आव्हानात्मक मेक्सिकोशी आज झुंज; म्युलर, नॉयर यांच्यावर सर्वाच्या नजरा

एखादा नावाजलेला खेळाडू संघाला फक्त सामना जिंकून देऊ शकतो, मात्र विश्वचषक जिंकायचा असेल तर तुमच्याकडे अशा अनेक खेळाडूंची फौज हवी असते. याच सूत्रावर आधारित २०१४च्या विश्वचषक फुटबॉल स्पर्धेचे विजेतेपद मिळवणाऱ्या जर्मनीचा संघ सलग दुसऱ्यांदा विश्वचषकावर नाव कोरण्याचे लक्ष्य समोर ठेवून आपल्या मोहिमेला सुरुवात करणार आहे. रविवारी त्यांच्यासमोर मेक्सिकोचे आव्हान असणार आहे. शेवटचा विश्वचषक खेळणाऱ्या गोलरक्षक मॅन्युएल नॉयरची तंदुरुस्ती, प्रशिक्षक जोआकिम लो यांचे यशस्वी मार्गदर्शन आणि अनुभवी तसेच युवा खेळाडूंची योग्य सांगड या गोष्टींचा मेळ जर्मनी एकत्र साधणार का, हे पाहणे रंजक ठरेल.

मागील विश्वचषकात ‘गोल्डन ग्लोव्हज’चा पुरस्कार पटकावणारा नॉयर आठ महिन्यांनंतर संघात परतल्याने जर्मनीची चिंता काहीशी कमी झालेली आहे. मात्र संघाचा सध्याचा फॉर्म हा चिंतेचा विषय ठरू शकतो. सहा सराव सामन्यांमध्ये अवघा एकच विजय त्यांना मिळवता आलेला आहे.

दुसरीकडे मेक्सिकोचे प्रमुख बचावपटू नेस्तोर आरोजो आणि दिएगो रेयेस हे दोघेही स्पर्धेतून बाहेर पडले आहेत. २०१७च्या कॉन्फेडरेशन चषकातील सामन्यात जर्मनीच्या ब-संघाने त्यांना ४-१ असे हरवले होते. त्याचा वचपा काढण्याची संधी या वेळेला मेक्सिकोला आहे. जेव्हियर हर्नाडेजवर मेक्सिकोची मदार असणार आहे.

तुम्हाला हे माहीत आहे?

  • ६ मेक्सिकोने गेल्या सहाही विश्वचषकांमध्ये उपांत्यपूर्व फेरीत धडक मारली आहे.
  • १९९०च्या विश्वचषकापासून प्रत्येक विश्वचषकात जर्मनीने आपल्या गटात अव्वल स्थान मिळवले आहे. तसेच मागील चार विश्वचषकांत उपांत्य फेरी गाठली आहे.
  • ४ जर्मनी-मेक्सिको यांच्यातील विश्वचषकातील हा चौथा सामना असणार आहे. यापूर्वीच्या दोन सामन्यांमध्ये जर्मनीने मेक्सिकोला पराभूत केले आहे, तर एका सामन्यात त्यांना बरोबरीवर समाधान मानावे लागले.