साखळी गटात दुसऱ्या स्थानावर असलेल्या स्वित्झलँड ला बाद फेरीचे स्थान निश्चित करण्यासाठी कोस्टारिकाविरुद्ध होणारा सामना खऱ्या अर्थाने अग्निपरीक्षेचाच सामना असणार आहे.

विश्वचषक फुटबॉल स्पर्धेत आतापर्यंत स्वित्झलँड ने एकही सामना गमावलेला नाही. त्यांनी पहिल्याच लढतीत पाच वेळा विश्वविजेत्या असलेल्या ब्राझील संघास १-१ असे बरोबरीत रोखले होते. त्यानंतर त्यांनी सर्बियावरही शानदार विजय मिळवला आहे.  हे लक्षात घेऊनच आजच्या सामन्यात विजय मिळवण्याच्याच निर्धाराने स्वित्झलँड चे खेळाडू उतरणार आहेत.

सर्बियाविरुद्धच्या विजयाचे शिल्पकार झेर्दान शाकिरी व ग्रॅनिट झाका यांच्यावर पुन्हा स्वित्झलँड ची मदार असणार आहे. त्यांच्याबरोबरच हॅरीस सेफेरोव्हेक याच्याकडूनही त्यांना चांगल्या कामगिरीची अपेक्षा आहे.

पहिल्या दोन सामन्यांमध्ये पराभव स्वीकारल्यामुळे कोस्टारिकाचे या स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले आहे. फक्त स्पर्धेची सांगता विजयी करण्यासाठीच त्यांचा प्रयत्न राहणार आहे. त्यादृष्टीनेच त्यांना जॉनी अकोस्टा व क्रिस्तियन गॅम्बोआ यांच्याकडून चमकदार खेळाची अपेक्षा आहे. २००६ च्या विश्वचषक स्पर्धेत कोस्टारिकाने सर्व सामने गमाविले होते. शून्य गुणाची पुनरावृत्ती टाळण्यासाठी ते उत्सुक आहेत.