ब्राझिलचा स्टार फुटबॉलपटू नेयमारने 2018च्या फिफा वर्ल्डकपमध्ये दोन गोल केले आहेत. मात्र, तो जास्त चर्चेत आहे मैदानावर करत असलेल्या नौटंकीमुळे. फाऊल झाल्याचा कांगावा असो, दुखापत झाल्याचे सांगत मैदानावर लोळण घेणे असो अशा कृत्यांमुळे त्यानं एकट्यानं आत्तापर्यंत 14 मिनिटांचा वेळ फुकट घालवला आहे. सामन्यादरम्यान अशा प्रकारे व्यत्यय आणल्यामुळे खुद्द रशियामध्ये चाहत्यांनी त्याच्यावर टीका केली आहे.
त्याचे दोन महत्त्वाचे गोल बाजुला राहिले असून त्याच्या कोलांट्याउड्यांची व नौटंकीचीच जास्त चर्चा रंगत आहे.

नेयमारच्या गोलमुळे ब्राझिल उपांत्यपूर्व फेरीत पोचला असला तरी त्याच्या नौटंकीची मात्र निर्भत्सना होत आहे. आत्तापर्यंतच्या चर सामन्यांमध्ये फाऊल प्रकरण नेयमारच्या बाबतीत 24 वेळा झाला आहे. सगळे प्रयत्न तितके वाईट नव्हते, परंतु सोशल मीडियावर मात्र त्याची खिल्ली उडवण्यात आली आहे. पर्वतांवरून घरंगळत येणे, टेकड्या व विविध प्रकारच्या वातावरणात उड्या मारणे असे विविध मीम्स त्याच्यावर करण्यात आले आहेत. केएफसी साउथ अफ्रिकेनं तर त्यांच्या फूड चेनच्या बाहेर कोलांट्या उड्या मारत येणारा खेळाडू असं विडंबन करणारी जाहिरात बनवली.

आरटीएसनं नेयमारनं फुकट घालवलेला वेळ हा व्यवस्थित मोजला असून त्यानं सगळ्यात जास्त म्हणजे 5 मिनिटं 29 सेकंद इतका वेळ मेक्सिकोविरूद्धच्या सामन्यात फुकट घालवल्याचं दाखवलं आहे. सर्बियाविरूद्ध सुमारे दोन मिनिटं व स्वित्झर्लंडविरोधात सुमारे पावणेतीन मिनिटं नेयमारनं खाल्ली आहेत. एकूण मिळून 13 मिनिटं 50 सेकंदांचा वेळ त्याच्या नौटंकीमुळे फुकट गेला. उपांत्यपूर्व फेरीत आज ब्राझिलचा मुकाबला बेल्जियमशी असून साहजिकच सगळ्यांचं लक्ष नेयमारकडे व त्याच्या नौटंकीकडे असेल.