यजमान रशियापुढे क्रोएशियाचे तगडे आव्हान

फुटबॉल विश्वचषकाच्या इतिहासात अद्याप एकदाही विजेतेपद पटकावू न शकलेल्या यजमान रशिया आणि क्रोएशिया या दोन संघांचा सामना शनिवारी उपांत्यपूर्व फेरीत रंगणार आहे. दोन्ही संघांनी यापूर्वीच्या सामन्यांमध्ये नावाजलेल्या संघांना पराभूत केले असल्याने त्यांचा आत्मविश्वास दुणावलेला आहे. शनिवारी यजमान आगेकूच करतात की क्रोएशिया पुन्हा १९९८च्या विश्वचषकाप्रमाणे उपांत्य फेरीत धडक मारतो, त्याचा अंदाज बांधणे फुटबॉलतज्ज्ञांसाठी बिकट बनले आहे.

रशियाने स्पेनला आणि क्रोएशियाने डेन्मार्कला पेनल्टी शूटआउटमध्ये गारद करत उपउपांत्यपूर्व फेरी गाठली आहे. क्रोएशियाने स्वतंत्र राष्ट्र म्हणून फुटबॉल विश्वचषकात अवघ्या दोन दशकांपूर्वी पदार्पण करताना त्याच वर्षी विश्वचषकाची उपांत्य फेरी गाठण्याची किमया करून दाखवली होती. त्यानंतर त्यांना ही संधी याच विश्वचषकात मिळण्याची शक्यता असल्याने क्रोएशियाचा संघ उपांत्य फेरीसाठी जीवतोड प्रयत्न करणार आहे. मात्र स्टेडियम आणि मैदानाबाहेरील लाखो रशियन पाठीराख्यांच्या प्रोत्साहनाने प्रचंड जोशात खेळणारा रशियाचा संघ क्रोएशियाला तोडीस तोड खेळ सादर करीत आगेकूच करण्यासाठीच मैदानावर उतरणार आहे. घरच्या मैदानावर किमान उपांत्य फेरीपर्यंत तरी धडक मारण्याचे ध्येय ठेवूनच रशिया स्पर्धेत सहभागी झाला आहे. रशियाचे डेनिस चेरीशेव्ह आणि आर्टेम झ्युबा यांच्यासारखे दोन आक्रमक पूर्ण बहरात असल्याने रशियाचे आक्रमण रोखणे हीदेखील क्रोएशियाची डोकेदुखी ठरणार आहे. तसेच रशियाचे प्रशिक्षक स्टॅनिस्लॅव चेरशेसोव यांच्याकडूनदेखील क्रोएशियासाठी काही विशेष व्यूहरचना केली जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे शनिवारच्या सामन्यात रशियाने क्रोएशियाला चकित केले तरी कुणालाही आश्चर्य वाटणार नाही.

प्रशिक्षक झ्लॅटको डॅलिक यांच्या मार्गदर्शनाखाली क्रोएशियाच्या संघाने साखळी सामन्यात र्अजेटिनासारख्या संघाला ३-० असे अत्यंत मोठय़ा फरकाने पराभूत केले असल्याने या संघाकडून सगळ्यांनाच मोठय़ा अपेक्षा आहेत. कोणत्याच मोठय़ा नावाचे किंवा संघाचे दडपण घेऊन ते खेळत नाहीत, हेच त्यांचे वैशिष्टय़ आहे. डेन्मार्कविरुद्धच्या लढतीत क्रोएशियाला तितकासा सफाईदार खेळ दाखवता न आल्याने तो सामना पेनल्टी शूटआउटपर्यंत खेचला गेला होता. त्यामुळे क्रोएशियाला या सामन्यात पुन्हा एकदा आक्रमणाकडे विशेष लक्ष द्यावे लागणार असले तरी यजमानांना पराभूत करण्याची क्षमता या संघात निश्चितच आहे.

तुम्हाला हे माहीत आहे?

  • क्रोएशियाला आतापर्यंत दोन वेळा यजमान संघाशी सामना करावा लागला असून दोन्ही वेळेस त्यांना पराभवाचे तोंड पाहावे लागले आहे. १९९८च्या विश्वचषकात यजमान फ्रान्सने त्यांना २-१ असे तर, २०१४ मध्ये ब्राझीलने त्यांच्यावर ३-१ अशी मात केली होती.
  • विश्वचषकात युरोपियन संघाशी झालेल्या सात लढतींपैकी क्रोएशियाने फक्त एकच लढत (पाच विजय, एक बरोबरी) गमावली आहे तर, रशियाने स्पेनवगळता एकाही युरोपियन संघाला आजपर्यंत हरवलेले नाही.
  • पाचवा विश्वचषक खेळत असलेल्या क्रोएशियाने १९९८मध्ये म्हणजेच २० वर्षांपूर्वी पहिल्यांदा उपांत्य फेरी गाठली होती. त्यानंतर तीन विश्वचषकात त्यांचे आव्हान साखळीतच संपुष्टात आले.
  • विश्वचषकातील मागील आठ ही सामने क्रोएशियाने जिंकलेले आहेत. तसेच आतापर्यंतच्या विश्वचषकातील १२ गोलपैकी १० गोल त्यांनी मध्यंतरानंतर केले आहेत.
  • क्रोएशियाच्या संघातील सात खेळाडूंना स्पर्धेत एकदा पिवळे कार्ड दाखवण्यात आले असून, उपांत्यपूर्व फेरीत सहभाग असलेल्या इतर संघांपैकी ही आकडेवारी सर्वाधिक आहे.