प्रा. डॉ. अभिजीत वणिरे

विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम टप्प्याला प्रारंभ झाला असून उपउपांत्यपूर्व फेरीचा अंगावर रोमांच आणणारा थरार प्रेक्षकांना यानिमित्ताने पाहावयास मिळत आहे. फ्रान्स व अर्जेटिना यांच्यातील पहिल्या सामन्यात प्रेक्षकांना याचा अनुभव घेता आला. सामन्यात दोन्ही संघांकडून तब्बल सात गोल झाले. फ्रान्सने यापैकी पहिला, चौथा, पाचवा व सहावा, तर अर्जेटिनाने दुसरा, तिसरा व सातवा गोल केला. दोन्ही संघांकडून गोलची परतफेड होत असल्याने उत्कंठा शिगेला पोहोचली. अखेर सामना फ्रान्सने ४-३ असा जिंकला आणि अर्जेटिनाची घरवापसी झाली. मात्र या सामन्यात फ्रान्सच्या १९ वर्षांच्या कॅलियन एमबाप्पेचे आक्रमण थोपवताना अर्जेटिनाची पुरती दमछाक झाली. खुद्द पेलेने १९५८ मध्ये स्वीडनविरुद्धच्या अंतिम सामन्यात दोन गोल करून विजय मिळवून दिला होता. फ्रान्सच्या या विजयाच्या निमित्ताने पेले यांनी ६० वर्षांपूर्वीच्या त्यांच्या विक्रमाची बरोबरी केल्याबद्दल एमबाप्पेचे अभिनंदनही केले.

दुसऱ्या सामन्यात उरुग्वेने पोर्तुगालचा २-१ असा पराभव करून स्पर्धेची पुढील फेरी गाठली. पोर्तुगाल व अर्जेटिनाच्या पराभवाने विजेतेपदाचा दावेदार रोनाल्डो की मेस्सी हा विषय संपलेला आहे. या दोघांना कारकीर्दीत विश्वविजेतेपद मिळवता आले नाही, ही सल त्यांना दीर्घकाळ सतावणार हे नक्की. उरुग्वेच्या विजयाचे विश्लेषण करावयाचे झाल्यास जिद्द व चिकाटीचा योग्य मिलाफ असेच करावे लागेल. सुआरेझ व कॅव्हानी यांच्यातील योग्य समन्वय उरुग्वेला विजय मिळवून देऊन गेला. अनेकदा पोर्तुगालच्या बचावफळीला या दोघांना आवरणे कठीण होऊन गेले. मात्र उरुग्वेच्या बचावफळीने या सामन्यात सर्वोत्कृष्ट खेळ केला.

सोमवारी दोन सामने होत आहेत. पहिला सामना दक्षिण अमेरिका खंडातील ब्राझील व मेक्सिको यांच्यात होत आहे, तर दुसरा सामना युरोपीयन शैलीच्या व सध्या भलताच फॉर्ममध्ये असलेल्या बेल्जियम विरुद्ध आशिया खंडातील एकमेव आशास्थान असलेल्या जपान यांच्यात होणार आहे. जागतिक क्रमवारीनुसार सध्या ब्राझील दुसऱ्या, तर मेक्सिको १५व्या क्रमांकावर आहे. बेल्जियम तिसऱ्या स्थानावर, तर जपान ६१व्या स्थानावर आहे. क्रमवारी कोणतीही असली तरी प्रत्यक्ष सामन्यात जो संघ चांगला खेळ करेल तोच बाजी मारणार हे नक्की. तरीही जपानला कमी लेखण्याची चूक बेल्जियम करणार नाही. आत्तापर्यंत २०११ पासून ब्राझील व मेक्सिको यांच्यात पाच सामने झालेले आहेत. त्यापैकी ब्राझीलने तीन सामने, तर मेक्सिकोने एक सामना जिंकलेला आहे. एक सामना बरोबरीत सुटलेला आहे. बलाबल पाहिले तर ब्राझीलचा संघच वरचढ वाटतो. ब्राझीलच्या संघात मागील पाच वर्षांत खेळलेले मास्रेलो, सिल्व्हा, नेयमार, पॉलिन्यो, डॅनियलो, फिलिप कोटिन्यो हे अनुभवी खेळाडू आहेत; परंतु मस्रेलो, डी कोस्टा, डॅनिलो हे खेळाडू जखमी असल्याने मेक्सिकोविरुद्ध ते खेळण्याची शक्यता कमीच आहे, तर मेक्सिकोचे सॅन्टोस, हारमंडेज, काल्रेस व्हिला, मार्के फॅबियन, राऊल जिमनेझ, लोझानो हे खेळाडू खेळत आहेत. याचाच अर्थ दोन्ही संघांतील खेळाडूंना मोठा अनुभव पाठीशी आहे. दोन्ही संघ परस्परांच्या खेळाची शैली ओळखून आहेत. फ्रान्सने जसे मिळालेल्या संधीचे गोलमध्ये रूपांतर केले, त्याचप्रमाणे जो संघ मिळालेल्या संधीचे गोलमध्ये रूपांतर करेल, तोच विजयी ठरणार आहे, तरीही ब्राझीलच्या यापूर्वीच्या सर्व विश्वचषकांतील कामगिरीचा दबाव मेक्सिकोवर असणार आहे.

साखळी फेरीतील अखेरचा सामना ब्राझीलने जिंकलेला असल्याने त्यांचा आत्मविश्वास वाढलेला असेल, तर मेक्सिको अखेरचा सामना मोठय़ा फरकाने हरला असल्याने त्यांच्यावर दबाव असण्याची शक्यता आहे. बेल्जियम व जपान या दोन संघांत पाच वेळा लढत झालेली आहे.  यापैकी जपानने दोन वेळा व बेल्जियमने दोन वेळा विजय मिळवलेला आहे. एक वेळा सामना बरोबरीत सुटलेला आहे. मात्र यापैकी फेब्रुवारीमध्ये झालेल्या सामन्यात लुकाकूच्या एकमेव गोलच्या साहाय्याने बेल्जियमने सामना जिंकलेला आहे. चालू स्पर्धेत प्राथमिक फेरीत बेल्जियमने पहिले दोन सामने एकतर्फी जिंकलेले आहेत. अखेरच्या सामन्यात बलाढय़ इंग्लंड संघाला त्यांनी पराभूत केले असल्याने त्यांचा आत्मविश्वास कमालीचा उंचावलेला आहे. स्पर्धा सुरू होण्यापूर्वी संभाव्य विजेते म्हणूनही बेल्जियम संघाचा उल्लेख केला जात होता. बेल्जियम संघाची मदार प्रामुख्याने लुकाकू व हॅजार्ड यांच्यावर आहे. जपान संघानेही या स्पर्धेत चांगली कामगिरी केली असून त्यांच्याही संघात मागील विश्वचषक स्पर्धा खेळलेले अनेक चांगले खेळाडू आहेत. त्यामुळे या लढतीतही चांगला खेळ होणार हे नक्की.

abhijitvanire@yahoo.com