एडसन आरांटेस डो नासिमेंटो अर्थात पेले हा फुटबॉलमधला देव. अनेक पाहण्यांतून आणि जगभरच्या तज्ज्ञांच्या मते पेले हा जगातला सर्वात परिचित क्रीडापटू ठरतो. १९५८ आणि १९७० अशा दोन विश्वचषक स्पर्धामध्ये त्याची अदाकारी जगाला दिसली. स्वीडनमध्ये १९५८ मध्ये झालेल्या स्पर्धेत तो अवघा १७ वर्षांचा होता. उपांत्य फेरीत त्याच्या हॅट्ट्रिकच्या जोरावर ब्राझिलनं त्या वेळच्या बलाढय़ फ्रान्सला ५-२ अशी धूळ चारली होती. १९५८, १९६२ आणि १९७० अशा तिन्ही जगज्जेत्या ब्राझिलियन संघांतून तो खेळला. अशी कामगिरी करणारा तो जगातला एकमेव फुटबॉलपटू. १९६२ आणि १९६६ अशा दोन्ही स्पर्धामध्ये त्याला दुखापतींमुळे अध्र्यावर माघार घ्यावी लागली होती. पेलेच्या खेळामध्ये असं काय होतं? भन्नाट वेगात प्रतिस्पर्धी हाफमध्ये मुसंडी घेणे, ताकदवान फटका लगावताना दोन्ही पायांचा वापर करण्याचं कौशल्य, खेळाचा अचूक अंदाज घेत योग्य वेळी योग्य ठिकाणी गोल करण्यासाठी हजर असणे, हे सगळं साधण्यासाठी आवश्यक असलेली अक्षय ऊर्जा आणि गोलांची भूक! पेलेच्या चतुरस्र खेळातूनच फुटबॉलला ‘ब्युटिफूल गेम’ हे बिरुद लागलं. त्याहीपेक्षा महत्त्वाचं म्हणजे गौरेतर पेलेच्या करिश्म्याने फुटबॉलची लोकप्रियता व्यापक, वर्णातीत, वंशातीत बनली. फुटबॉल हा जगाचा सुंदर खेळ बनला!