विश्वचषकाच्या सामन्यादरम्यान अनेक गोष्टी आपले लक्ष वेधून घेतात. अशीच लक्ष वेधून घेणारी एक गोष्ट नुकतीच घडली आहे. यजमानपद भूषवित असलेल्या रशियन प्रेक्षकांचे सर्वच स्तरातून कौतुक होत आहे. त्याचे कारणही तसेच आहे. रशिया आणि क्रोएशिया यांच्यात उपांत्यपूर्व फेरीचा शेवटचा सामना रंगला. या सामन्यात क्रोएशियाने रशियाला शूट आऊट मध्ये ४-३ने पराभूत केले. आपल्याच भूमीत पराभूत झाल्याचे दु:ख असतानाही येथील प्रेक्षकांनी एकत्र येत सामन्यानंतर स्टेडीयममधील स्टँड साफ केले.

फुटबॉलच्या प्रेमापोटी आणि आपल्याच देशात हे सामने रंगत असल्याने येथील फुटबॉलप्रेमींनी रशिया विरुद्ध क्रोएशियाच्या सामन्याला मोठ्या प्रमाणात हजेरी लावली होती. स्टेडीयममध्ये विविध देशांच्या प्रेक्षकांनी केलेला कचरा या रशियन प्रेक्षकांनी सामन्यानंतर साफ केला. यामध्ये पाणी किंवा शीतपेयांच्या बाटल्या, खाण्याच्या पदार्थांची वेष्टने आणि इतरही गोष्टींचा समावेश होता. कचरा गोळा करण्यासाठी त्यांनी प्लास्टीकच्या मोठ्या पिशव्या घेतल्या आणि संपूर्ण स्टेडीयममध्ये प्रेक्षक बसत असलेल्या जागी जाऊन तेथील कचरा उचलला. त्यामुळे या रशियन नागरिकांनी सर्वांसमोरच एक आदर्श उभा केला असे म्हणायला हरकत नाही.

याआधी अशीच काहीशी कृती जपानी संघानेही केली होती. बेल्जिअम विरुद्ध जपान या सामन्यात जपानचा पराभव झाला. पण स्टेडियममधून बाहेर जाण्याआधी जपानी संघानं ड्रेसिंग रूम पूर्णपणे स्वच्छ केली आणि आवरून ठेवली. स्पर्धेच्या काळात प्रत्येक संघाला आपले सामान ठेवण्यासाठी लॉकर आणि ड्रेसिंग रूम देण्यात आली होती. जपानी संघातील खेळाडूंना देण्यात आलेली खोली त्यांनी याशिवाय यजमानपद भूषविणाऱ्या रशियाचे धन्यवाद मानणारी एक छोटीशी चिट्ठीदेखील त्यांनी लिहून ठेवली होती.