बर्लिन :  जगज्जेत्या जर्मनीच्या पराभवाचे पडसाद डॉइशलॅण्डमध्ये खूप तीव्रतेने उमटले. माध्यमांनी या पराभवाला ‘बाद..’, ‘जगाचा अस्त..’पासून ते ‘नि:शब्द..’ असे मथळे वृत्तपत्रांमध्ये दिसत आहेत. छापील माध्यमांचे मथळे पोहोचण्यापूर्वी समाजमाध्यमांवर-देखील संतप्त प्रतिक्रियांचे रान पेटले होते. अघटित अन् अनपेक्षित पराभव व विश्वचषकातून थेट बाहेर पडण्याचा धक्का जर्मनीसारख्या सुसंस्कृत देशातील समाजमनाला पेलणेदेखील बरेचसे अवघडच गेल्याचे माध्यमांच्या प्रतिक्रियांतून जाणवते. कोणत्याही खेळात जय-पराजय, यश-अपयश हा अविभाज्य भाग असतो. मात्र जेव्हा तो पराभव खूप मोठा किंवा अशक्यतेच्या सीमेवरचा असतो, तेव्हा त्याचे पडसाददेखील तितकेच तीव्रतेने उमटतात. कुणी शोचनीय तर कुणी फुटबॉल इतिहासातील मानहानीकारक पराभव अशा शब्दांत त्याची संभावना केली आहे.

समाजमाध्यमात संतापाचा आगडोंब

या पराभवाचे पडसाद ‘ट्विटर’सह अन्य समाजमाध्यमांमध्ये प्रचंड आक्रोशासह उमटले. ‘अशक्य व वेदनादायी’, ‘वाईट संघ बरोबर असल्यास पराभव मान्य असतो, पण असा संघ असताना दारुण पराभव कल्पनातीत आहे’, ‘इतका वाईट पराभव स्वप्नातही पाहिला नव्हता’, ‘हेच होणार होते’, ‘पराभव नव्हे, हे तर दु:स्वप्न’ अशा प्रतिक्रिया  समाजमाध्यमांमध्ये दिसून आल्या.

जर्मनीबाहेरील शेरेबाजी

कोरियाच्या विजयाबद्दल तेथील माध्यमांनी विश्वचषक जिंकल्याप्रमाणे जल्लोष केला. ‘कोण म्हणते आम्ही अंतिम १६मध्ये पोहोचलो नाही, आम्ही जगातील अव्वल संघाला हरवलंय’, ‘कोरियाला गोड हादरा’, ‘आम्हाला तुमचा अभिमान आहे’, ‘साखळीतून बाद पण सन्मानाने’ असेही मथळे झळकले आहेत. कोरियाच्या विजयाचा सर्वाधिक आनंद कोरियासह मेक्सिकोलाही झाला. त्यामुळे एरो मेक्सिको कंपनीने दक्षिण कोरियाला परतणाऱ्या प्रवाशांसाठी विशेष २० टक्के सूट जाहीर केली.

छापील माध्यमांचा सूर

जर्मनीतील ‘बिल्ड’ या दैनिकाने एकीकडे गतविश्वचषकातील ब्राझीलसमवेतच्या ७-१ अशा फरकासह विजयोत्सव करणाऱ्या क्रूसचे छायाचित्र आणि त्यासोबत ‘शब्दच संपले’ असा मथळा दिला आहे. त्याच बाजूला बुधवारच्या जर्मनीच्या पराभवाचा ०-२ असा फलक छापून पुन्हा ‘शब्दच संपले’ हाच मथळा वापरून त्या वृत्ताला पहिल्या पानावर प्रसिद्धी दिली आहे. ‘डाय वेल्ट’ या दैनिकाने टोनी क्रूसचे निराश छायाचित्र आणि त्या बाजूला ‘..आणि सारं संपलं’ अर्थात ‘ओव्हर अ‍ॅण्ड आऊट’ असा मथळा दिला आहे. ‘ऱ्हाईनीशे पोस्ट’ या दैनिकाने तर केवळ ‘बाद’ एवढाच मथळा अत्यंत मोठय़ा अक्षरात छापला आहे. ‘फ्रॅँकफर्टर अलेजमइन’ या दैनिकाने गोलजाळीत गेलेल्या चेंडूकडे निराशेने पाहणारा गोलरक्षक कर्णधार नॉयरचे छायाचित्र छापून ‘जर्मनीची घसरगुंडी’ असा मथळा दिला आहे. ‘डेर टेग्ज स्पीगल’ या दैनिकानेदेखील ‘बाद’ हाच मथळा टाकून कपाळाला हात लावलेले प्रशिक्षक जोकिम लो यांचे मोठे छायाचित्र छापले आहे, तर तेथील ‘टाइम्स’ने ‘जगाचा अंत’ आणि ‘असा दिवस, जिथे जर्मन दिसलेच नाहीत’ अशा मथळ्यासोबत गोलरक्षक नॉयरविना खुल्या पडलेल्या जर्मनीच्या गोलजाळीचे छायाचित्र टाकले आहे.