पहिल्याच सामन्यात स्वित्झलँड कडून बरोबरी पत्करावी लागलेला ब्राझील एका विजयासह इ- गटात सध्या अव्वल स्थानावर आहे. बाद फेरीत जाण्यासाठी त्यांना विजय किंवा बरोबरीदेखील चालणार असली तरी गटात अव्वल स्थान मिळवण्यासाठी मोठा विजय मिळवण्याच्या इराद्यानेच ब्राझीलचा संघ बुधवारी मैदानात उतरण्याची शक्यता आहे.

पहिल्या सामन्यात पत्करावी लागलेली बरोबरी आणि दुसऱ्या सामन्यात कोस्टारिकासारख्या सामान्य संघाने अखेरच्या क्षणापर्यंत झुंज दिल्याच्या स्मृती मागे टाकत ब्राझीलला त्यांच्या लयीत खेळ करून दाखवावा लागणार आहे. कोस्टारिकावर ब्राझीलने अगदी अखेरच्या क्षणातील दोन गोलमुळे २-० असा विजय मिळवलेला असला तरी त्यामुळे त्यांच्या प्रमुख आक्रमकांचा आत्मविश्वास परतण्यास मदत झाली आहे. कुटिन्हो आणि नेयमार हीच ब्राझीलची प्रमुख दोन अस्त्रे असून सर्बियाविरुद्धच्या सामन्यातदेखील त्यांनाच कामगिरी करून दाखवावी लागणार आहे. कोस्टारिकाच्या सामन्यात जखमी झालेल्या डग्लस कोस्टाविनाच ब्राझीलला या सामन्यात मैदानात उतरावे लागणार आहे. त्याशिवाय त्यांचे प्रशिक्षक टेटे काही सकारात्मक बदल करण्याची शक्यतादेखील नाकारता येत नाही. सर्बियाचा संघ कागदावर भक्कम वाटत नसला तरी त्यांचे खेळाडू अखेरची संधी साधण्याच्या इराद्यानेच मैदानात उतरणार आहेत. ब्राझीलला विजय मिळवण्याचा दबाव असून त्या तुलनेत सर्बियाचा संघ मुक्तपणे खेळणार असल्याने ते काहीही चमत्कार करणे अशक्य नाही.

तुम्हाला हे माहीत आहे?

ब्राझीलकडून दोन गोल करणारा कुटिन्हो हा सध्याचा ब्राझीलचा मुख्य आक्रमक आहे. याआधीच्या दोन सामन्यांच्या वेळेमध्ये त्याने संघाकडून सर्वाधिक म्हणजे २२ किलोमीटरपेक्षा जास्त अंतर मैदानावर कापले आहे.