क्रोएशियाच्या स्वातंत्र्ययुद्धातील चटके सोसले. सर्बियाच्या फौजांनी त्याच्या आजोबांना मारून घरदार जाळून टाकलेले त्याने त्याच्या डोळ्यांनी बघितले होते. त्यामुळे त्याच्या घरातील उर्वरित सदस्यांना निर्वासित बनून झादर या एका लहानशा खेडय़ात राहायला जावे लागले. मात्र, तिथेदेखील मॉडरिकचे फुटबॉलचे वेड कायम होते. २००८ साली टोटनहॅम हॉटस्पर क्लब तर २०१२ सालापासून रेयाल माद्रिदसारख्या अव्वल क्लबकडून खेळत नाव गाजवण्याची संधी त्याला मिळाली. त्यानंतर त्याने मागे वळून पाहिलेच नाही. यंदाच्या विश्वचषकामध्ये ‘ड’ गटात अर्जेंटिनासारख्या मातब्बर प्रतिस्पध्र्याशी झुंजण्याची तयारी करून घेण्यात तो कर्णधार म्हणून यत्किंचितही कसूर ठेवत नाही. संघातील सर्वाधिक अनुभवी खेळाडू आणि अखेरचा विश्वचषक असे समीकरण. आता नाही तर केव्हाच नाही, हे मनात ठेवूनच तो संघासह रशियात दाखल झाला आहे. मॉडरिकसमवेत मध्यफळीत इव्हान रॅकिटिक आणि मॅकेटो कोव्हॅसिक तर आक्रमणफळीत मारिओ आणि मंडझुकीक असे दमदार खेळाडू संघामध्ये आहेत. सर्व गटांमध्ये सर्वाधिक कठीण गट मानल्या जात असलेल्या ड गटात र्अजेटिना आणि नायजेरीयाला कोणत्याही क्षणी हरवण्याची क्षमता असलेल्या या संघाची मुख्य मदार ही त्यांचा कर्णधार मॉडरिकच्या कामगिरीवरच अवलंबून राहणार आहे.

फुटबॉल घेऊनच झोपायचा

मॉडरिकला फुटबॉलचे इतके वेड होते की तो दिवसरात्र फुटबॉलशी खेळत बसायचा. अगदी रात्री झोपतानादेखील तो आपल्याजवळ फुटबॉल ठेवायचा. त्याच्या प्रारंभीच्या काळाबाबत त्याचे प्रारंभीचे प्रशिक्षक जॉसिप बॅजलो यांनी ‘‘एका शरणार्थीच्या निवाऱ्यात एक मुलगा सतत फुटबॉल खेळतो, असे मला समजले. मलादेखील तो असाच फुटबॉलशी खेळताना आढळून आला. त्यावेळी त्याची फुटबॉलबाबतची ओढ बघून मी त्याला एनके झादर या आमच्या क्लबमध्ये घेतले. तिथपासून त्याने एक खेळाडू म्हणून नाव कमवायला प्रारंभ केला. शाळेच्या संघात निवड झाल्यानंतर तो सगळ्यांच्या नजरेत भरला. तो त्याच्या पिढीसाठी एक आदर्शदेखील आहे,’’ असे सांगितले.

सराव करताना बॉम्ब पडायचे

आम्ही सराव करायला जात असताना बॉम्बगोळे पडायचे आणि आम्ही एखादे सुरक्षित स्थान शोधायचो, असे हजारो वेळा घडले असेल. मात्र, तरीही मॉडरिकचे फुटबॉलबद्दलचे प्रेम कमी झाले नाही. किंबहुना अशा हल्ल्यांची सवय झाल्याने तो मनाने अधिकच कणखर बनत गेला, अशी आठवण मॉडरिकचा बालपणीचा मित्र मारिजान बुलजात याने सांगितली. अशा प्रकारच्या विपरीत परिस्थितीचा सामना करतच तो पुढे गेला असल्याने कर्णधार म्हणून तो कोणत्याही क्षणी डगमगत नाही. इतक्या विपरीत परिस्थितीतून पुढे जाण्यासाठी त्याने प्रचंड संघर्ष केलेला असल्याने कोणताही मोठा निर्णय तो अगदी सहजपणे घेऊ शकतो, असेही त्याने नमूद केले.