फिफा विश्वचषकातले साखळी फेरीतले सामने अगदी रंगतदार झाले. मात्र आता सुरु होणार आहे ‘करो या मरो’ची लढत म्हणजेच बाद फेरी. जो संघ जिंकेल त्याचं स्पर्धेतलं आव्हान कायम असेल, तर जो संघ हरेल तो आपली बॅग पॅक करुन घरी परतेल. त्यामुळे बाद फेरीचे सामने हे साखळी फेरीतल्या सामन्यांपेक्षा कईक पटीनं जबरदस्त होतील यात काही शंका नाही.

बाद फेरीत पहिलाच सामना रंगणार आहे तो दोन माजी विश्वविजेत्या संघांमध्ये. एकीकडे उभा ठाकलाय १९९८ सालचा विश्वविजेता फ्रान्स, तर दुसरीकडे असेल १९७८ आणि १९८६ चा विश्वविजेता अर्जेंटिनाचा संघ. युरोपियन आणि दक्षिण अमेरिकन जायंट संघामधला हा सामना रशियातल्या कझान अरेनात रंगेल.

कशी होती साखळी फेरीत कामगिरी?

फ्रान्सनं विश्वचषकाच्या ग्रुप ‘सी’ मध्ये सात गुणांसह अव्वल स्थान मिळवलं. ऑस्ट्रेलिया आणि पेरुवर फ्रान्सनं अनुक्रमे २-१ आणि १-० असा विजय मिळवला होता, तर डेन्मार्कनं फ्रान्सला गोलशून्य बरोबरीत रोखलं. दुसरीकडे अर्जेंटिनावर साखळी फेरीतच गारद होण्याचं संकट घोंगावत होतं. पण नायजेरियावर मिळवलेल्या विजयामुळं अर्जेंटिनाला बाद फेरी गाठता आली. ग्रुप ‘डी’ मध्ये अर्जेंटिनानं एक विजय, एक ड्रॉ आणि एका पराभवासह चार गुणांची कमाई केली. अर्जेंटिनाला सलामीच्या सामन्यातच दुबळ्या आईसलँडनं बरोबरीत रोखलं. मग क्रोएशियाविरुद्ध ०-३ अशा मानहानिकारक पराभवाला सामोरं जावं लागलं होतं. त्यामुळं अर्जेंटिनाची साखळी फेरीतली कामगिरी ही सुमारच म्हणावी लागेल.

कशी आहे एकमेकांविरुद्ध कामगिरी?

फ्रान्स आणि अर्जेंटिनाचे संघ आजवर ११ वेळा आमनेसामने आले आहेत. त्यात अर्जेंटिनाने सहा सामन्यांत विजय मिळवला आहे. तर फ्रान्सला केवळ दोनच सामन्यांत विजयाची चव चाखता आली आहे. उभय संघांमधले तीन सामने हे बरोबरीत सुटले.

विश्वचषकाच्या इतिहासात फ्रान्स आणि अर्जेंटिनाचे संघ आजवर केवळ दोनदाच आमनेसामने आले. १९३० साली अर्जेंटिनाने फ्रान्सवर १-० असा विजय मिळवला होता. तर १९७८ साली अर्जेंटिनाने फ्रान्सला २-१ असं हरवलं होतं. विशेष म्हणजे दोन्ही वेळी अर्जेंटिनानं विश्वचषकाची अंतिम फेरी गाठली होती. १९३० साली अर्जेंटिनाला पराभव स्वीकारावा लागला होता, तर १९७८  साली अर्जेंटिनानं पहिल्यांदा विश्वचषक जिंकला होता. महत्त्वाची बाब म्हणजे १९७८ सालच्या त्या पराभवानंतर फ्रान्स एकदाही दक्षिण अमेरिकन संघाकडून पराभूत झालेला नाही.

काय आहे फ्रान्स  ताकद?

फ्रान्सच्या संघाकडे यंदाच्या विश्वचषकात प्रबळ दावेदार म्हणून पाहिलं जात आहे. फ्रान्सच्या संघात अनुभवी आणि युवा खेळाडूंचा भरणा आहे. त्यांची ताकद साखळी फेरीतल्या पहिल्या तीन सामन्यांत दिसून आली. पॉल पोग्बासारखा मधल्या फळीतला शिलेदार सध्या जबरदस्त फॉर्मात आहे. तीन सामन्यात मिळून त्यानं १२४ पास केले. आपल्या संघसहकाऱ्यांना गोल करण्याच्या अनेक संधी पोग्बानं या तिन्ही सामन्यांत उपलब्ध केल्या. त्याचाच फायदा फ्रान्सची  आक्रमणफळी सांभाळणाऱ्या अॅन्टायन ग्रिझमन आणि कायलिन एमबापेलाही झाला आहे. अॅन्टायन ग्रिझमननं यंदाच्या विश्वचषकात आतापर्यंत २१८ मिनिटं मैदानावर घालवली आहेत. त्यात त्यानं ऑस्ट्रेलियाविरुद्ध सलामीच्या सामन्यात गोलही झळकावला. तर कायलिन एमबापेनंही पेरुविरुद्ध सामन्यात विजय गोल डागला.  फ्रान्सचं हे आक्रमण थोपवण्याची जबाबदारी असेल ती अर्जेंटिनाचा बचावपटू मार्कोस रोहोवर. अर्जेंटिनाला बाद फेरीचं तिकीट मिळवून देण्यात रोहोचा सिंहाचा वाटा होता. रोहोनं यंदाच्या विश्वचषकात खेळलेल्या दोन्ही सामन्यात सातत्यपूर्ण कामगिरी बजावली आहे. तिकडे फ्रान्सच्या बचावफळीतला राफाएल वाराने प्रतिस्पर्ध्यांवर भारी पडताना दिसतो. वारानेसह सॅम्युअल उमतिती, लुकास हर्नांडेझ आणि बेन्जामिन पावार्डही फ्रान्सच्या बचावफळीत मोलाची भूमिका पार पाडतायत. महत्त्वाचे आकडे सांगायचे तर फ्रान्सनं दक्षिण अमेरिकन संघाविरुद्ध गेल्या ७५७ मिनिटांमध्ये एकही गोल होऊ दिलेला नाही. १९७८ साली फ्रान्सनं एखाद्या दक्षिण अमेरिकन संघाविरुद्ध गोल स्वीकारला होता आणि तो संघ होता अर्जेंटिना.

