22 October 2020

News Flash

FIFA World Cup 2018 : २०० संघ नि २० विश्वचषक.. तरी आठच जगज्जेते कसे?

एखाद्या बिझनेस मॉडेल दृष्टिकोनातून पाहिल्यास, विश्वचषक फुटबॉल स्पर्धा म्हणजे ‘कार्टेल’च वाटेल.

|| सिद्धार्थ खांडेकर

एखाद्या बिझनेस मॉडेल दृष्टिकोनातून पाहिल्यास, विश्वचषक फुटबॉल स्पर्धा म्हणजे ‘कार्टेल’च वाटेल. मोजकेच विजेते, मोजकेच संघ अंतिम फेरीत. १९३० आणि १९३४ मधील विश्वचषक स्पर्धामधील समान दुवा ठाऊक आहे? या प्रत्येक स्पर्धेत दोन पूर्णपणे नवीन संघ अंतिम फेरीत परस्परांशी भिडले! १९३०मध्ये उरुग्वे वि. अर्जेटिना आणि १९३४ मध्ये इटली वि. चेकोस्लोव्हाकिया हंगेरी या दोन सामन्यांमध्ये प्रत्येक संघ पहिल्यांदाच अंतिम फेरीत खेळत होता. त्यानंतर आजतागायत असं घडलेलंच नाही. आंतरराष्ट्रीय फुटबॉल संघटनांचा महासंघ अर्थात ‘फिफा’चे सदस्य देश २००हून अधिक आहेत. आजवर ७९ देश विश्वचषक स्पर्धेत खेळले. तरी विश्वचषक स्पर्धा जिंकण्याचं कर्तृत्व अवघ्या आठच देशांनी दाखवलंय. ते देश म्हणजे उरुग्वे, इटली, जर्मनी, ब्राझील, इंग्लंड, अर्जेटिना, फ्रान्स आणि स्पेन. त्यातही पहिल्या ४८ वर्षांत पाच नवे   जगज्जेते (उरुग्वे, इटली, जर्मनी, ब्राझील व इंग्लंड) आणि नंतरच्या ४० वर्षांत तीनच नवे जगज्जेते (अर्जेटिना, फ्रान्स, स्पेन).. पुन्हा इतक्या कालखंडात हॉलंडच्या संघानं तीन वेळा अंतिम फेरी गाठली. यंदा कदाचित बेल्जियम ती मजल मारू शकेल, अशी थोडीफार शक्यता. म्हणजे दक्षिण अमेरिका आणि पश्चिम व दक्षिण युरोप वगळता पृथ्वीतलावरील विशाल भूभागातून फुटबॉल जगज्जेताच येऊ शकलेला नाही. अमेरिका आणि रशिया यांनी थोडीफार चमक तरी दाखवलेली आहे. पण चीन, भारत, आग्नेय आशिया, पूर्व आफ्रिका या टापूंमधून नजीकच्या भविष्यात तरी असा जगज्जेता निर्माण होण्याची सुतराम शक्यता नाही. फुटबॉलच्या लोकप्रियतेची व्याप्ती आणि तीव्रता वादातीत आहे. प्रत्येक स्पर्धेत किमान एक तरी नवीन देश खेळताना दिसतोय. मग जगज्जेते इतके कमी कसे?

