|| मिलिंद ढमढेरे

फुटबॉलची आंतरराष्ट्रीय स्पर्धा व फॅशन याचे अतूट नाते आहे. या खेळाचे चाहते दोनशे देशांमध्ये असल्यामुळे स्पर्धेद्वारे आपल्या नवोदित उत्पादनांचे विपणन व जाहिरातबाजी करण्यासाठी अनेक बहुराष्ट्रीय कंपन्या उत्सुक असतात. रशियात सुरू असलेली विश्वचषक स्पर्धाही त्यास अपवाद नाही. स्पर्धेत सहभागी झालेल्या संघांच्या पोशाखापासून ते चाहत्यांच्या पोशाखांपर्यंत सर्वाचेच कपडे आकर्षक असतात.

सहभागी झालेल्या संघांना आंतरराष्ट्रीय फुटबॉल महासंघाच्या नियमावलीनुसार पोशाख परिधान करावा लागतो. पण स्पर्धेनिमित्त आयोजित केले जाणाऱ्या विविध सांस्कृतिक कार्यक्रमांसाठी त्यांना आपल्या आवडीचा पोशाख परिधान करण्यास परवानगी असते. नायजेरियन संघाचे स्पर्धेसाठी आगमन झाले, त्या वेळी त्यांनी परिधान केलेला पोशाख यंदाच्या संघांनी परिधान केलेल्या पोशाखांमधील सर्वोत्तम पोशाख ठरला आहे. सांस्कृतिक समारंभासाठी खास तयार केलेल्या पोशाखावर त्यांनी फुटबॉल चेंडूचे चित्र खूपच दिमाखदार पद्धतीने छापले आहे.

खेळाडूंचे क्रीडासाहित्य तयार करणाऱ्या सर्वच बहुराष्ट्रीय कंपन्यांमध्ये खेळाडूंकरिता आकर्षक कपडे तयार करण्यासाठी नेहमीच चढाओढ निर्माण झालेली असते. अंतर्वस्त्रापासून ते टोपीपर्यंत सर्व प्रकारच्या कपडय़ांवर विश्वचषक स्पर्धेचे बोधचिन्ह अतिशय खुबीने छापण्यास ते विसरत नाहीत. क्रीडासाहित्य तयार करणाऱ्या कंपन्यांबरोबरच कापड व बूट उद्योगात असलेल्या अनेक आंतरराष्ट्रीय कंपन्यांनाही विश्वचषक स्पर्धेने मोहिनी घातली नाही तरच नवल.

ऑनलाइन विपणन क्षेत्रात आघाडीवर असलेल्या काही कंपन्यांनी स्पर्धेनिमित्त रशियात अनेक ठिकाणी ई-स्टोअर सुरू केली आहेत व त्यांना अतिशय भरघोस प्रतिसाद मिळाला आहे. अन्य देशांमध्येही अशी उत्पादने विकण्याचा मोह त्यांना टाळता आलेला नाही. अनेक कंपन्यांनी स्पर्धेपूर्वी काही महिने अगोदर फॅशन्स डिझाइन क्षेत्रातील तज्ज्ञांची मदत घेऊन अनेक नवीन उत्पादने तयार केली आहेत. बुटांबरोबरच रिस्ट बँड, कपाळावर लावायची पट्टी, किचेन्स, कपबशा, काचेचे मग्ज यावरही आपल्या कंपन्यांची जाहिरात करण्याचीही संधी काही कंपन्यांनी साधली आहे. सामने आयोजित केल्या जाणाऱ्या शहरांपैकी तीन-चार शहरांमध्ये फॅशन शोदेखील आयोजित करण्यात आले आहेत.

लिओनेल मेसी, ख्रिस्तियानो रोनाल्डो, नेयमार ज्युनिअर आदी अनेक नामवंत खेळाडूंचे लक्षावधी चाहते आहेत. रशियात सुरू असलेल्या विश्वचषक स्पर्धेतील प्रत्येक सामन्याच्या वेळी स्टेडियम हाउसफुल्ल असतात. स्टेडियमवर उपस्थित असलेले चाहते आपल्या आवडत्या खेळाडूचे छायाचित्र असलेले जर्सी घालूनच सामन्याचा आनंद घेत असतात. एवढेच नव्हे सर्वात जास्त कोण छान दिसतो याबाबतही त्यांच्यात अलिखित स्पर्धा दिसून येते. हे लक्षात घेऊनच स्टेडियम परिसरात असलेल्या दुकानांमध्ये असे जर्सी ठेवले जात आहेत व त्यांना मिळणारा प्रतिसादही अभूतपूर्व आहे.

आपल्या देशाच्या पोशाखाप्रमाणे टोपीही परिधान करण्याकडे त्यांचा कल दिसून येत आहे. काही कंपन्यांनी चाहत्यांकरिता आकर्षक पोशाखाबद्दल स्पर्धाही ठेवल्या आहेत. अनेक देशांमध्ये अशा स्पर्धा आयोजित करण्यात आल्या आहेत. तीनचार कंपन्यांनी स्पर्धामधील पारितोषिके म्हणून स्पर्धेतील उपांत्य व अंतिम फेरीच्या सामन्यांची तिकिटे तसेच सामन्यांच्या ठिकाणी मोफत निवासव्यवस्था देण्याचे ठरवले आहे. काही शीतपेय कंपन्यांनी चक्क आपल्या शीतपेयांच्या बाटलीवर नामवंत खेळाडूंची छायाचित्रे लावून त्याद्वारे आपल्या उत्पादनाची जाहिरातबाजी करण्याची कल्पना अमलात आणली आहे. तसेच त्यांनी आपल्या कंपन्यांची जाहिरात करण्यासाठी आंतरराष्ट्रीय दर्जाच्या संगीत कलाकारांनाही सदिच्छादूत म्हणून नियुक्त केले आहे. स्पर्धेचे औचित्य साधून फुटबॉलविषयी नवीन व्हिडिओ गेम्सही सुरू  करण्यात आले आहेत. भारतीय उपखंडात आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्पर्धा किंवा आयपीएलसारख्या स्पर्धाच्या वेळी जशी फॅशनची रेलचेल दिसून येत असते, त्याप्रमाणे विश्वचषक फुटबॉल स्पर्धेच्या वेळी असाच जल्लोष दिसून येत असतो. सामने हे मनोरंजनाचे साधन असल्याचे मानून चाहते अशा फॅशनच्या उत्साहात आपल्याला मनसोक्त आनंद मिळवण्यासाठी उत्सुक असतात. हीच विश्वचषकाची किमया आहे.