FIFA World Cup 2018 : २१वी फुटबॉल विश्वचषक स्पर्धा १४ जूनपासून रशियात सुरु होणार आहे. मात्र FIFA World Cup 2018 मध्ये भारताला या स्पर्धेसाठी पात्र ठरता आलेले नाही. नियमित फुटबॉल विश्वचषक स्पर्धेत आतापर्यंत भारताला एकदाही सहभागी होण्याची संधी मिळालेली नाही. २०१७मध्ये १७ वर्षाखालील फुटबॉल संघाला स्थान मिळाले होते. मात्र वरिष्ठ संघाला अद्याप या स्पर्धेत संधी मिळालेली नाही. पण, १९५० साली झालेल्या FIFA World Cup स्पर्धेसाठी भारताचा संघ पात्र ठरला होता. तरीदेखील भारताने या स्पर्धेत सहभागी होण्यास नकार दिला होता.
या घटनेबाबत अनेकदा असे सांगितले जाते की भारतीय संघ हा अनवाणी पायी विश्वचषक स्पर्धा खेळणार होता, म्हणून भारताला सहभागाची संधी मिळाली नाही. मात्र, या मागील खरी कथा काहीतरी वेगळीच आहे. हा विश्वचषक ब्राझीलमध्ये खेळण्यात येणार होता आणि या विश्वचषकासाठी भारताने प्रवास करून ब्राझीलला यावे, असे ब्राझीलचे म्हणणे होते. त्यामुळे अखिल भारतीय फुटबॉल महासंघाने या स्पर्धेसाठी संघ न पाठवण्याला पसंती दिली.

त्या काळी ऑलिम्पिक स्पर्धा या फिफा विश्वचषक स्पर्धेपेक्षा मोठ्या आणि महत्वाच्या असतात, असे भारतीय फुटबॉल महासंघाचे म्हणणे होते. त्यामुळे फिफाच्या चौथ्या विश्वचषक स्पर्धेत भारताला पाठवण्यात आले नाही. तसेच, ब्राझीलने भारतीय संघाच्या करण्याचा प्रस्तावही ठेवला होता. पण जहाजाने एवढ्या लांब आपल्या राष्ट्रीय संघाला पाठवणे, महासंघाला योग्य वाटले नव्हते. त्यामुळे भारतीय संघाचा फिफा विश्वचषक स्पर्धेत खेळण्याची संधी हुकली.