FIFA World Cup 2018 : आजपासून फिफा विश्वचषक रशियात सुरु होणार आह. या स्पर्धेत मेस्सी, रोनाल्डो या सारखे दिग्गज फुटबॉलपटू खेळणार आहेत. जगातील टॉप २ फुटबॉलपटूचे नाव विचारल्यास लहान मुलेही या दोघांचे नाव सांगतील. मात्र याबरोबरच सध्या एका भारतीय खेळाडूची तुलना होऊ लागली आहे. आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत मेस्सीच्या गोलची बरोबरी करणारा आणि रोनाल्डोपेक्षा काही गोल मागे असणारा हा खेळाडू म्हणजे भारताचा फुटबॉल संघाचा कर्णधार सुनील छेत्री.

सुनील छेत्रीने नुकत्याच झालेल्या आंतरखंडीय फुटबॉल स्पर्धेत भारताला स्पर्धेचे विजेतेपद मिळवून दिले. या स्पर्धेदरम्यान त्याने अर्जेंटिनाचा कर्णधार लिओनल मेस्सी याच्या गोलची बरोबरी केली आहे. त्यामुळे त्याची या दोन दिग्गज फुटबॉलपटूनही तुलना होऊ लागली आहे. मात्र, छेत्रीने या तुलनेबाबत आपले मत केले आहे.

सुनील छेत्रीने पत्रकारांशी संवाद साधला. त्यावेळी तो म्हणाला की मी जेव्हा माझी या दोन दिग्गज खेळाडूंशी तुलना केल्याचे ऐकतो, त्यावेळी मी केवळ ५ सेकंदासाठी खुश होतो. पण त्यांनतर मी लगेचच मी विसरून जातो. कारण आपण भारतीय आहोत. पण या दोघांशी माझी तुलना करू नका, असे सुनील छेत्रीने नम्रपणे सांगितले आहे.

‘आपण सर्व जण भारतीय आहोत. आपण हे सारे ऐकून केवळ ५ सेकंद आनंदी व्हावे आणि त्यानंतर ते विसरून जावे. कारण हे दोघे फुटबॉलमधील अतिशय दिग्गज खेळाडू आहेत. या दोघांशी माझी तुलना करण्यात येऊ नये. माझी आणि त्यांची सध्या तरी बरोबरी होऊ शकत नाही’, असेही तो म्हणाला.

हे दोघे आता निवृत्त होतील असे मला वाटत नाही. रोनाल्डो आणि मेस्सी हे दोघेही तंदुरुस्त आहेत. हे दोघेही २०२२चा विश्वचषक देखील नक्कीच खेळतील, असा विश्वासही सुनील छेत्रीने व्यक्त केला.