गेली अनेक र्वष फुटबॉलतज्ज्ञ, पत्रकार, गणिती आणि सांख्यिकी मॉडेल मांडणारे तज्ज्ञ, समाजशास्त्रज्ञ, राजकीय विश्लेषक या मुद्दय़ावर संशोधन आणि चर्चा करत आहेत. निश्चित कारण किंवा मॉडेल अद्याप शोधता आलेलं नाही. काही ठळक वैशिष्टय़ांची उद्बोधक चर्चा नुकतीच ‘दि इकॉनॉमिस्ट’ साप्ताहिकानं एका लेखात मांडलेली आहे. काही देशांमध्ये फुटबॉल लोकप्रिय का होते, त्यांतील काही देशांमध्ये विश्वचषकात खेळण्याची क्षमता कशी येते, त्यांतीलही काही देशच जगज्जेते कसे बनतात, याविषयी काही निरीक्षणं या लेखात मांडलेली आहेत. दक्षिण आशिया आणि आखातामध्ये ‘गुगल’वर सर्वाधिक ‘सर्च’ क्रिकेटविषयी आहे. अवघे १० टक्के फुटबॉलविषयी उत्सुक दिसले. अमेरिका आणि कॅनडात बेसबॉल, अमेरिकन फुटबॉल, आइस हॉकीचं वेड कमी झालेलं नाही. आफ्रिकी देशांमध्ये फुटबॉलची लोकप्रियता आणि गुणवत्ता गेल्या दोन दशकांमध्ये खूपच वाढली. त्यातून चांगले फुटबॉलपटू निर्माण होऊ लागले. मात्र अस्थिर सरकारे आणि दिशाहीन फुटबॉल संघटनांमुळे मोठय़ा प्रमाणात आणि सातत्यानं ही गुणवत्ता वृद्धिंगत होताना दिसत नाही. शिवाय युरोपात खेळायचं, हेच उद्दिष्ट ठेवल्यामुळे व्यावसायिकता भिनते, पण देशासाठी खेळणं किंवा राष्ट्रीय संघभावना पुरेशा प्रमाणात वाढीस लागत नाही. यामुळेच कधी कॅमेरून, कधी घाना, कधी नायजेरिया एखाद-दुसऱ्या स्पर्धेत चमकतात आणि अस्तंगत होतात.

बहुतेक सर्व युरोपीय जगज्जेते हे सधन आणि समृद्ध आहेत. जर्मनी, इटली, फ्रान्स, स्पेन आणि इंग्लंड या देशांमध्ये फुटबॉलसाठी आवश्यक पायाभूत सुविधाही यथायोग्य आहेत. २० पैकी ११ विश्वचषक युरोपीय देशांनी जिंकले आहेत. पण त्यांच्यापैकी बहुतेक देशांमध्ये असलेल्या लीग्जचा दर्जा पाहता त्यांनी अधिक स्पर्धा जिंकणं अपेक्षित होतं. याउलट ब्राझील आणि अर्जेटिना यांच्या अर्थव्यवस्था मोठय़ा असल्या तरी अस्थिर आणि चक्राकार आहेत. उरुग्वे हा त्यांच्या तुलनेत फारच छोटा देश. तिन्ही देशांमध्ये कदाचित युरोपीय देशांच्या तुलनेत फुटबॉलविषयक आसक्ती (पॅशन) अंमळ अधिक असू शकेल. फुटबॉलच्या विकासाला आणखी हातभार लावणारा महत्त्वाचा घटक म्हणजे तेथील सरकारी धोरणं. आसक्ती (केवळ आवड नव्हे!) आणि सरकारी पाठबळ या दुहेरी रेटय़ामुळे दक्षिण अमेरिकेतील संघ विश्वचषक स्पर्धेच्या स्थापनेपासूनच चांगली कामगिरी करत आहेत. दक्षिण अमेरिकेतील ‘कोपा अमेरिका’ ही फुटबॉल स्पर्धा विश्वचषक आणि युरो यांच्याही आधी सुरू झालेली आहे. या तीन देशांमध्ये आणि काही प्रमाणात चिली, कोलंबिया, पॅराग्वे या देशांमध्ये सरकारे किंवा अर्थव्यवस्था डळमळीत असल्या तरी फुटबॉल हा राष्ट्रीय अस्मितेचा मुद्दा असतो. ते हेरून फार पूर्वीपासून पाश्चिमात्य क्लब आणि पुरस्कर्ते यांचं पाठबळही तेथील फुटबॉलपटूंना मिळतं.           (पूर्वार्ध)

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 16, 2018 2:48 am

Web Title: the history fifa world cup 2018
Next Stories
1 FIFA World Cup 2018: रोनाल्डोची विक्रमी हॅट्ट्रिक; स्पेन विरुद्ध पोर्तुगाल सामना बरोबरीत
2 FIFA World Cup 2018 IRAN VS MOROCCO: इराणला कडवी टक्कर दिली पण शेवटच्या मिनिटांमध्ये मोरोक्कोचा झाला घात
3 FIFA World Cup 2018 EGY vs URU : निर्णायक क्षणी गोल करत उरुग्वेची इजिप्तवर मात
Just Now!
X