अर्जेन्टिनाची मदार मेसीवर

फ्रान्स आणि अर्जेंटिनामधल्या सामन्यात अवघ्या जगाचं लक्ष असेल ते लायनेल मेसीच्या कामगिरीकडे. लायनेल मेसीसाठी आता प्रत्येक सामना हा त्याच्या कारकीर्दीतला अखेरचा सामना असू शकतो. जितके सामने तो अर्जेंटिनाला जिंकून देईल तितका वेळ मेसी आंतरराष्ट्रीय फुटबॉल खेळताना दिसेल. ज्या सामन्यात अर्जेंटिना पराभूत होईल, कदाचित तो सामना मेसीसाठी अखेरचा सामना असू शकतो. सलग चौथ्या विश्वचषकात मेसी अर्जेंटिनाचं प्रतिनिधित्व करत आहे. पण २०१४ चा अपवाद वगळला तर मेसीला एकाही विश्वचषकात आपल्या लौकिकाला साजेशी कामगिरी करता आलेली नाही. यंदाच्या विश्वचषकातही मेसीला सलामीच्या सामन्यात पेनल्टी किकवर गोल करता आला नाही. त्यामुळे आईसलँडसारख्या संघाला अर्जेन्टिनाला बरोबरीत रोखता आलं, तर क्रोएशियाविरुद्ध मेसी सपशेल अपयशी ठरला. मात्र नायजेरियाविरुद्ध मेसीनं गोल झळकावून टीकाकारांच तोंड काहीसं बंद केलं. मात्र अर्जेंटिनाचं विश्वचषक जिंकण्याचं आणि स्वत:ला ‘गोट’ अर्थात ग्रेटेस्ट ऑफ ऑल टाईम म्हणवून घ्यायचं असेल तर मेसीला याहूनही दमदार कामगिरी बजवावी लागेल. ऐन मोक्याच्या वेळी मेसी नेहमीच माती खातो असं म्हटलं जातं. काही प्रमाणात ते खरंही आहेच म्हणा, २०१४ सालच्या फिफा विश्वचषकाची फायनल असो वा २०१५ आणि २०१६ सालची कोपा अमेरिकाची फायनल असो. मेसीला अर्जेंटिनाला एकही स्पर्धा जिंकून देता आलेली नाही. विश्वचषकाच्याच बाबतीत झालं तर मेसीला आजवर बाद फेरीत एकही गोल करता आलेला नाही. विश्वचषकाच्या बाद फेरीत मेसी आजवर ६६६ मिनिटं खेळला आहे पण त्याला गोल करण्यात मात्र नेहमीच अपयश आलं आहे. अर्जेंटिनानं कशीबशी विश्वचषकाची बाद फेरी गाठली. पण त्यामुळं अवघ्या अर्जेंटिनावासियांच्या आशा पुन्हा एकदा जाग्या झाल्या आहेत. कारण मॅराडोनानंतर  मेसी अर्जेंटिनाला फिफा विश्वचषक जिंकून देईल अशी भाबडी आशा देशवासियांना लागून राहिली आहे. पण अर्जेन्टिनाला विश्वचषक जिंकायचा तर त्यांना आपल्या रणनितीत बदल करणं अधिक गरजेचं आहे. जेणेकरुन मेसीला गोल करण्यात अधिक सोपं होईल. सांगायचं झालं तर नायजेरियाविरुद्ध सामन्यात एवर बनेगानं मेसीला ज्या पद्धतीनं पास दिला तो मेसीच्या गोलपेक्षा अधिक सरस होता. मेसीला जितक्या संधी निर्माण करुन दिल्या जातील तितकं त्याला गोल करण्यात यश येईल. अर्जेंटिनाच्या ड्रेसिंग रुममध्ये सगळं काही आलबेल नसल्याचं दिसतंय. क्रोएशियाविरुद्धच्या पराभवानंतर अनेक खेळाडू प्रशिक्षक जोर्गे सॅम्पावली यांच्या रणनितीविरोधात असल्याचं दिसलं. पण आता हे सर्व काही विसरुन अर्जेंटिनाला एकजुटीनं मैदानात उतरावं लागेल. आणि आपल्या देशवासियांचं ते स्वप्न पूर्ण करण्याचा प्रयत्न करावा लागेल.

  • आपल्या प्रतिक्रीया vijay.majha@gmail.com या इमेल आयडीवर कळवा