सिद्धार्थ खांडेकर

मेक्सिकोकडून जर्मनीचा पराभव आणि आता जपानकडून कोलंबियाचा पराभव हे विश्वचषक फुटबॉल स्पर्धेतील आतापर्यंतचे सर्वाधिक थरारक निकाल. मात्र, वलयांकित खेळाडू आणि मातब्बर संघांच्या अडखळत्या कामगिरीइतकीच या स्पर्धेत ‘व्हीएआर’ (व्हिडीओ असिस्टंट रेफरी) तंत्रज्ञानाची चर्चाही सुरू झाली आहे. अनेक संघ ‘व्हीएआर’च्या कामगिरीविषयी साशंक आहेत. परंतु ब्राझील आणि इंग्लंडने व्हिडीओ रेफरीविषयी सर्वाधिक आकांडतांडव केलेला आहे. ते साहजिक आहे. ब्राझीलला स्वित्र्झलडनं १-१ असं बरोबरीत रोखलं, पण किमान दोन वेळा व्हिडीओ रेफरीच्या माध्यमातून त्यांना न्याय मिळायला हवा होता, असं ब्राझिलियन फुटबॉल संघटनेचं मत आहे. टय़ुनिशियाविरुद्धच्या सामन्यात इंग्लंडनं विजय मिळवला खरा, पण त्यांचा कर्णधार हॅरी केनला पेनल्टी क्षेत्रात पाडल्याबद्दल पेनल्टी मिळायला हवी होती, याविषयी इंग्लिश प्रसारमाध्यमांमध्ये मतैक्य आहे.

रशियातील विश्वचषक कोणत्याही संघानं जिंकला आणि रशियाच्या पाहुणचाराच्या दर्जाची नंतर कितीही चर्चा झाली, तरी इतिहासात ही स्पर्धा ‘व्हीएआर’ तंत्रज्ञानाच्या उगमासाठी ओळखली जाईल. क्रिकेट, रग्बी आणि टेनिस या खेळांमध्ये तंत्रज्ञानाचा वापर यापूर्वीच सुरू झाला आहे. फुटबॉलच्या खेळात खरं म्हणजे सुरुवातीपासूनच इतर प्रमुख खेळांच्या तुलनेत अधिक पंच किंवा रेफरी असतात. एक मुख्य रेफरी, त्याचे दोन सहायक आणि त्यांच्याही मदतीला मैदानाच्या बाजूला चौथा रेफरी अशी रचना असते. त्यातही युरोपीय क्लब फुटबॉलमध्ये दोन्ही गोलपोस्टच्या मागे प्रत्येकी एक असे आणखी दोन रेफरी असतात. अर्थात आंतरराष्ट्रीय फुटबॉलमध्ये ‘फिफा’ने याचा अवलंब केलेला नाही. इतके रेफरी असूनही विश्वचषकासारख्या महत्त्वाच्या स्पर्धामध्ये निर्णयप्रक्रियेत काही त्रुटी राहतात. त्या कमी करण्यासाठी व्हिडीओ रेफरी यंत्रणा अस्तित्वात आली. २०१०च्या विश्वचषकामध्ये दुसऱ्या फेरीच्या एका सामन्यात जर्मनीनं इंग्लंडवर ४-१ अशी मात केली. १-२ अशा पिछाडीवर असताना इंग्लंडच्या फ्रँक लाम्पार्डच्या फ्री-किकवर चेंडू गोलबारला लागून खाली आला नि गोलरेषेच्या पलीकडे पडून पुन्हा बाहेर आला. तो खरं तर गोल होता आणि लक्षावधी टीव्ही रिप्लेंमधून ते सिद्धही झालं. पण.. रेफरी, सहायक रेफरी, चौथा रेफरी यांच्या नजरेस तो पडला नाही. त्याच स्पर्धेत एका सामन्यात ब्राझीलच्या फॅबियानोनं चेंडूला प्रथम डाव्या हातानं, मग उजव्या हातानं स्पर्श केला. रेफरीनं त्याला विचारलं, की चेंडू तुझ्या छातीला लागला ना? फॅबियानो ‘हो’ म्हणाला आणि रेफरीनं त्याच्यावर विश्वास ठेवला! अशा प्रसंगांमुळे मैदानावरील रेफरींच्या दृष्टीला तंत्रज्ञानाची जोड देणं ‘फिफा’ला आवश्यक वाटू लागलं.

रशियात सामने कुठंही होत असले, व्हिडीओ रेफरींची टीम मॉस्कोत बसते. यात एक प्रमुख आणि तीन सहायक असतात. मैदानावरील ३३ कॅमेऱ्यांतून होत असलेलं चित्रण त्यांच्यासमोरील मॉनिटपर्यंत थेट पोहोचत असतं. याशिवाय ऑफसाइडवर नजर ठेवण्यासाठी अतिरिक्त दोन कॅमेरे त्यांच्या दिमतीला असतात. बाद फेऱ्यांसाठी प्रत्येक गोलच्या मागे आणखी दोन अल्ट्रा स्लो-मोशन कॅमेरे बसवले जातील. रेफरींच्या अभिप्रायावरच नव्हे, तर इतर त्रुटींवरही व्हिडीओ रेफरी नजर ठेवून असतात. मात्र, ‘फिफा’च्या दृष्टीनं निर्णायक किंवा सामन्याच्या निकालावर थेट परिणाम करू शकतील, अशा निर्णयांबाबतच व्हिडीओ रेफरींची मदत घेतली जाऊ शकते. उदा. गोल, पेनल्टी, लाल कार्ड किंवा क्वचित प्रसंगी भलत्याच खेळाडूला लाल-पिवळं कार्ड दाखवलं जाणं वगैरे.. व्हिडीओ रेफरींना मैदानावरील रेफरीच्या निर्णयात त्रुटी आढळली, तर ते संबंधित रेफरीला कळवू शकतात. याउलट, एखाद्या निर्णयाबाबत खात्री वाटत नसेल, तर मैदानावरील रेफरी व्हिडीओ रेफरींचा अभिप्राय मागू शकतात. व्हिडीओ रेफरी हे स्वतहून कोणता निर्णय घेऊ शकत नाही. त्यांची भूमिका सल्लागाराची असते. अंतिम निर्णय घेण्याचा अधिकार मैदानावरील रेफरीचाच असतो. फाऊल, गोल झाला त्या वेळी एखादा खेळाडू ऑफसाइड स्थितीत होता का याविषयी ठरवणे अजूनही सर्वस्वी मैदानावरील रेफरीच्याच हातात आहे. गोलरेषेच्या मागे चेंडू गेल्यास (गोल झाला), मैदानाच्या सीमेबाहेर जाऊन पुन्हा खेळात आल्यास मात्र व्हिडीओ रेफरी त्वरित कळवतात. काही वेळा मैदानावरील रेफरीला स्वत: एखाद्या घटनेचा आढावा घ्यायचा असल्यास तो रेफरी रिव्ह्य़ू एरियात जाऊन खातरजमा करू शकतो. मात्र इतकं होऊनही या संपूर्ण व्यवस्थेत त्रुटी राहिलेल्या दिसतात. काही संघांवर अन्याय झाल्यासारखा दिसतोच. (पूर्वार्ध)

siddharth.khandekar@expressindia.com